‘भारताचा दारूगोळा युक्रेनकडे जाणे’, याविषयीचे विश्लेषण

भारत हा जगातील प्रमुख शस्त्रास्त्र निर्यातक देशांपैकी एक आहे. भारतातून विविध प्रकारची शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा निर्यात केला जातो. या पार्श्वभूमीवर ‘भारताचा दारूगोळा युक्रेनकडे जात आहे’, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे विविध प्रकारच्या चर्चेला उधाण आले आहे. त्या निमित्ताने या विषयाचा घेतलेला हा सखोल आढावा…

१. रशिया-युक्रेन युद्धात दारूगोळ्याची आवश्यकता

रशिया-युक्रेन युद्धाचे सावट अजूनही जगावर आहे. या युद्धामध्ये प्रचंड प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा वापरला जात असल्याने जगभरातील शस्त्रास्त्रांच्या बाजारात तेजी आली आहे. या युद्धात भारताने मध्यस्थीची भूमिका घेतली आहे.

युद्धभूमीवर शस्त्रांचे आयुष्य हे अनेक वर्षे असते; परंतु दारूगोळा एकदा सोडला (‘फायर’ केला) की, पुन्हा वापरता येत नाही. त्यांच्याऐवजी नवीनच दारूगोळा खरेदी करावा लागतो. यामुळेच युक्रेनला दारूगोळा आयात करण्याकरता वेगवेगळ्या देशांकडून साहाय्य घ्यावे लागत आहे. प्रारंभी युक्रेनला युरोपमधील सगळ्या देशांनी आपल्याकडे असलेली जुनी शस्त्रे आणि जुना दारूगोळा दिला; पण युद्ध दीर्घकाळ चालू असल्याने आता सगळा जुना दारूगोळा संपला आहे.

ब्रिगेडिअर हेमंत महाजन (निवृत्त)

२. अमेरिका दारूगोळा पुरवण्यात असमर्थ

जगातील सर्वांत मोठा शस्त्र आणि दारूगोळा निर्यात करणारा देश अमेरिकाही पुरेसा दारूगोळा हा वेगवेगळ्या देशांना पुरवू शकत नाही. याची २ मुख्य कारणे आहे, एक तर इस्रायल आणि ‘हमास’ मध्ये चाललेले युद्ध, जे अमेरिकेकरता अत्यंत महत्त्वाचे आहे आणि दुसरे अमेरिकेमध्ये असलेली भीती. सध्या चाललेल्या वेगवेगळ्या युद्धाचा लाभ घेऊन चीन तैवानवर सैन्य आक्रमण करून कब्जा करू शकतो; म्हणून अमेरिका वेगाने तैवान, जपान आणि इतर मित्रराष्ट्रांची लढण्याची क्षमता वाढवत आहे, ज्यामध्ये दारूगोळयाचाही समावेश आहे. यामुळेच अमेरिकेकडे युक्रेनला दारूगोळा पुरवण्याची फारशी क्षमता उरलेली नाही. चीन अर्थात्च युक्रेनला दारूगोळा पुरवणार नाही; मात्र रशियाला निश्चितच पुरवत आहे.

३. भारतातून तोफगोळ्यांचे ‘शेल केसिंग’ निर्यात 

बाँबसाठी वापरण्यात येणारे ‘शेल केसिंग’चे संग्रहित छायाचित्र

भारताच्या काही आस्थापनांनी युक्रेनला तोफगोळ्यांचे ‘शेल केसिंग’ (तोफगोळ्यांचा एक महत्त्वपूर्ण घटक) निर्यात केली आहेत. यामुळे भारत प्रत्यक्षपणे युद्धात सहभागी नसला, तरी अप्रत्यक्षपणे युक्रेनला साहाय्य करत आहे. युरोपमधील काही आस्थापने भारतातून तोफगोळ्यांचे ‘शेल केसिंग’ आयात करून युरोपमध्ये त्यामध्ये स्फोटक भरून ते युक्रेनला विकत आहेत, म्हणजेच भारताचा दारूगोळा युक्रेनकडे थेट जात नाही. ‘केसिंग’ निर्यात करण्यामध्ये पुणेस्थित ‘भारत फोर्ज’ हे एक मोठे आस्थापन आहे.

‘भारतीय कम्युनिस्ट पक्षा’च्या नेत्यांनी मागणी केली आहे की, जी भारतीय आस्थापने दारूगोळ्याचे ‘केसिंग’ युरोप, म्हणजेच पर्यायाने युक्रेनला पुरवत आहे, त्यांच्यावर बंदी आणली जावी. हेही लक्षात घ्यायला हवे की, अनेक वेळा रशिया तिच्या राष्ट्रीय हिताला सोयीस्कर अशी पावले उचलतो, जी भारताच्या विरोधात असतात. उदाहरणार्थ आता रशिया ‘शांघाय ऑर्गनायझेशन’मध्ये पाकिस्तानला आणत आहे.

रशियाविरुद्धच्या युद्धात अमेरिका-युरोपकडून युक्रेनला सर्व प्रकारचे सैनिकी साहाय्य केले जाते; मात्र रशिया मित्रराष्ट्र असल्याने भारताने युक्रेनला शस्त्रास्त्रांचे साहाय्य किंवा रशियावर निर्बंध लादणार्‍या पाश्चिमात्य गटात सहभागी होण्यास नकार दिला आहे. भारतीय दारूगोळा युक्रेनला कसा मिळाला ? हा पुरवठा थांबवणे भारताच्या हाती आहे का ?

४. युक्रेनकडे भारतीय दारूगोळा

युक्रेनला भारताकडून थेट साहाय्य होत नसले, तरी भारत युरोपातील अनेक देशांना शस्त्रास्त्रे, तोफगोळे निर्यात करतो. यात इटली आणि चेक प्रजासत्ताक हे मोठे आयातदार देश युक्रेनला तोफगोळ्यांचा पुरवठा करतात. भारताकडून आयात केलेल्या ‘केसिंग’मध्ये स्फोटके भरून ती युक्रेनला दिली जातात. अनेक युरोपीयन आस्थापनांकडे तोफगोळे निर्मितीची क्षमता असली, तरी मोठ्या प्रमाणात ‘केसिंग’ उत्पादन करण्याची सुविधा नाही. अशी आस्थापने भारताकडून तोफगोळ्यांचे ‘केसिंग’ आयात करतात. त्यांच्याद्वारे भारतीय बनावटीचे हे तोफगोळे युक्रेनकडे आयात होतात. युक्रेनकडील भारतीय तोफगोळ्यांचे प्रमाण १ टक्क्यापेक्षाही अल्प आहे.

५. रशियाची प्रतिक्रिया आणि त्याने भारताला केलेले आवाहन

रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह आणि परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

रशियाने आतापर्यंत किमान २ वेळा भारतीय अधिकार्‍यांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिली आहे. कझाकिस्तानमध्ये झालेल्या चर्चेच्या वेळी रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली. सरकारी मालकीच्या शस्त्रास्त्र आस्थापनांचा माल युक्रेनच्या हाती जात असल्यामुळे रशिया अप्रसन्न आहे. रशियाने भारताला आपल्याशी असलेले ऐतिहासिक संबंध आणि सामरिक भागीदारी लक्षात घेऊन या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे.

रशिया हा संरक्षण क्षेत्रातील भारताचा पूर्वापार सर्वांत मोठा निर्यातदार आहे. आजही आपली ६० टक्के आयात रशियाकडूनच होते. युक्रेनविरुद्धचे युद्ध चालू झाल्यापासून भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची आयातही वाढवली आहे. रशियावर निर्बंध लादण्यासाठी युरोप-अमेरिकेशी हातमिळवणी करण्यासही भारताने सातत्याने नकार दिला आहे. असे असतांना भारत सरकार रशियाच्या तक्रारीकडे लक्ष का देत नाही ?, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

६. भारताचे तक्रारीकडे दुर्लक्ष का ?

