उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. लक्ष जैस्वाल या पिढीतील एक आहे !
परळी वैद्यनाथ (जिल्हा बीड) येथील कु. लक्ष रितेश जैस्वाल याच्या वाढदिवसानिमित्त त्याची आई, आजी आणि सनातन संस्थेच्या ११२ व्या समष्टी संत पू. दीपाली मतकर यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
कु. लक्ष रितेश जैस्वाल याला ६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

‘कु. लक्ष सात्त्विक आहे. तो शाळेत जातांना सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना प्रार्थना करतो. तो शाळेत जातांना ‘मी कृष्णाच्या समवेत जातो’, असे सांगतो.’
– पू. दीपाली मतकर, सोलापूर (२९.९.२०२४)
१. जन्मापूर्वी

अ. ‘बाळ गर्भात असतांना मी माझ्या पोटावर हात ठेवून भगवद्गीतेचे वाचन करायचे. मी पहाटे ५ वाजता उठून जप करत असे. नामजप करतांना गर्भ नामजपाला चांगला प्रतिसाद द्यायचा.’
– सौ. भक्ती जैस्वाल (कु. लक्षची आई), परळी वैद्यनाथ, जिल्हा बीड
२. जन्मानंतर
२ अ. वय १ ते २ वर्षे
२ अ १. काटकसरीपणा : ‘लक्ष काटकसरी आहे. लक्षचे लहान झालेले कपडे मी एका मुलाला देते. एकदा शिवण उसवलेली पँट मी त्या मुलाला देत असतांना लक्ष मला म्हणाला, ‘‘ही पँट त्याला देऊ नको.’’ मी त्याला सांगितले, ‘‘पँटची शिवण खालच्या बाजूने उसवलेली आहे.’’ तेव्हा तो मला म्हणाला, ‘‘आई शिवून देईल. मग मी ती पँट घालू शकतो.’’
२ अ २. परिस्थिती आनंदाने स्वीकारणे : लक्ष २ वर्षांचा असतांना सतत आजारी पडायचा. त्याला रुग्णालयात न्यावे लागायचे. आधुनिक वैद्यांनी ‘त्याला गोड अल्प प्रमाणात खाण्यास द्या’, असे सांगितल्यापासून आम्ही त्याला गोड पदार्थ अल्प देतो. लक्षसुद्धा कोणी चॉकलेट अथवा गोड पदार्थ दिले, तर खात नाही. आधुनिक वैद्यांनी सांगितले आहे, म्हणून तो घेत नाही. त्याला चॉकलेट आवडत असूनही तो चॉकलेट घेत नाही.
२ अ ३. लहानपणापासूनच देवतांप्रती ओढ असणे
अ. चि. लक्षला लहानपणापासून श्री गणेशाप्रती पुष्कळ ओढ आहे. तो एक वर्षाचा झाल्यानंतर प्रतिदिन श्री गणेशमूर्ती स्वतःच्या जवळ घेऊन झोपायचा, तिच्याशी खेळायचा, बोलायचा आिण जेवणाचे ताट घेऊन गणपतीला जेवू घालायचा. उन्हाळ्यात गणपतीला उष्मा जाणवतो; म्हणून तो पंखा लावून ठेवायचा, तर थंडीच्या दिवसात शाल पांघरायला घालत असे. लक्ष श्री गणेशाची आरतीसुद्धा करायचा आणि गणेशमूर्तीशी संभाषण करायचा.
आ. आम्ही नोकरीच्या निमित्ताने बीडला रहात होतो. तेव्हा त्याला मी मारुतीच्या मंदिरात घेऊन जात असे. मंदिर जवळ असल्यामुळे आम्ही दिवसभरात जेव्हा जायचो, तेव्हा एखाद्या वेळी मंदिराचे दार बंद असेल, तर तो दाराच्या फटीतून डोकावून मारुतीला बघण्याचा प्रयत्न करायचा.
