पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘भारतात विकसित झालेली असंख्य शास्त्रे, आदर्श जीवनाची तत्त्वे अंगी बाणवण्यासाठी शिक्षण आवश्यक आणि राजकारण’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(भाग ५८)
भाग ५७ वाचण्यासाठी क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/838225.html
प्रकरण ११
१. राजकारण
१ इ १. बिहार येथील महाभयंकर पुरात शेकडो लोकांचा मृत्यू; पण तेथील हुकूमशाहचे मुंबईत भाषण ! : १४.९.१९९८ या दिवशी हे पुस्तक लिहितांना उत्तरप्रदेश आणि बिहार येथे महाभयंकर पूर आला होता. २० दिवस लोकांना कोणतेही साहाय्य मिळालेले नव्हते. लाखो लोक कसेबसे जगत होते. शेकडो लोक बुडून मृत झाले. पूर ओसरल्यावर जे चित्र दिसेल, ते प्रलयकारी होते. त्यातच बिहारचा हुकूमशाह लालूप्रसाद यादव हे मात्र मुंबईत भाषण झोडत होते.
१ ई. सत्ता नव्हे, संख्या महत्त्वाची ! : लोकशाहीचा आणखी एक दोष, म्हणजे सत्यापेक्षा संख्येला अधिक महत्त्व आहे. वाटेल त्या विचारांच्या आधाराने मते जमवण्यावर भर असतो. त्यासाठी राष्ट्राचा इतिहाससुद्धा बघायची आवश्यकता नाही. मुलायम-लालू यांचे राजकारण आणि मायावती-कांशीराम यांचे राजकारण कोणत्या सिद्धांतावर उभे आहे, हे कळणे महाकठीण आहे. जे तत्त्वाला धरून आहेत, त्यांच्यावर जातीयतेचा आरोप आमच्याच जातीधर्माचे लोक करतात, हे लोकशाहीचे फलित आहे.
१ उ. ‘धर्मनिरपेक्षते’ची नशा : काही पुढार्यांना ‘धर्मनिरपेक्षते’च्या कल्पनेची अशी नशा चढली आहे की, गांधींच्या धर्मनिरपेक्ष काँग्रेसमध्ये जे मुसलमान नेते होते, ते त्याही वेळी धर्मांधच होते आणि आजचे ‘वन्दे मातरम्’ नाकारणारेही धर्मांधच आहेत, ही गोष्ट त्यांच्या लक्षातच येत नाही.
हे सारे दोष लोकशाहीचे आहेत. आमचा पक्का विश्वास आहे की, तिचे दोष अगदी उघड झालेले आहेत.
२. प्रवास
२ अ. भारतियांनी केलेला पुष्कळ प्रवास : पूर्वीचे भारतीय क्षत्रिय पश्चिमेकडे युरोप, ग्रीस, इजिप्त (मिस्त्र) इत्यादी प्रदेश पादाक्रांत करत गेले होते. वैश्य व्यापार-उदीमांसाठी आपली जहाजे पश्चिमेकडे नेत होते. एकूण भारतियांनी पुष्कळ प्रवास केला. असे म्हणतात की, जगद्गुरु आद्यशंकराचार्य युरोपमध्ये दूरवर पोचले होते. पोपचे स्थान व्हॅटिकन हे शंकराचार्य मठाच्या वाटिकेवरून आलेले नाव असून ‘चर्च’ हा शब्दसुद्धा ‘चर्चास्थल’ याचाच अपभ्रंश आहे.
२ आ. आद्यशंकराचार्यांचे कार्य : काहीही असो; पण भारतियांच्या सर्वदूर सापडणार्या खुणा या त्यांच्या ‘कृण्वन्तो विश्वमार्यम् ।’ (ऋग्वेद, मण्डल ९, सूक्त ६३, ऋचा ५), म्हणजे ‘संपूर्ण जगाला आर्य (सुसंस्कृत) करू’, या तत्त्वाचे प्रत्यक्षच दर्शन घडवतात. आद्यशंकराचार्यांनी अडीच सहस्र वर्षांपूर्वी भारतात सर्वत्र पायी संचार केला आणि बद्रीनारायण, केदारनाथ ही मंदिरे, तसेच ज्योतिष्मठ, द्वारका, जगन्नाथपुरी अन् शृंगेरी ही पीठे स्थापन केली.
२ इ. काशीयात्रा : कालीदासांच्या ‘मेघदूत’ काव्यात हिमालयापर्यंतच्या भूप्रदेशाचे जे वर्णन आहे, ते त्या त्या स्थानांची भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये दाखवणारे आहे. यावरून कालीदासांचाही प्रवास प्रत्यक्ष झालेला असला पाहिजे, हे मान्य केले पाहिजे.
आपल्याकडे काशीयात्रेला महत्त्व आहे. आपल्या घरून निघून काशीला जाणे. तेथील गंगा घेऊन रामेश्वराला वहाणे आणि रामेश्वराचा सेतू (वाळू) घेऊन ती काशीला गंगार्पण करणे अन् मग घरी परत येणे, ही काशीयात्रा आहे. १२ ज्योतिर्लिंगे, अष्टविनायक इत्यादी यात्रासुद्धा भारतियांच्या प्रवासाची आवडच सिद्ध करतात.
समुद्रोल्लंघनाची बंदी कधीपासून आली कुणास ठाऊक; पण कच्च्या मनाच्या सामान्य माणसांची मने प्रवासात अधोगामी बनतात, हे जाणूनच ही बंदी घातली गेली असावी.
(क्रमशः)
– भारताचार्य अन् धर्मभूषण पू. प्रा. सु.ग. शेवडे, चेंबूर, मुंबई.
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)
भाग ५९. वाचण्यासाठी क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/839335.html