Canada Nijjar Murder Case : खलिस्तानी आतंकवादी निज्जर याच्या हत्येत भारताचा सहभाग नाही !

कॅनडा सरकारने स्थापन केलेल्या आयोगाने दिला निर्वाळा !

खलिस्तानी आतंकवादी निज्जर

ओटावा (कॅनडा) – खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही, असा अहवाल कॅनडाने स्थापन केलेल्या ‘मेरी जोसी हॉग आयोगा’ने दिला आहे. त्याच वेळी या अहवालात असेही म्हटले आहे की, भारताने निज्जरच्या हत्येसंदर्भात चुकीची माहिती पसरवली.

१. १८ जून २०२३ या दिवशी हरदीप सिंह निज्जर याची हत्या करण्यात आली होती. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये देशाच्या संसदेत हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येत एका भारतीय मुत्सद्दीसह अनेक लोकांचा हात असल्याचा आरोप केला होता. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो म्हणाले होते की, त्यांच्याकडे यासंबंधी पुरावे देखील आहेत. प्रत्यक्षात ट्रुडो यांनी आतापर्यंत कोणतेही पुरावे दिले नाहीत.

२. यामुळे भारताने कॅनडाच्या ४१ राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी केली होती. कॅनडाच्या आरोपानंतर भारताने तेथील लोकांसाठी व्हिसा (एखाद्या देशातून प्रवास करण्याची अनुमती देणारे अधिकृत कागदपत्र किंवा शिक्का) सेवा स्थगित केली होती. मात्र, नंतर राजनैतिक पातळीवर चर्चा झाली आणि काही महिन्यांनी व्हिसा सेवा पूर्ववत् झाली.

भारत, रशिया, चीन आणि पाक यांनी कॅनडाच्या अंतर्गत गोष्टींत केला हस्तक्षेप !

या अहवालात कॅनडाच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी भारत, रशिया, चीन आणि पाकिस्तान यांना उत्तरदायी ठरवण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, भारताने कॅनडाच्या निवडणुकीत ३ राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मूकपणे पैसे देऊन साहाय्य केले आहे. यासाठी हस्तकांचा वापर करण्यात आला.

अहवालातील हा दावा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळून लावला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले की, वास्तव हे आहे की, कॅनडा भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये सातत्याने हस्तक्षेप करत आहे.

सप्टेंबर २०२३ मध्ये कॅनडाच्या गुप्तचर संस्थेने एका अहवालात दावा केला होता की, वर्ष २०१९ आणि २०२१ मध्ये कॅनडामध्ये झालेल्या दोन निवडणुकांमध्ये चीनने हस्तक्षेप केला होता. यामध्ये जस्टिन ट्रुडो यांना निवडणूक जिंकण्यासाठी चीनने साहाय्य केले. यानंतर पंतप्रधान ट्रुडो यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सप्टेंबर २०२३ मध्ये हॉग आयोगाची स्थापना केली.

संपादकीय भूमिका

भारतावर केलेल्या आरोपांवर कॅनडाचे काळजीवाहू पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आता कोणते प्रायश्‍चित्त घेणार आहेत ? कॅनडातील जनता त्यांना जाब विचारणार आहे का ? कॅनडामध्ये त्यांच्यावर कॅनडाची अपकीर्ती केल्यावरून गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई होणार का ?