२ अ ४. दिवसभरात होणार्या कृतींशी संबंधित देवतांना भावपूर्ण प्रार्थना करणे : लक्ष २ वर्षांचा झाला. तेव्हापासून प्रतिदिन सकाळी उठल्यावर प्रार्थना करतो. अंघोळ, जेवणे, झोपणे इत्यादी कृती करतांना तो नियमितपणे प्रार्थना करतो. जेवतांना ‘अन्न, म्हणजे श्री अन्नपूर्णा देवीचा प्रसाद आहे’, असा भाव ठेवतो. तो स्नान करतांना जलदेवतेला प्रार्थना करतो. ‘जल म्हणजे ‘श्रीकृष्णाचे चरणतीर्थ आहे’, असा त्याचा भाव असतो. स्नान करतांना तो श्री दत्तांचा नामजप करतो. शेवटी सूर्यनारायणाला नमस्कार करतो.
२ अ ५. साधनेची आवड असणे
अ. आम्ही मनोरा पद्धतीने आवरण काढण्याचे उपाय करत असतांना लक्षने ते शिकून घेतले. झोपतांना अंथरुणावर कापराची पूड टाकणे, गळ्यात श्रीकृष्णाचे पदक घालणे, पायात लाल दोरा बांधून घेणे इत्यादी गोष्टी तो स्वतःहून करतो.
आ. तो पितृपक्षामध्ये त्याच्या आई-बाबांना बोलवून सर्वांना एकत्र बसवून मुद्रा करत नामजप करण्यास सांगतो. इतरांकडून वैखरी वाणीतून (मोठ्याने) नामजप करून घेतो आणि स्वतःही करतो.
२ आ. वय ३ ते ६ वर्षे

२ आ १. नीटनेटकेपणा : त्याच्यामध्ये नीटनेटकेपणा हा गुण आहे. तो शाळेत जातांना स्वतःचे बूट प्रतिदिन कपड्याने पुसतो. शाळेला निघण्यापूर्वी सर्व वस्तू समवेत घेतल्या असल्याची खात्री करतो. बाहेर जातांना तो स्वच्छ इस्त्री केलेले कपडे घालतो. स्वतःचे मोजे स्वच्छ करून व्यवस्थित घड्या घालून ठेवतो. शाळेतून घरी आल्यावर सर्व वस्तू व्यवस्थित ठेवतो. लहान मुलांना खरेतर स्नान करायचा कंटाळा येतो; पण त्याला कधीही कंटाळा येत नाही. तो प्रतिदिन पहाटे ५ वाजता आंघोळ करतो. त्याला शास्त्रात सांगितल्याप्रमाणे कृती करायला आवडतात. दात स्वच्छ करण्यासाठी तो सनातनचे दंतमंजनच वापरतो.
२ आ २. व्यवस्थितपणा : तो शाळेच्या वह्या व्यवस्थित वापरतो. त्याने आतापर्यंत कधीही वहीचे पान फाडले नाही किंवा रेषा मारल्या नाहीत. वहीच्या शेवटच्या पानापर्यंत तो लिखाण करतो.
२ आ ३. ऐकण्याची वृत्ती : लक्ष बीड येथे त्याच्या कुटुंबियांसमवेत रहात असतांना शेजारी कुणी काही खाण्यासाठी दिले असता कधीही घेत नव्हता किंवा स्वतःहून कधीही मागत नव्हता. त्याच्या आईने ‘कुणी पैसे दिले, तर घ्यायचे नाहीत’, असे त्याला सांगितले आहे. तेव्हापासून त्याच्या हातात कुणीही पैसे ठेवले, तर तो ‘नको’ म्हणून रडायचा. घरामध्ये त्याला पैसे ठेवण्यासाठी एक डबा दिला होता. कुणी असे पैसे दिले आणि त्याच्या आईने त्याला ते घेण्यास सांगितले, तर तो ते पैसे त्या डब्यात ठेवायचा.
