निरोगी जीवनासाठी व्यायाम – ३४
आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांमधील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो. या लेखमालेतून आम्ही व्यायामाचे महत्त्व, व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन, ‘अर्गोनॉमिक्स’ (ergonomics) चे तत्त्व, आणि आजारानुसार योग्य व्यायाम यांची माहिती सादर करणार आहोत.
या लेखाच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/860842.html
व्यायामाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा हा प्रवास प्रेरणादायी ठरेल. ‘पचन चांगले होण्यासाठी व्यायामाचे साहाय्य कसे होते ?’, ते आपण या लेखात पाहूया. (भाग १)
१. शरिराला आवश्यक ते पोषण मिळवून देण्याचे कार्य पोट करत असणे
‘अनेक शास्त्रांनुसार पोटाला आरोग्याचा केंद्रबिंदू मानला जाते. ‘कोणत्याही रोगाची उत्पत्ती पोटातून होते’, असे अनेक शास्त्रज्ञांचे मत आहे. शारीरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष दिले जाते; कारण त्यातून शरिराला आवश्यक ते पोषण मिळवून देण्याचे कार्य पोट करत असते. पोट बिघडल्यास शरीरयष्टी सुधारण्याचे स्वप्नही पहाणे कठीण होते.
२. आतड्यांमधील सूक्ष्म जीव आतड्यांची एकसंधता टिकवून ठेवण्यास सहाय्य करत असणे.
अन्नपचनाच्या कार्यात पोट आणि यकृत या शरिरातील अवयवांच्या समवेत आतड्यांतील सूक्ष्म जीवही आपला हातभार लावतात. हे सूक्ष्म जीव अन्नपचन व आतड्यांचे स्वास्थ्य चांगले ठेवणे यासाठी आवश्यक असलेली रसायने निर्माण करतात ही सूक्ष्म जीव आतड्यांची एकसंधता टिकवून ठेवण्यास सहाय्य करतात.
३. व्यायामामुळे आतड्यांमधील सूक्ष्म जिवाणूंच्या कार्यक्षमतेत सुधारणा होत असणे
‘व्यायामाचा पोटातील अवयव आणि आतड्यांतील सूक्ष्म जिवाणूंवर होणारा प्रभाव’, हा सध्या संशोधनाचा एक महत्त्वाचा विषय आहे. आतापर्यंतचे संशोधन सूचित करते की, व्यायामामुळे आतड्यांमधील सूक्ष्म जिवाणूंच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते. त्यामुळे जळजळ न्यून होऊन पोषण प्रक्रिया सुधारते आणि मानसिक आरोग्यासही चालना मिळते. ‘सूक्ष्म जिवाणू कशा प्रकारे आतड्यांचे स्वास्थ्य सुधारतात ?’, ते पुढे दिले आहे.
४. सूक्ष्म जिवाणूंचा आतड्यांवर होणार परिणाम
४ अ. अलीकडे अनेक रासायनिक घटक अन्नात घातले जात असल्यामुळे आतड्यांमध्ये सूक्ष्म छिद्रे निर्माण होऊन आतडे दुर्बल होणे : सध्या अन्नाची गुणवत्ता खालावत आहे, तसेच अनेक रासायनिक घटक अन्नात घातले जात असल्यामुळे आतड्यांमध्ये सूक्ष्म छिद्रे निर्माण होऊन आतडे दुर्बल होते. अशा स्थितीत अन्नातील काही अनावश्यक घटक (अन्नाचे काही अणू, जिवाणू आणि विषारी पदार्थ) रक्तप्रवाहात प्रवेश करून अनेक आजार निर्माण करतात.
४ आ. व्यायामामुळे सूक्ष्म जिवाणू अधिक कार्यक्षम होऊन त्यांनी आतड्यांस दुर्बल होण्यापासून परावृत्त करणे : आतड्यांमधील सूक्ष्म जिवाणू ‘ब्यूटिरेट’ (Butyrate)सारखी रसायने निर्माण करतात. जी आतड्यांची अखंडता राखण्यासाठी महत्त्वाची ठरतात. व्यायामामुळे हे सूक्ष्म जिवाणू अधिक कार्यक्षम होतात आणि आतडे दुर्बल होण्यापासून परावृत्त करतात.
५. ग्रहणी (Irritable bowel syndrome) आणि अन्य पित्तकारक रोग टाळणे
आपल्या खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे किंवा मूलभूत प्रकृतीमुळेही ग्रहणी आणि अन्य पित्तकारक रोग होतात. या रोगांमध्ये आतडे अन्नातील पोषक घटक शोषून घेण्यास असमर्थ होतात आणि व्यक्ती अशक्त होऊ लागते. आतड्यांतील बिघडलेली पित्तप्रकृती हे त्यामागील प्रमुख कारण असते. यामुळे आतड्यांमध्ये जळजळ (Inflammation) होण्याचे आणि सूज येण्याचे प्रमाण वाढते.’
(क्रमशः १३ डिसेंबर या दिवशी)
– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा. (७.१२.२०२४)
निरोगी जीवनासाठी ‘व्यायाम’ या सदरात प्रसिद्ध होणारे सर्व लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/tag/exercise