संपादकीय : नरकासुरांचे दहन !

आज नरकचतुर्दशी ! आज पहाटे नरकासुराचा प्रतिकात्मक वध करण्यासाठी कारिट पायाखाली चिरडण्यात आलेच असेल. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. अधर्मावर धर्माचा विजय मिळवण्याचाच आजचा दिवस आहे. सनातन वैदिक हिंदु धर्माच्या इतिहासामध्ये असे अनेक दिवस आहेत, ज्या दिवशी अधर्मावर धर्माने विजय मिळवला. रामायण, महाभारत, देवी माहात्म्य इतकेच नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंतच असे अनेक दिवस सांगता येतील. या सर्वांचा अर्थ एकच आहे की, अधर्माचा नाश केल्याविना धर्माला जय मिळत नाही. येथे कुठल्याही प्रकारची गांधीगिरी केल्यामुळे धर्माचा विजय होतो, असे एकही उदाहरण नाही. ‘गांधीगिरी म्हणजे धर्मावर अधर्माचा विजय किंवा त्याला शरण जाऊन मांडलीक होण्यासारखे आहे.’ हा सनातन वैदिक हिंदु धर्माचा इतिहास नाही किंवा शिकवणही नाही; परंतु गेल्या १०० वर्षांत, म्हणजे वर्ष १९२० मध्ये लोकमान्य टिळक यांचे निधन आणि मोहनदास गांधी यांचा उदय झाल्यापासून आज हिंदु धर्माला अधर्माच्या ठिकाणी बांधून ठेवले जात आहे. एका गालावर कुणी मारले, तर दुसरा गाल पुढे करण्याची शिकवण हिंदु धर्माची नाही. खर्‍या संतांचीही नाही. संतांनी असे कुठे कुणाला सांगितले असेल, तर त्यामागील नेमका अर्थ समजून घ्यावा लागेल. स्थळ आणि काळ सापेक्ष काही गोष्टी सांगितल्या जातात; मात्र ती शिकवण होऊ शकत नाही. विश्वामित्रऋषि यांनी स्वतः राजा दशरथाकडे जाऊन यज्ञात विघ्न आणणार्‍या राक्षसांचा वध करण्यासाठी भगवान श्रीरामांना घेऊन जाण्याची मागणी केली होती आणि ते श्रीरामांना घेऊन गेले अन् नंतर श्रीरामांनी अनेक राक्षसांचा वध केला. हीच हिंदु सनातन वैदिक धर्माची शिकवण आहे. गेल्या काही वर्षांत हिंदूंमध्ये खर्‍या धर्माचे ज्ञान पसरत असल्याने काही प्रमाणात हिंदु या आत्मघाती शिकवणीतून बाहेर पडू लागले आहेत आणि अधर्मियांना वैध भाषेत उत्तर देऊ लागले आहेत. हिंदूंना धर्म आणि अधर्म यांचे आता हळूहळू ज्ञान होऊ लागले आहे. हिंदु धर्माचे वैरी कोण आणि हिंदु धर्माचे खरे रक्षक कोण ?, हेही काही काळानंतर हिंदूंच्या लक्षात येईल.

