रियाध (सौदी अरेबिया) – यावर्षी सौदी अरेबियात फाशीच्या शिक्षेच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. वर्ष २०२४ मध्ये आतापर्यंत १०० हून अधिक परदेशी नागरिकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या देशांमध्ये पाकिस्तान, सीरिया, इराण आणि येमेन यांचा समावेश आहे. यासह सौदी अरेबियाने फाशीची शिक्षा ठोठावण्यातील त्याचे पूर्वीचे सर्व विक्रम मोडले आहेत. ही संख्या वर्ष २०२३ आणि २०२२ च्या आकड्यांच्या जवळपास ३ पट आहे. यापूर्वी सौदी अधिकार्यांनी प्रतिवर्षी ३४ परदेशी लोकांना फाशीची शिक्षा सुनावली होती.
सौदी अरेबियाने वर्षभरात कधीही १०० परदेशी लोकांना फाशी दिलेली नाही. फाशीच्या शिक्षेसारख्या अत्यंत कठोर शिक्षा दिल्याबद्दल सौदी अरेबियाला नेहमीच टीकेचा सामना करावा लागला आहे.
२१ पाकिस्तानींना फाशी
यावर्षी सौदी अरेबियात फाशी देण्यात आलेल्या परदेशी नागरिकांची सर्वाधिक संख्या पाकिस्तानी नागरिकांची आहे. वर्ष २०२४ मध्ये सौदी अरेबियात २१ पाकिस्तानी नागरिकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर येमेनचे २०, सीरियाचे १४, नायजेरियाचे १०, इजिप्तचे ९, जॉर्डनचे ८ आणि इथिओपियाचे ७ आहेत. फाशीची शिक्षा सुनावलेल्यांमध्ये भारताच्या ३ नागरिकांचाही आहेत. यांपैकी अनेकांना अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
एका येमेनी नागरिकाला नजरानच्या नैऋत्य भागात फाशी देण्यात आल्याची माहिती अधिकृत प्रसारमाध्यम यंत्रणेने दिली. देशात अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले होते. यावर्षी क्वचितच असा कोणताही महिना होता, जेव्हा सौदी अरेबियात कोणत्याही परदेशी नागरिकाला फाशीची शिक्षा सुनावली गेली नव्हती.
संपादकीय भूमिकाअशा प्रकारच्या कठोर शिक्षा देण्यात येत असल्याने सौदी अरेबियासारख्या देशात कायदा आणि सुव्यवस्था चांगली आहे. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात पर्यटक जातात. भारतातही अशीच शिक्षा करण्याची आवश्यकता आहे ! |