पू. पद्माकर होनपकाका आणि पू. कुसुम जलतारेआजी यांच्या संदर्भात कु. मधुरा भोसले यांना आलेल्या अनुभूती !

पू. पद्माकर होनप
पू. कुसुम जलतारेआजी

‘जून आणि जुलै मास २०२० मध्ये मला होणार्‍या आध्यात्मिक त्रासांमध्ये पुष्कळ वाढ झाली होती. मला होणारे वाईट शक्तींचे सूक्ष्मातील त्रास न्यून करण्यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका मला प्रतिदिन नामजप सांगत होते, तरीही माझा त्रास न्यून न झाल्याने त्यांनी ७.७.२०२० ते २२.७.२०२० पर्यंत पू. पद्माकर होनपकाका यांनी रात्री ८ ते ९ आणि पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांना पहाटे ४ ते ५ या कालावधीत माझ्यासाठी नामजप करण्यास सांगितले. पू. होनपकाका माझ्यासाठी नामजप करत होते, तेव्हा माझ्या देहातून काळसर रंगाचा धूर बाहेर पडतांना जाणवून माझे शरीर हलके झाल्याचे मला जाणवले.

कु. मधुरा भोसले

पू. होनपकाकांनाही तसेच जाणवल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मी पहाटे ४ ते ५ या वेळेत गाढ झोपेत असतांना जेव्हा पू. जलतारेआजी माझ्यासाठी नामजप करत होत्या, तेव्हा ‘श्रीदुर्गादेवी माझी लिंबाने दृष्ट काढत असल्याचे जाणवून माझ्या देहातून टाचण्या, खिळे आणि तारा बाहेर पडत आहेत’, असे मला सूक्ष्मातून जाणवून माझ्या देहातील विविध ठिकाणी होणार्‍या वेदना न्यून होत होत्या. माझ्यासाठी नामजपादी उपाय करून माझा त्रास न्यून केल्याविषयी मी पू. जलतारेआजी यांना प्रत्यक्ष भेटल्यावर त्यांना कृतज्ञता व्यक्त केली. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘सर्व काही देवच करतो, मी काहीच केले नाही. तुला बरे वाटले ना ! हेच मला हवे होते.’’ यावरून मला पू. जलतारेआजींकडून ‘विनम्रता आणि कर्तेपणा स्वत:कडे न घेता संपूर्ण श्रेय देवाला देणे’, हे गुण शिकायला मिळाले. ‘देवाच्या कृपेने आम्हा त्रास असणार्‍या साधकांवर निरपेक्ष भावाने नामजप करून प्रीती आणि कृपा यांचा वर्षाव करणारे संत आम्हाला लाभले’, यासाठी मी भगवंताच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.७.२०२०)

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक