Sardar Vallabhbhai Patel Land Case : गुजरातमधील सरदार पटेल यांची १५० गुंठे भूमी हडप करणार्‍या तिघांना २ वर्षांचा कारावास !

१३ वर्षांनी निकाल

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल

कर्णावती – गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील गडवा गावात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० गुंठे वडिलोपार्जित भूमी फसवणूक करून हडप केल्याच्या प्रकरणी ३ आरोपींना २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. महेमदाबाद न्यायालयाचे न्यायाधीश विशाल त्रिवेदी यांच्या न्यायालयाने भूपेंद्रभाई देसाईभाई दाभी, देसाईभाई जेहाभाई दाभी आणि प्रतापभाई शकरभाई चौहान यांना २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी हिराभाई दाभी यांचे निधन झाले. खटला प्रविष्ट (दाखल) झाल्यानंतर जवळपास १३ वर्षांनी न्यायालयाचा निर्णय आला.

१. सर्व दोषींनी वर्ष २००८ मध्ये महसूल नोंदींमध्ये छेडछाड करून नाव पालटण्याचा प्रयत्न केला होता; परंतु तो अयशस्वी झाला.

२. वर्ष १९३५ पासून खेडा जिल्ह्यातील गडवा गावातील ही भूमी श्री गुजरात प्रांत समितीचे प्रमुख वल्लभभाई झावरभाई पटेल यांच्या नावावर होती. वर्ष १९५१ ते २००९-१० पर्यंतच्या नोंदींमध्ये, त्याचे मालक वल्लभभाई पटेल असल्याचे म्हटले गेले होते.

३. वर्ष २०१० मध्ये सरकारी नोंदींचे संगणकीकरण करतांना वल्लभभाई पटेल यांच्या नावातून ‘श्री गुजरात प्रांत समिती प्रमुख’ हे शब्द काढून टाकण्यात आले. याचा लाभ घेत फसवणूक करणार्‍यांनी बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला. चौकशीच्या वेळी हा घोटाळा उघडकीस आला.

संपादकीय भूमिका

  • भारतात महापुरुषांच्या मालकीची भूमी अशा प्रकारे हडप होत असेल, तर सामान्य जनतेचे काय होत असेल ?, याचा विचारही न केलेला बरा !
  • १३ वर्षांनी मिळणारा न्याय हा अन्यायच आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?