आज भारतीय नौदल दिन आहे. त्या निमित्ताने…
३ डिसेंबर १९७१ या दिवशी भारताच्या १० विमानतळांवर ‘प्री-एम्प्टीव्ह’ आक्रमण (शत्रूचे आक्रमण होण्यापूर्वीच त्याच्या सैन्यबळाची शक्ती न्यून किंवा नष्ट करण्यासाठी हवाई आक्रमण योजणे) करून पाकिस्तानने भारतावर लादलेले युद्ध १६ डिसेंबर १९७१ या दिवशी पूर्व पाकिस्तानातील ९३ सहस्र पाकिस्तानी सैनिकांच्या शरणागतीने समाप्त होऊन भारताचा प्रचंड विजय झाला.
भारतीय सशस्त्र सेनादलांच्या अप्रतिम समन्वयामुळे ते युद्ध निर्णायक होऊ शकले. त्या युद्धामधील भारतीय स्थलसेना आणि वायुसेना यांच्या कार्याची वर्णने सर्वश्रुत आहेत. त्या युद्धात भारतीय नौसेनेचे योगदान अवर्णनीय होते; मात्र त्याविषयी फारसे लेखन झालेले नाही. अत्यंत वेगाने आणि अतिशय अल्प वेळेत भारतीय नौसेनेने प्रथम बंगालच्या उपसागरात आणि नंतर अरबी समुद्रात स्वतःच्या आरमारी सज्जतेची जबरदस्त चुणूक दाखवली. भारतीय नौसेनेने यशस्वीरित्या केलेले चित्तगाव बंदरावरील आक्रमण, तसेच कराची बंदराची केलेली कडेकोट नाकेबंदी यांच्या युद्धकथा अविस्मरणीय आहेत. अनेक पाकिस्तानी युद्धनौका आणि पाणबुड्या यांना भारतीय नौसेनेने दिलेल्या जलसमाध्या या त्यांचे अतुलनीय साहस दर्शवतात. वर्ष १९७१ मध्ये मी ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ आणि ‘आय.एन्.एस्. म्हैसूर’ या युद्धनौका, तसेच पाणबुडीविरोधी विनाशिका ‘आय.एन्.एस्. कुठार’वर विविध दायित्वांसाठी तैनात होतो. त्याच्या पुढील वर्षी मी ‘आय.एन्.एस्. वाघली’ आणि ‘आय.एन्.एस्. वेला’ या पाणबुड्यांचे नेतृत्व केले.
लेखक : कमांडर विनायक शंकर आगाशे (निवृत्त), भारतीय नौसेना, नाशिक
१. वर्ष १९७१ चे युद्ध म्हणजे राष्ट्रीय उद्दिष्ट आणि संघभावनेतून युद्ध कसे प्रबोधक ठरू शकते, याचा प्रत्यय देणारे !
३ ते १६ डिसेंबर १९७१ या १४ दिवसांच्या भारत-पाकिस्तानच्या त्या अभूतपूर्व युद्धाच्या वेगवान घडामोडींनी भारतीय सशस्त्र सेनादलांमधील वातावरण ढवळून निघाले होते. धोरणात्मक व्यूहरचना, युद्धाच्या वेगवान हालचाली आणि अत्युत्तम समन्वय या ३ कारणांनी ते युद्ध अविस्मरणीय ठरले. भारतीय सशस्त्र सेनादलांमधील विलक्षण समन्वय हे युद्ध जिंकण्यामागील प्रमुख कारण होते. भारतीय सशस्त्र सेनादलांच्या कर्तृत्वाने हिंदुस्थानी उपखंडाचा राजकीय-भौगोलिक नकाशा पालटणारे ते निर्णायक युद्ध होते. त्यातूनच बांगलादेशाची निर्मिती झाली. तो केवळ लढाईतील विजय नव्हता, तर राजकीय इच्छाशक्तीतून राष्ट्रीय उद्दिष्ट कसे साधले जाऊ शकते आणि संघभावनेतून युद्ध कसे प्रबोधक ठरू शकते, यांचा प्रत्यय देणारे ते युद्ध होते. ‘या युद्धाशी आपला स्वतःचा घनिष्ठ संबंध असल्यामुळे त्या अभिमानास्पद क्षणांची वारंवार आठवण येऊन भारतीय नौसेना अधिकारी म्हणून स्वतःचे आयुष्य सार्थकी लागले’, अशा गौरवाच्या भावना त्या निमित्ताने दाटून येतात.
२. पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान यांच्यातील वाढते क्रौर्य अन् भारताची झालेली डोकेदुखी
वर्ष १९४७ मध्ये झालेल्या हिंदुस्थानच्या फाळणीनंतर पूर्व बंगाल हा बंगाली भाषिक प्रांत पूर्व पाकिस्तान बनला. तेथील लोकसंख्या साधारण तीन-चतुर्थांश मुसलमान आणि एक चतुर्थांश हिंदु अशी होती. त्या प्रांताच्या सभोवताली असलेल्या भारताच्या भूभागाच्या तुलनेमध्ये पूर्व बंगालचा भूभाग बराच लहान असून राजकीय, आर्थिक किंवा लष्करी दृष्ट्याही विशेष प्रभाव नसलेला होता. किंबहुना सहस्रो किलोमीटर दूरवरून राज्य करणार्या उर्दू भाषिक पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी पूर्व बंगालकडे सतत दुर्लक्ष केल्याच्या भावनेतून पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानात एक अदृश्य तणाव कायम होताच. पाकिस्तानचे लष्करी अध्यक्ष जनरल याह्या खान यांनी वर्ष १९७० मध्ये घेतलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पूर्व पाकिस्तानमध्ये जनादेश असलेल्या ‘अवामी लीग’ या पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले (पूर्व पाकिस्तानची लोकसंख्या पश्चिम पाकिस्तानपेक्षा अधिक असल्याने तेथे नॅशनल असेंब्लीच्या जागा पश्चिम पाकिस्तानपेक्षा अधिक होत्या). अवामी लीगच्या निवडणूकपूर्व घोषणापत्रात व्यक्त केलेली पूर्व पाकिस्तानचे सार्वभौमत्व ही अवामी लीगची बांधिलकी होतीच. पश्चिम पाकिस्तानातील लष्करी सत्तेला आणि राजकीय पुढार्यांना (झुल्फिकार अली भुट्टो अन् त्यांची ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ यांना) ते सहन होणारे नव्हते.
निवडणुकीनंतर सरकार कुणी बनवायचे, यावरील त्यांच्या वाटाघाटी अयशस्वी झाल्यानंतर शेख मुजिबुर रहमान यांच्यासह अवामी लीगच्या अनेक बंगाली नेत्यांना अटक करून तुरुंगात डांबण्यात आले. २५ मार्च १९७१ या दिवशी पाकिस्तानी लष्करी अध्यक्ष जनरल याह्या खान यांनी ‘मार्शल लॉ’ (लष्करी कायदा) घोषित करून पूर्व बंगालवर एक क्रूर लष्करी वरवंटा फिरवण्यास प्रारंभ केला. पाकिस्तानी सेनेद्वारे पूर्व पाकिस्तानमधील प्रत्येक आंदोलन दडपण्यात आले. परिणामतः स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लक्षावधी निर्वासित पूर्व पाकिस्तानातून लगतच्या भारतामध्ये पलायन करू लागले. विशेषतः पूर्व पाकिस्तानच्या जवळच्या भारतीय जिल्ह्यांना या निर्वासितांच्या लोंढ्यांना आसरा देणे प्राप्त झाले. निर्वासितांच्या या सर्वव्यापी लोंढ्यांमुळे लगतच्या भारतीय भागांमध्ये सांप्रदायिक, भौगोलिक आणि राजकीय तणाव प्रचंड प्रमाणात वाढला. निर्वासितांचा हा आगडोंब भारत सरकारला नुसती डोकेदुखीच ठरला नाही, तर परिस्थिती वेगाने हाताबाहेर जात असल्याचा निदर्शकही होता.
पाकिस्तानी सैन्याचे पूर्व पाकिस्तानातील लष्करी क्रौर्य दिवसेंदिवस वाढतच होते. त्याविषयी जागतिक मत बनावे; म्हणून भारताने अतोनात प्रयत्न केले. ‘अराजकता थांबवून निर्वासितांचे लोंढे आपापल्या जागी परततील, अशी परिस्थिती पाकिस्तानी धुरंधरांनी निर्माण करावी’, म्हणून केलेल्या भारताच्या आवाहनाला फारच तोकडा प्रतिसाद मिळाला. भारताच्या अडचणींविषयी आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये कुणालाही काहीही कर्तव्य नव्हते. आंतरराष्ट्रीय माध्यमे जेव्हा निर्वासितांची दृश्ये दाखवू लागली, तेव्हा जगाला थोडीशी जाग आली; परंतु त्यामागे ‘निर्वासित परतावे’, असा हेतू नसून केवळ निर्वासितांना साहाय्य मिळावे एवढेच लक्ष्य होते. त्यामुळे निर्वासितांचा मूळ प्रश्न तसाच धगधगत राहिला.
३. महत्त्वाच्या ३ घटना
या कालावधीत घडलेल्या महत्त्वाच्या ३ घटना विचारात घेतल्या पाहिजेत.
अ. निर्वासितांमध्ये पाकविषयी वाढता सूडाग्नी : निर्वासित पूर्व बंगालमध्ये असतांना अनेकांच्या बायकांची अब्रू लुटण्याच्या आणि त्यांची घरे उध्वस्त करण्याच्या अनेक घटना पाकिस्तानी सैनिकांकडून सर्रास घडल्या होत्या. त्या निर्वासितांचे विविध गट भारतातील निर्वासित छावण्यांमध्ये रहात होते आणि त्यांच्या मनांत सूडाची आग धुमसत होती. तेच गट पुढे ‘बंगाली मुक्ती वाहिनी’चे स्वातंत्र्यसैनिक म्हणून काम करू लागले होते. पाकिस्तानी छळवादातून पूर्व बंगालची मुक्तता करून स्वतःची मायभूमी ‘स्वतंत्र बांगलादेश’ म्हणून घोषित करण्याचा त्यांचा उद्देश होता. पाकिस्तानी सेनेतील पूर्व बंगाली सैनिक आणि अधिकारी मूलतः बंगाली होते. ते सर्वजण पाकिस्तानी सेनेतील अनुभव घेतलेले होते. त्यांपैकी काही जणांना त्यांची निष्ठा पाकिस्तानी सैन्याशी नसल्याची शंका आल्यामुळे त्यांना पाकच्या सेनेतून काढले होते. बर्याच बंगाली नौसेनेचे अधिकारी आणि नौसैनिक यांची अवस्था काहीशी तशीच होती. बंगाली स्वातंत्र्यसैनिकांच्या गनिमी कारवायांमुळे डिसेंबर १९७१ पूर्वी त्या भागांतील वीजनिर्मिती केंद्रांची पडझड झालेली होती, तसेच दूरसंचार यंत्रणा, पूल, बंदरे, जहाजे यांचीही हानी झालेली होती.
(क्रमशः)
भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/860459.html