भावना ठेवून केलेले आणि भाव ठेवून केलेले ‘स्पॅनिश फ्लॅमिंको (Spanish Flaminco)’ नृत्य यांच्यात सूक्ष्म स्तरावर जाणवलेले अंतर

‘८.१.२०२५ या दिवशी ‘सुरभि एन्सेम्बल’ या वाद्यवृंद कलाकारांचा समूह आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय यांच्या वतीने ‘स्पॅनिश फ्लॅमिंको (Spanish Flaminco)’ या नृत्य प्रकाराचे आध्यात्मिक संशोधन करण्यात आले. या संशोधन अंतर्गत दोन प्रयोग घेण्यात आले पहिल्या प्रयोगात नर्तकी श्रीमती लेतीशिया आरावेना हिने मनात विविध प्रकारच्या भावना जागृत ठेवून नृत्य प्रस्तुत केले, तर दुसर्‍या प्रयोगात नर्तकीने मनात ईश्वराप्रती भाव ठेवून नृत्य प्रस्तुत केले. हे दोन्ही नृत्य पहातांना सूक्ष्म स्तरावर जाणवलेले अंतर आणि अन्य सूत्र येथे देत आहे.  या लेखाचा काही भाग आपण २०.३.२०२५ या दिवशी पाहिला. आज उर्वरित भाग देत आहे.                                             

भाग २)

याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/894297.html

२. स्पॅनिश नृत्यांगना लेतीशिया आरावेना यांनी प्रस्तुत केलेले ‘स्पॅनिश फ्लॅमिंको’ नृत्य बघतांना जाणवलेली काही महत्त्वपूर्ण सूत्रे

२ अ. भाव ठेवून रज-तम नृत्य प्रस्तुत केले, तरी नृत्यातील नकारात्मकता अल्प होणे : ‘स्पॅनिश फ्लॅमिंको’, हा नृत्य प्रकार मुळात रज-तम प्रधान आहे. या नृत्य प्रकारात नर्तक किंवा नर्तकी विशिष्ट प्रकाराचे जोडे (बूट) घालून पायांच्या हालचालीने विविध प्रकाराचे लय काढतात. हे जोडे मुळात चामड्याचे असून त्यातून योग्य नाद निघण्यासाठी जोड्याचा अग्रभागी किंवा ‘हिल्स (जोड्याच्या मागच्या बाजूच्या उंच भाग)’ येथे छोटे-छोटे अनेक लोखंडी खिळे किंवा काही वेळा धातुची पाती (ब्लेड्स) लावली जाते. या जोड्यातून येणारा नाद मुळात सात्त्विक नसून तो त्रासदायक असतो. असे असूनही ज्या वेळी लेतीशिया आरावेना यांनी भाव ठेवून नृत्य प्रस्तुत केले, त्या वेळी जोड्यातून येणार्‍या त्रासदायक नादाचे तीव्र परिणाम जाणवत नव्हते. यांतून देवाप्रती भाव ठेवून जरी रज-तम युक्त नृत्य प्रकार केला, तर त्याची नकारात्मकता अल्प होण्यास साहाय्य होते, हे सूत्र शिकायला मिळाले.

श्री. निषाद देशमुख

२ आ. लेतीशिया आरावेना यांच्या नृत्याप्रतीचा भाव आणि तळमळ यांमुळे तिला अनाहतचक्रातून शक्तीचा पुरवठा मिळणे : ‘स्पॅनिश फ्लॅमिंको’, या नृत्य प्रकारात विविध शारीरिक हालचाली, उदा. चायनिज पंखा हातात घेऊन नृत्य करणे किंवा पायात घातलेल्या जोड्याने लय काढणे, असे अनेक प्रकार आहेत. या सर्व प्रकार करायला पुष्कळ प्राणशक्ती लागते. लेतीशिया आरावेना नृत्य प्रस्तुत करत असतांना त्यांची प्राणशक्ती गतीने अल्प होत आहे, असे मला जाणवत होते, तरी ते नृत्य न थांबवता तेवढ्याच झोकून देऊन नृत्य करत होत्या. या वेळी त्यांचे नृत्याप्रती असलेल्या सर्मपण आणि प्राथमिक टप्प्याच्या भावामुळे त्यांच्या अनाहतचक्रातून त्यांना शक्ती मिळून त्यातून ते नृत्य करत आहेत, असे मला जाणवले.