२ आ ४. परिस्थितीची जाणीव : लहानपणापासून तो पैसे साठवण्याचा त्याचा जो डबा आहे, त्यात गोळ्या-चॉकलेट न आणता त्यांचे पैसे जमा करतो. एकदा घरात काही साहित्य आणायचे होते. तेव्हा आम्ही (मी आणि माझी सून सौ. भक्ती) चर्चा करत होतो आणि बोलता बोलता आम्ही असे बोललो, ‘सध्या पैशांची अडचण आहे, तर साहित्य नंतर आणू.’ लक्षने हे बोलणे लक्षपूर्वक ऐकले आणि त्याने त्याचा पैशांचा डबा माझ्याकडे आणून दिला. त्याने मला सांगितले, ‘‘आजी, हे पैसे तू घे आणि साहित्य आण.’’
२ आ ५. वडिलांना प्रामाणिकपणे दिवसभरात स्वतःकडून झालेल्या चुका सांगणे आणि आईची क्षमा मागणे : त्याचे बाबा कार्यालयातून आल्यावर तो ‘दिवसभरात त्याच्याकडून काय चुका झाल्या ? त्याने आईचे काय ऐकले नाही ?’, अशा सर्व चुका प्रामाणिकपणे सांगतो. लक्षने सांगूनही चूक केली किंवा ऐकले नाही, तर त्याची आई त्याला शिक्षा करते. तेव्हा तो दोन्ही कान पकडून आईची क्षमा मागतो. ‘आता असे करणार नाही’; म्हणून रडतो आणि जोपर्यंत आई त्याला क्षमा करत नाही, तोपर्यंत तो कान धरून क्षमा मागतो.
२ आ ६. इतरांच्या चुका प्रेमाने दाखवून देणे : लक्ष पुष्कळ समजूतदार आहे. आमच्याकडून बोलण्यात काही चुका झाल्या, तर प्रेमाने गोड आवाजात सांगतो. तो घरातल्या सर्वांच्या चुका सांगतो. त्याची चुका सांगण्याची पद्धत अशी आहे की, त्या सर्वांना मान्य होतात. काही चुका आमच्या लक्षात येत नाहीत; पण त्याच्या लक्षात येतात.
२ आ ७. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सनातन संस्थेच्या ११२ व्या समष्टी संत पू. दीपाली मतकर यांच्याप्रती भाव
२ आ ७ अ. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ घरी आल्या असतांना अंघोळ केली नसल्याने त्यांच्यासमोर न येणे : एकदा आमच्या घरी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आल्या होत्या. त्या आल्या, तेव्हा लक्ष झोपला होता. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ निघाल्या. तेव्हा लक्ष त्यांना ‘दादी दादी’; म्हणून हाक मारत होता. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ त्याला ‘ये’, म्हणून बोलावत होत्या; मात्र तो येत नव्हता. मी त्याला घेण्यासाठी खोलीत गेले. तेव्हा लक्ष मला म्हणाला, ‘आजी, मी अंघोळ केली नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर कसे जाऊ ?’ तेव्हा श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनाही त्याचे कौतुक वाटले. त्यांनी त्याला ‘काही होत नाही. ये !’, असे म्हटल्यावर तो आला. त्यांनी लक्षला प्रसाद दिला आणि जवळही घेतले.
२ आ ७ आ. पू. दीपाली मतकर घरी येणार असल्यास स्वच्छतेत साहाय्य करणे : पू. दीपाली मतकर आमच्या घरी आल्यावर लक्ष त्यांच्या अवती-भोवतीच असतो. त्या महाप्रसादाला बसतात. तेव्हा त्यांना पाणी आणून देतो. पू. ताई घरी येण्यापूर्वी आम्ही घराची स्वच्छता करत असलो, तर तो विचारतो, ‘पू. ताई येणार आहेत का ?’ आम्ही ‘हो’, म्हणालो की, तोही आम्हाला साहाय्य करतो. घरातील आसंदी पुसणे, पटल पुसणे, वस्तू जागेवर ठेवणे, खिडक्या पुसणे इत्यादी सेवा स्वतः करतो. पू. ताई येणार आहेत; म्हणून तो आनंदी असतो. अधे-मधे तो अन्य संतांचीही आठवण काढतो.
