Pakistan Military Base Attack : खैबर पख्तूनख्वा प्रांतात झालेल्या आतंकवादी आक्रमणात १३ जण ठार !

पेशावर (पाकिस्तान) – पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात बन्नू कॅन्टोनमेंट भागात झालेल्या दोन बाँबस्फोटात १३ जण ठार, तर ३२ जण घायाळ झाल्याचे वृत्त आहे. ‘असोसिएटेड प्रेस’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेनुसार ४ मार्चला झालेल्या या आक्रमणानंतर सुरक्षा दल आणि आतंकवादी यांच्यात चकमक उडाली. या आक्रमणामागे ‘फितना अल् ख्वारिज’ नावाचा आतंकवादी गट असल्याची माहिती पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’ने दिली आहे.

१. आतंकवाद्यांनी रमझानच्या ‘इफ्तार’नंतर बन्नू कॅन्टोनमेंट या सैनिकी तळापाशी असलेल्या सुरक्षा कड्यावर आक्रमण केले.

२. ठार झालेल्या १२ जणांमध्ये ३ लहान मुलांचाही समावेश आहे.

३. याआधी ३ मार्चला बलुचिस्तान प्रांतात एका महिला आत्मघाती आतंकवाद्याने आक्रमण केले होते. यात एका सैनिकाचा मृत्यू झाला होता.

४. पंतप्रधान शहबाझ शरीफ यांनी ‘रमझानचा उपवास सोडणार्‍या नागरिकांवर भ्याड आक्रमण’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सुरक्षा दलांसमवेत उडालेल्या चकमकीत सर्व १६ आतंकवादी ठार, तसेच ५ सैनिकांचाही मृत्यू !

आतंकवादी आक्रमणाला उत्तर देतांना पाकच्या सुरक्षादलांनी सर्व १६ आतंकवाद्यांना ठार मारले. यात ४ आत्मघातकी आतंकवाद्यांचाही समावेश होता. या वेळी ५ पाकिस्तानी सैनिकही ठार झाले, असे वृत्त ‘डॉन’ने दिले आहे.

संपादकीय भूमिका

‘जे पेरले, तेच उगवले’, याचे उत्तम उदाहरण म्हणजे जिहादी आतंकवादाचा निर्माता पाकिस्तान ! भारतात जिहाद करू पहाणार्‍या पाकिस्तानच्या मुळावरच आता त्याने पोसलेला आतंकवाद घाव घालत आहे, हेच खरे !