रशियाच्या विरोधाकडे भारताने कानाडोळा करण्याचे एक कारण आर्थिक आहे. वर्ष २०१८ ते २०२३ या कालावधीत भारताची संरक्षणविषयक निर्यात ३ अब्ज डॉलर्सच्या वर (अनुमाने ३० सहस्र कोटी रुपयांहून अधिक) गेली आहे. वर्ष २०२९ पर्यंत ही निर्यात ६ अब्ज डॉलर्सवर (अनुमाने ६० सहस्र कोटी रुपये) नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जगात २ ठिकाणी युद्ध चालू असतांना भारतीय संरक्षण उद्योगाला ही एक प्रकारे संधी आहे. लांबत चाललेल्या युरोपीयन युद्धापासून देशाला आर्थिक लाभ होण्याची संधी असल्यामुळे भारतीय बनावटीची तोफगोळ्यांची ‘केसिंग’ दारूगोळा भरून युक्रेनला देण्यात भारताने आडकाठी आणली नाही.

युक्रेनचा सर्वांत मोठा पाठीराखा असलेल्या अमेरिकेशी भारताने अलीकडेच संरक्षण सहकार्य अधिक मजबूत केले आहे. या करारामागे चीनला रोखणे, हा उद्देश आहे. अशा वेळी युक्रेनला होत असलेले अप्रत्यक्ष साहाय्य रोखून अमेरिकेची अप्रसन्नता ओढावून घेण्याची आवश्यकता नाही. याखेरीज भारतीय ‘केसिंग’चे प्रमाण हे अगदीच नगण्य असल्यामुळे अमेरिकेचे युक्रेनला फार मोठे साहाय्य होत नाही. परिणामी रशियाने निषेध नोंदवला असला, तरी त्याविषयी राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे प्रशासन लगेच काही मोठे पाऊल उचलेल, अशी शक्यता नाही.

७. रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात

युरोपीयन देशांनी निर्बंध घातल्यानंतरसुद्धा आपण रशियाकडून मोठ्या प्रमाणामध्ये कच्चे तेल आयात करत आहोत आणि ते शुद्ध करून युरोपला विकत आहोत. यामुळे रशियाला आपण आर्थिक साहाय्यच करत आहोत, हेही रशियाच्या लक्षात आणून देणे महत्त्वाचे आहे.

भारताचा दारूगोळा युक्रेनकडे जात असल्यावरून भारतासमोर कठीण परिस्थिती आहे. एकीकडे भारताला आपल्या आर्थिक हितांचे रक्षण करावे लागेल, तर दुसरीकडे भारताला आंतरराष्ट्रीय संबंधांचेही संतुलन राखावे लागेल. युक्रेन युद्धाचा भारतावर मोठा परिणाम होत आहे. भारताने स्वतःची तटस्थ भूमिका कायम ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तसेच भारताने रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी सकारात्मक संबंध राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

८. भारत पुरवठा थांबवू शकतो का ?

कोणत्याही संरक्षणविषयक करारात आयात केलेली शस्त्रास्त्रे, दारूगोळा अन्य देशाला विकतांना किंवा साहाय्य म्हणून देतांना निर्यातदार देशाची अनुमती घेण्याची अट समाविष्ट असते. आपलीच शस्त्रे आपल्या हाती पडून आपल्याविरुद्धच वापरली जाऊ नयेत. युक्रेनचा सर्वांत मोठा शस्त्रपुरवठादार असलेल्या अमेरिकेनेही ‘एफ्-१६ फाल्कन’ ही लढाऊ विमाने झेलेन्स्की यांना देण्यास अन्य युरोपीय देशांना अनुमती दिली नव्हती. त्यामुळे भारतीय बनावटीची शस्त्रे युक्रेनला देण्यापासून इटली, चेक प्रजासत्ताक या देशांसह अन्य युरोपीय देशांना स्वतःचा माल युक्रेनला देण्यास भारत सरकार मज्जाव करू शकते; मात्र आतापर्यंत तरी भारताने हे टाळले आहे.

९. चीनविरोधात मित्रराष्ट्रांची आघाडी निर्माण करण्याची संधी 

आज आशियामधील अनेक देश चीनशी लढाई करता यावी; म्हणून स्वतःची सैन्यदले मजबूत करत आहे. अशा देशांना भारताने दारूगोळा निर्यात करून त्यांना मजबूत बनवले पाहिजे. यामुळे भारताचा आर्थिक लाभ तर होईलच, याखेरीज चीनच्या विरोधात मित्रराष्ट्रांची एक आघाडी निर्माण करता येईल.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.