२ आ ७ इ. संतांच्या सहवासाची ओढ : लक्ष अधेमधे ‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू कधी येतील ?’, असे विचारत असतो. ‘पू. दीपालीताईंना भ्रमणभाषवर संपर्क कर. मला त्यांच्याशी बोलायचे आहे’, असे तो मला सांगतो. संत, सद्गुरु, श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ, पू. दीपाली मतकरताई घरी आल्यावर प्रसाद देतात. तेव्हा लक्ष प्रतिदिन त्यातील थोडा थोडा प्रसाद घेऊन खातो.
२ आ ८. प्रेमभाव
२ आ ८ अ. कुटुंबातील रुग्णाईत व्यक्तीची काळजी घेणे : लक्ष त्याच्या आईची काळजी घेतो. घरामध्ये कुणीही आजारी असले, तर तो प्रेमाने त्यांना पाणी देणे, औषधाची गोळी स्वतः त्यांच्या तोंडात देणे, हात धरून घेऊन जाणे, पुष्कळ प्रेमाने गोड बोलणे इत्यादी कृती करतो.
२ आ ८ आ. आईला ताप आला असतांना तिची काळजी घेणे आणि आजीला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना करण्यास सांगणे : एकदा लक्षची आई ५ – ६ दिवस रुग्णाईत होती. औषधोपचारांनीही तिचा ताप उतरत नव्हता. लक्ष आईची चौकशी करत होता. तिचे डोके दुखत होते; म्हणून तो झंडू बाम घेऊन आईच्या कपाळाला चोळून देत होता. ते झाल्यावर त्याने माझ्याकडून एक वाटी पाणी आणि रुमाल मागितला अन् त्यामागचे कारण विचारल्यावर ‘आईला पुष्कळ ताप आहे; म्हणून तिच्या कपाळावर पाण्यात भिजवून पट्ट्या लावतो’, असे म्हणाला. मी त्याला सर्व साहित्य दिले. तो आईच्या कपाळावर पट्ट्या ठेवत होता. काही वेळाने तो माझ्याकडे आला आणि त्याने मला सांगितले, ‘‘आजी, परम पूज्यांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) प्रार्थना कर, ‘माझ्या आईला लवकर बरे करा.’’
२ आ ९. १५ दिवस काही घंटे घरी एकटा रहाणे : जून २०२३ या कालावधीत मी हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या सेवेला गेले होते. तेव्हा शाळा चालू झाल्या नव्हत्या आणि लक्षच्या आईला (सौ. भक्ती) नोकरीसाठी बाहेर जावे लागत होते. त्याचे बाबाही नोकरीला जायचे आणि त्याचे आजोबा सकाळी दैनिक ‘सनातन प्रभात’चे गठ्ठे आणायला जात असत. अशा वेळी लक्ष एकटाच घरामध्ये रहायचा. तेव्हा तो आईला सांगायचा, ‘तुम्ही सर्व जण बाहेर गेलात, तरी मी घरी दार लावून एकटा बसतो आणि घरही संभाळतो.’ तो सकाळी २ घंटे आणि दुपारी शाळेतून आल्यावर १ – २ घंटे घराची कडी लावून बसायचा. १५ दिवस तो असा एकटा राहिला.
– सौ. संध्या जैस्वाल (कु. लक्षची आजी (वडिलांची आई), परळी वैद्यनाथ, जिल्हा बीड. (२५.९.२०२४)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.