जिहादी नरकासुरांवर कारवाई

गेल्या १ सहस्रहून अधिक वर्षे सनातन वैदिक हिंदु धर्मासाठी वाईट ठरलेले आहेत. आता या १ सहस्र वर्षांच्या वाईट काळाचा शेवट होणार आहे. हा काळ अत्याधिक संघर्षाचा असण्यासह विजयाचाही असणार आहे. महाभारताचे युद्ध १८ दिवस चालले, श्रीरामांनी ९ दिवसांच्या युद्धानंतर रावणाचा वध केला, तर श्री दुर्गादेवीने नवरात्रीत महिषासुराशी युद्ध करून त्याचा वध केला. आताही अधर्माच्या काळाचा अखेर होऊ लागला आहे. ही अटीतटीची लढाई आहे. यात सनातन वैदिक हिंदु धर्माचे पालन करणार्‍यांना अत्यंत सतर्क राहून अधर्मियांशी लढावे लागणार आहे. या लढाईमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदूंना लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. बांगलादेशात ती दिसून येत आहे. भारतातही हीच स्थिती आहे. ‘सर तन से जुदा’च्या (शिरच्छेदाच्या) घोषणा पूर्वी कधीही दिल्या जात नव्हत्या, त्या आता दिल्या जाऊ लागण्यासह तशी कृतीही केली जाऊ लागली आहे. लव्ह जिहादने तर उच्छाद मांडला आहे. त्यासमवेत थूंक जिहाद, भूमी जिहाद, रेल्वे जिहाद, ‘व्होट’ (मत) जिहाद, हलाल जिहाद, लोकसंख्या जिहाद आदी जिहादांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. याला तितक्याच प्रखरतेने विरोधही चालू झालेला आहे. एका गालावर मार खाल्यावर दुसरा गाल पुढे करण्याचे दिवस संपले आहेत. लव्ह जिहादच्या विरोधात अनेक राज्यांत कायदे झाले आहेत, तर हलाल जिहादच्या विरोधात उत्तरप्रदेश सरकारने कारवाईही केली आहे. हा विजयच म्हणावा लागेल. याला अद्याप अंतिम स्वरूप मिळायचे असले, तरी हा त्या दिशेने वाटचाल करण्याचा शुभारंभ आहे. हे सर्व जिहाद भारताला गिळंकृत करण्याच्या १ सहस्र वर्षांच्या कालावधीतील पुढचे टप्पे आहेत. भारतातील मोठ्या भागावर मोगलांचे राज्य असतांना जे झाले नाही, तसे करण्याचा प्रयत्न आता जिहादी करत आहेत. त्यांचा डाव उधळून लावण्यासाठी आता हिंदु कृतीशील होऊ लागले आहेत. काळानुसार यात हिंदूंना नक्कीच यश येणार यात दुमत नाही; मात्र हिंदूंनी त्या काळाला स्वतःच्या क्षमतेनुसार काठ्या लावण्याची आवश्यकता आहे. जे निष्क्रीय आणि निद्रिस्त रहातील, त्यांना त्यांच्या कर्मानुसार फळ मिळेल, हीसुद्धा वस्तूस्थिती आहे आणि ती कुणी नाकरू शकणार नाही. त्यामुळे या जिहादरूपी नरकासुरांचा विनाश करण्यासाठी हिंदूंना वैध मार्गाने कृती करण्यासाठी वाटचाल करत रहावी लागणार आहे.

नरकासुराला नव्हे, तर श्रीकृष्णाला मोठे करा !

हिंदूंचे सण आले की, प्रदूषणाच्या नावाने बोंब ठोकणारे तथाकथित पर्यावरणप्रेमीही येतात. ‘दिवाळीमध्ये फटाके फोडल्याने प्रदूषण होते’, असे सांगत फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी केली जाते. देहलीमध्ये तर आम आदमी पक्षाचे सरकार आल्यापासून अनेक वर्षे दिवाळीच्या काळात फटाक्यांवर बंदी घातली जाते. यावर्षीही बंदी घालण्यात आली आहे. देश आर्थिक संकटात असतांना हिंदूंनी सहस्रो कोटी रुपये दिवाळीच्या काळात फटाक्यांवर व्यय करणे, हे भारतासाठी योग्य नाही. हा देशभक्तीचा एक भाग आहे. त्यामुळे अशा अनावश्यक व्ययाला सनातनचा विरोध आहे; मात्र कुणी केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळी प्रदूषणाच्या नावाखाली अशा गोष्टींना विरोध करत असेल, तर त्यालाही सनातनचा विरोध असेल. ‘प्रदूषण केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळी होते आणि अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी होत नाही’, ही जी काही भूमिका तथाकथित पर्यावरणप्रेमी घेत असतात, त्यांना हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करणे आवश्यकच आहे. नरकासुर दुष्प्रवृत्तीचे पुरो(अधो)गामीच यामागे आहेत. त्यांना बकरी ईदच्या दिवशी होणारे प्रदूषण कधीच दिसत नाही. ३१ डिसेंबरला होणारी आतषबाजी आणि फटाके फोडण्याला का विरोध केला जात नाही ? आता हिंदूंमध्ये जागृती आल्याने अशा प्रकारच्या ढोंगी प्रदूषणविरोधी मोहिमेला विरोध केला जात आहे. संतही याला विरोध करत आहेत. हा काळ पालटत असल्याचा परिणाम आहे. हिंदूंच्या सणांच्या वेळी होणारे असे विरोध आता वैध मार्गाने मोडून काढलेच पाहिजेत आणि त्यासाठी हिंदूंनी संघटित प्रयत्न केले पाहिजेत. अशांना वैध मार्गाने धडा शिकवलाच पाहिजे. नरकासुराचा वध भगवान श्रीकृष्णाने केला, हे लक्षात घेऊन हिंदूंनी भगवान श्रीकृष्णाची आराधना करून वैध कृती करणे आवश्यक आहे. दिवाळीमध्ये आपल्याकडून भगवान श्रीकृष्णाऐवजी नरकासुराचे उदात्तीकरण होत नाही ना ? याचेही चिंतन केले पाहिजे. सध्या देशात रावणाला मानणार्‍यांचाही सुळसुळाट झालेला दिसून येत आहे, हे पहाता हिंदूंनी अधिक सतर्क रहाणे आवश्यक आहे !

अधर्माचा नाश करून धर्माचा विजय झाल्यावरच हिंदूंसाठी खरी दिवाळी असेल !