Mahakumbh 2025 : कुंभमेळ्यात हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेचे प्रारूप घोषित !

स्वामी आनंद स्वरूप महाराज

प्रयागराज, २४ जानेवारी (वार्ता.) –  महाकुंभमेळ्यामध्ये आलेल्या अनेक संतांनी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी सार्वजनिकरित्या केली आहे. महाकुंभमेळ्यात भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी जोर धरत असतांना जगद्गुरु आदि शंकराचार्य यांचे मूळ पीठ असलेल्या शांभवी सेना पीठाने भावी हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेचे प्रारूप घोषित केले आहे. २४ जानेवारी या दिवशी शांभवी सेना पीठाधीश्‍वर आणि सशस्त्र काली सेनेचे अध्यक्ष स्वामी आनंद स्वरूप महाराज यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयीची घोषणा केली.

पत्रकार परिषदेत याविषयीची माहिती देतांना स्वामी आनंद स्वरूप महाराज म्हणाले,

१. भारताची एकता आणि अखंडता यांसाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी हे प्रारूप धर्माचार्य, विद्वान, न्यायाधीश आणि अधिवक्ता यांच्या माध्यामातून सिद्ध करण्यात आले आहे.

२. हिंदु राष्ट्रात धर्मशास्त्राला अनुसरून शासनव्यवस्था असेल. कोणते अधिकार कुणाकडे असणार ? या विषयी विस्तृत माहिती या प्रारूपात लिहण्यात आली आहे.

३. वर्ष १९७६ नंतर राज्यघटनेत पालट करून ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द जोडून भारताच्या संस्कृतीवर घाला घालण्यात आला. बहुसंख्य हिंदु असणार्‍या भारतातील हिंदु धर्माला संपवण्यासाठी हे षड्यंत्र रचण्यात आले.

४. फाळणी झाली त्यावेळी मुसलमानांसाठी पाकिस्तान निर्माण झाला, तेव्हाच हिंदूंसाठी हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक होते.

१ फेब्रुवारीला संतसंमेलनाचे आयोजन !

संतसंमेलनाचे आयोजन १ फेब्रुवारी या दिवशी करण्यात आले आहे. या संमेलनात ‘हिंदु राष्ट्राची शासनव्यवस्था कशी असावी ?’, ‘हिंदु राष्ट्रात धर्मगुरु, संत-महंत यांची मानसिकता कशी असावी ?’ आणि ‘सध्याच्या आखाड्यांमधील अराजकता पहाता सर्व आखाड्यांचे पुर्नगठण करणे आवश्यक आहे, याविषयी मंथन होणार आहे.

चौकाचौकांत उभे राहून हिंदु राष्ट्रासाठी स्वाक्षरी अभियान !

कुंभमेळ्यात २५ जानेवारीपासून १०८ ठिकाणी चौकाचौकांत उभे राहून भाविकांना हिंदु राष्ट्राची आवश्यकता का आहे ? या विषयी माहिती सांगून हिंदु राष्ट्र मागणीच्या निवेदनावर स्वाक्षरी घेण्यात येणार आहे.