कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) – भारताच्या रशियासमवेतच्या चांगल्या संबंधांचा आंतरराष्ट्रीय समुदायाला लाभ होत आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी केले नसते, तर जागतिक बाजार पूर्णपणे नष्ट झाला असता. जगात ऊर्जेचे संकट आले असते, जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती गगनाला भिडल्या असत्या आणि जगभर महागाई शिगेला पोचली असती, अशी स्पष्टोक्ती भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली.
जयशंकर पुढे म्हणाले की, भारताचे रशियासमवेतचे चांगले संबंध रशिया आणि युक्रेन यांच्यात चर्चा प्रारंभ करण्यास साहाय्य करू शकतात. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी भारताचे चांगले संबंध आहेत. अशा परिस्थितीत भारत युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांशी चर्चा करण्यास सक्षम आहे. जगाला आणि अगदी ऑस्ट्रेलियालाही अशा देशाची आवश्यकता आहे, जो युद्धाला चर्चेच्या पटलावर (टेबलावर) आणण्यास साहाय्य करू शकेल. बहुतांश युद्धे वाटाघाटीच्या पटलावर संपतात, असेही जयशंकर म्हणाले.