Canada Official In Khalistani Activities : खलिस्तानी आतंकवादी कारवायांमध्ये कॅनडाच्या अधिकार्‍याचा सहभाग

भारताने कॅनडा सरकारला दिली संपूर्ण माहिती !

कॅनडाचा अधिकारी संदीप सिंह सिद्धू व कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो

ओटावा (कॅनडा) – भारत सरकारने पसार आतंकवाद्यांची सूची घोषित केली आहे. या सूचीमध्ये ‘कॅनेडियन बॉर्डर सर्व्हिस एजन्सी’च्या अधिकार्‍याचे नाव आहे. संदीप सिंह सिद्धू असे त्याचे नाव असून तो बंदी घालण्यात आलेल्या ‘इंटरनॅशनल सिख युथ फेडरेशन’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा सदस्य आहे, तसेच तो ‘कॅनेडियन बॉर्डर सर्व्हिस एजन्सी’साठी काम करत आहे. सिद्धूवर पंजाबमध्ये आतंकवादी कारवायांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. संदीप सिंह याच्या छायाचित्रासह त्याची संपूर्ण माहिती भारताने कॅनडाच्या ट्रुडो सरकारला पाठवली आहे.

बलविंदर सिंह सिद्धू यांच्या हत्येसाठी संदीप सिंह सिद्धू पाकिस्तानमध्ये असलेला खलिस्तानी आतंकवादी लखबीर सिंह उपाख्य रोडे याच्या संपर्कात होता. बलविंदर सिंह सिद्धू यांनी १९९० च्या दशकात पंजाबमध्ये खलिस्तानी आतंकवादाशी लढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. बलविंदर सिंह सिद्धू यांना यासाठी शौर्य चक्र प्रदान करण्यात आले होते. ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांच्या घरातच त्यांची हत्या करण्यात आली होती. बलविंदर सिंह संधू यांच्या हत्येच्या कटात सुखमीत पाल सिंह उपाख्य सनी टोरंटो आणि लखवीर सिंह उपाख्य रोडे यांचा सहभाग असल्याचा दावा राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने केला आहे. या हत्येनंतर संदीप सिंह सिद्धू याला ‘कॅनेडियन बॉर्डर सर्व्हिस एजन्सी’मध्ये अधीक्षक पदावर बढती मिळाली.

संपादकीय भूमिका

कॅनडामध्ये अनेक खलिस्तानी आतंकवादी आणि खलिस्तानप्रेमी यांचा भरणा आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भारत सातत्याने करत आहे; मात्र कॅनडाचे ट्रुडो सरकार राजकीय स्वार्थापोटी कारवाई करण्याचे करण्याचे टाळत आहे. याकडे जगाने लक्ष द्यायला हवे !