नंतर साधकांशी अनौपचारिक चर्चा करतांना त्यांनी सांगितले, त्यांचे वय ४३ वर्षे असून ते मागील १८ वर्षांपासून प्रतिदिन नृत्य प्रकाराचा अभ्यास करत आहेत. याच प्रकारे त्यांच्या संस्कृतीत नृत्यासाठी लागणारे विशिष्ट प्रकाराचे जोडे बनवणारे आणि घालणारे यांना पुष्कळ पवित्र समजले जाते. यामुळे ते ही जोड्यांना पुष्कळ आदराने नमस्कार करून जपून पिशवीत ठेवतात आणि त्यांची काळजी घेतात. यांतून भाव ठेवून कृती केल्यास कसे सकारात्मक परिणाम होतात, ते शिकायला मिळाले.

३. भारतीय नृत्य प्रकार आणि स्पॅनिश फ्लॅमिंकाे या नृत्य प्रकारात जाणवलेले मुख्य भेद

सर्वसाधारणत: भरतनाट्यम्, कत्थक यांसारखे भारतीय नृत्य मंद गतीने सुरु होतात पुढे त्यांच्या गतीत वाढ होऊन ते मध्यम आणि शेवटी तीव्र गतीवर त्यांचा अंत होतो. याउलट स्पॅनिश फ्लॅमिंको या नृत्य प्रकारात मंद, मध्यम आणि तीव, त्यानंतर परत मंद, मध्यम आणि तीव्र अशा क्रमात २ किंवा ३ वेळा नृत्य केले जाते.

या दोन्ही पैकी भारतीय नृत्यात केला जाणारा क्रम साधनेच्या दृष्टीने अधिक पूरक आहे; कारण या क्रमामुळे जिवाच्या मनाची एकाग्रता टप्प्याटप्प्याने वाढत जाते, त्यामुळे त्याचे मन अधिक अंर्तमुख होत असल्याने त्याला आध्यात्मिक अनुभूती सहजतेने आणि दीर्घकाळ घेता येते. या क्रमात नृत्य केल्याने जिवाची देहबुद्धी टप्प्याटप्प्याने अल्प होत जाते, त्यामुळे नृत्यानंतरही नर्तक/नर्तकी यांना तुलनेत दीर्घकाळ अल्प देहबुद्धी किंवा मनाची निर्विचार अवस्था अनुभवणे शक्य होते.

याउलट स्पॅनिश फ्लॅमिंको या नृत्य प्रकारात सतत नृत्याच्या लयीत परिवर्तन होत असल्याने नृत्य करणार्‍या जिवाचे मन अधिक प्रमाणात सतर्क रहाते आणि मनाची एकाग्रता पुढची कृती करण्याकडे केंद्रित असल्याने आध्यात्मिक अनुभूती अनुभवण्यात अडचण येते. यांतून साधना किंवा आध्यात्मिक अनुभूती घेण्यासाठी भारतीय नृत्य अधिक पूरक असल्याचे लक्षात आले.

४. कृतज्ञता

भगवान श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मनात देवाप्रती भाव ठेवून कोणतेही नृत्य केले, तर त्याचे सकारात्मक परिणाम होतात म्हणजेच ‘स्थुल कृतीला नाही तर भावाला महत्त्व आहे’, हे तत्त्व स्थुलातून अनुभवता आले, यासाठी कोटीश: कृतज्ञता.’                                            (समाप्त)

– श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), फोंडा, गोवा. ( १२.१.२०२५)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात.  ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक