३ ते १६ डिसेंबर १९७१ या कालावधीत भारताचे पाकच्या विरोधात युद्ध झाले. त्यात मिळालेल्या विजयाच्या निमित्ताने…
३ डिसेंबर १९७१ या दिवशी भारताच्या १० विमानतळांवर ‘प्री-एम्प्टीव्ह’ आक्रमण (शत्रूचे आक्रमण होण्यापूर्वीच त्याच्या सैन्यबळाची शक्ती न्यून किंवा नष्ट करण्यासाठी हवाई आक्रमण योजणे) करून पाकिस्तानने भारतावर लादलेले युद्ध १६ डिसेंबर १९७१ या दिवशी पूर्व पाकिस्तानातील ९३ सहस्र पाकिस्तानी सैनिकांच्या शरणागतीने समाप्त होऊन भारताचा प्रचंड विजय झाला. भारतीय सशस्त्र सेनादलांच्या अप्रतिम समन्वयामुळे ते युद्ध निर्णायक होऊ शकले.
४ डिसेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘वर्ष १९७१ चे युद्ध म्हणजे राष्ट्रीय उद्दिष्ट आणि संघभावनेतून युद्ध कसे प्रबोधक ठरू शकते, याचा प्रत्यय देणारे आणि पूर्व अन् पश्चिम पाकिस्तान यांच्यातील वाढते क्रौर्य आणि भारताची झालेली डोकेदुखी’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
लेखक : कमांडर विनायक शंकर आगाशे (निवृत्त), भारतीय नौसेना, नाशिक
भाग २
भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/860098.html
३. महत्त्वाच्या ३ घटना
या कालावधीत घडलेल्या महत्त्वाच्या ३ घटना विचारात घेतल्या पाहिजेत. यातील ‘निर्वासितांमध्ये पाकविषयी वाढता सूडाग्नी’, ही पहिली घटना ४ डिसेंबर या दिवशी वाचली.
आ. पाकिस्तानची संरक्षण व्यूहरचना : दुसरी घटना, म्हणजे पाकिस्तानने आक्रमण केलेच, तर संभाव्य धोका ओळखून भारताने स्वसंरक्षणार्थ करावयाच्या कारवाईचेही नियोजन सिद्ध केले होते. निर्वासितांनी परतावे म्हणून पूर्व बंगालमध्ये काही धडक लष्करी कारवाई करावी का ? याचीही गंभीरपणे चाचपणी चालू होती. पाकिस्तानच्या संरक्षण व्यूहरचनेत पूर्व पाकिस्तानपेक्षा पश्चिम पाकिस्तानच्या सीमेवर स्वतःचे भयावह अस्तित्व दाखवण्यावर अधिक भर होता.
इ. अमेरिकेने चीनशी जवळीक करण्याचा प्रयत्न करणे : तिसरी घटना ही अधिक लक्षणीय म्हणावी लागेल. आंतरराष्ट्रीय पातळीवरची भौगोलिक-राजकीय समीकरणे किंवा परस्पर संबंधांमधील पालटत्या छटा स्पष्ट दिसत होत्या. व्हिएतनाममधील गुंता सुटावा म्हणून वर्ष १९७१ मधील चीनशी जवळीक करण्यासाठी अमेरिका पावले उचलत होती. तत्कालीन ‘द सेंट्रल ट्रीटी ऑर्गनायझेशन’ (सी.एन्.टी.ओ. – ब्रिटन, इराण, पाकिस्तान आणि तुर्की यांची एकत्रित एक सुरक्षा संस्था) मधील एक सदस्य म्हणून पाकिस्तान चीनशी जवळीक साधून होता. ‘आपल्या जवळीकीचा लाभ अमेरिकेने चीनशी जवळीक करण्यासाठी घ्यावा’, अशी पाकिस्तानची क्लृप्ती होती. त्या सक्रीयतेचा परिणाम लवकरच दिसून आला. वर्ष १९७१ च्या उत्तरार्धात अमेरिकेने पाकिस्तानधार्जिणे धोरण स्पष्ट केले. त्याला प्रतिशह म्हणून ऑगस्ट १९७१ मध्ये भारताने रशियाशी मैत्रीकरार केला. खरेतर वर्ष १९६९ पासूनच त्याविषयी चर्चा चालू होती.
४. वर्ष १९७१ मध्ये सैन्यात असलेले विविध उत्तरदायी अधिकारी
या कालावधीत भारतीय संरक्षण क्षितिजावर कोण कोण धुरंधर होते, हेही एकदा पाहिले पाहिजे. भारतीय सेनादलाचे प्रमुख होते जनरल सॅम माणेकशॉ, तर भारतीय नौसेना प्रमुख होते अॅडमिरल एस्.एम्. नंदा आणि भारतीय वायुसेना प्रमुख होते एअर चीफ मार्शल पी.सी. लाल. तिन्ही सेनादलांच्या समन्वयाचे प्रमुख उत्तरदायित्व ‘चीफ ऑफ स्टाफ’ (सैन्यदलप्रमुख) कमिटीचे अध्यक्ष म्हणून जनरल सॅम माणेकशॉ यांच्याकडे होते. नौसेनेच्या पश्चिम विभागाचे प्रमुख (फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ) होते अॅडमिरल एस्.एम्. कोहली. पूर्व नेव्हल-कमांडचे उत्तरदायित्व व्हाईस अॅडमिरल एन्. कृष्णन यांचे होते. दक्षिण नेव्हल-कमांडचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल व्ही.ए. कामत होते. प्रत्यक्ष समुद्रामध्ये नौसेनेच्या पश्चिमी फ्लीटचे नेतृत्व व्हाईस अॅडमिरल कुरुविला, तर पूर्व-फ्लीटचे नेतृत्व व्हाईस अॅडमिरल एस्.एच्. शर्मा करत होते.
५. युद्धाच्या अनुषंगाने जनरल सॅम माणेकशॉ यांनी परिस्थितीचे केलेले विश्लेषण
एप्रिल १९७१ मध्ये देहलीमध्ये भारत सरकारच्या मंत्रीमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक चालू होती. त्यात जनरल माणेकशॉ यांची विशेष उपस्थिती होती. ‘पूर्व पाकिस्तानचा बिकट प्रश्न सोडवण्यासाठी युद्धाची आवश्यकता भासली, तर विजयाची खात्री देऊ शकता का ?’, असा सरळ प्रश्न पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जनरल माणेकशॉ यांना विचारला. ‘युद्धासाठी परिस्थिती प्रतिकूल आहे’, असे रोखठोक उत्तर जनरल माणेकशॉ यांनी दिले. एप्रिल महिना संपत आला आहे. मॉन्सून नजीक येऊन ठेपला आहे. पूर्व पाकिस्तानातील नद्या पावसाळ्यात महासागरासारखे उग्ररूप धारण करतात. अशा परिस्थितीत सैन्याची वाहतूक आणि युद्धसामुग्रीचे दळणवळण करण्यास अवघड होईल. त्यात महत्त्वाचा वेळही जाईल. दुसरे म्हणजे सध्या सैन्यदलाचे रणगाडे बाबिना आणि सिकंदराबाद परिसरात आहेत. अन्य सैन्य देशभरात पसरलेले आहे. ते सैन्य पश्चिम आणि पूर्व पाकिस्तानच्या सीमांवर त्वरित स्थलांतरित करावे लागेल. त्यासाठी सर्व रेल्वेमार्ग वापरावे लागतील. बैठकीत उपस्थित असलेले कृषीमंत्री फकरुद्दीन अली अहमद यांच्याकडे वळून जनरल माणेकशॉ म्हणाले, ‘सध्या शेतांमध्ये धान्य सिद्ध आहे.
खळ्यातील सर्व धान्य बाजारपेठेत पोचले नाही, तर ते शेतातच खराब होऊन जाईल आणि दुष्काळ पडण्याचे खापर तुम्ही सैन्यावर टाकाल.’ जनरल माणेकशॉ यांच्या प्रतिपादनात जरब होती. त्यांनी तिसरे व्यूहात्मक महत्त्वाचे सूत्र स्पष्ट केले, ‘आपण जर आता लगेच युद्धाचा निर्णय घेतला, तर चारही सीमांवर आपल्याला सैन्य तैनात करण्याची आवश्यकता लागेल; परंतु नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत थांबलो, तर उत्तर सीमेची काळजी कडाक्याची थंडी आणि गोठलेला हिमालयच घेतील.’ पंतप्रधानांना ते तर्कशुद्ध विवेचन पटले. युद्धासाठी नोव्हेंबर अखेरपर्यंत थांबण्याचा निर्णय झाला. खंबीर आणि निर्णायक हस्तक्षेपाच्या सिद्धतेला वेग आला.
६. पाकिस्तानची युद्धाची सिद्धता आणि भारताची स्थिती
तिकडे पाकिस्तानची युद्धाची सिद्धता जोरदार चालली होती. समुद्राच्या पृष्ठावर राहून कार्य करणार्या जहाजांविषयी पाकिस्तानची सिद्धता जवळजवळ भारताशी तुल्यबळ होती; परंतु ‘पाण्याखालून’ मारा करण्याच्या शस्त्रसज्जतेविषयी पाकिस्तान काकणभर सरस होते. त्याचे एक कारण होते, वर्ष १९६३ मध्ये अमेरिकेने पाकिस्तानला एक पाणबुडी भाडेतत्वावर देण्याचे ठरवले होते. त्या करारानुसार ‘डायाब्लो’ नावाची २ सहस्र ५०० टन वजनाची पाणबुडी अद्ययावत् करून अमेरिकन नौसेनेने १ जून १९६४ या दिवशी पाकिस्तानला दिली होती. त्या पाणबुडीचा संरचनात्मक दर्जा ‘फ्लीट स्नॉर्केल’चा (पाण्याखाली पाणबुडीला शुद्ध हवेचा पुरवठा होऊ शकणारी यंत्रणा) होता. त्या पाणबुडीचे नामकरण पाकिस्तानने ‘पी.एन्.एस्. गाझी’ असे केले होते. याखेरीज पाकला फ्रान्स सरकारने ३ ‘डाफने’ दर्जाच्या पाणबुड्या दिल्या होत्या. ऑगस्ट १९७० पर्यंत त्या तिन्ही पाणबुड्या पाकिस्तानी नौसेनेत भरती झाल्या होत्या. पाकने आणखी ६ ‘मिडगेट’ पाणबुड्या (१५० टनांपेक्षा अल्प वजनाच्या) आणि ६ ‘चॅरियट’ पाणबुड्या घेतल्या होत्या. ‘चॅरियट’ पाणबुड्या ‘लिंपेट-माईन्स’ने शस्त्रसज्ज होत्या.
दुसरे महायुद्ध संपतांना जर्मनीने केलेल्या डिझाईनच्या ‘यू १२८’ पाणबुड्या भारताने रशियाकडून वर्ष १९६९-१९७० मध्ये प्रशिक्षणासाठी घेतल्या होत्या. त्यांची नावे ‘आय.एन्.एस्. कालवेरी’, ‘आय.एन्.एस्. खंदेरी’, ‘आय.एन्.एस्. करंज’ आणि ‘आय.एन्.एस्. कुरसुरा’ अशी होती, तसेच महत्त्वपूर्ण मुंबई बंदराच्या संरक्षणासाठी म्हणून ८ क्षेपणास्त्रांच्या बोटी भारतीय नौसेनेकडे होत्या; मात्र त्या बंदरापासून फार दूर जाऊ शकत नव्हत्या.
(क्रमशः)
भाग ३. वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/860663.html