भारतीय संस्‍कृतीतील अन्‍य विषयांवर भाष्‍य आणि त्‍याचे पैलू !

पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्‍कृती’विषयीची लेखमालिका !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘राजकारण आणि प्रवास’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत. (भाग ५९)

भाग ५८ वाचण्यासाठी क्लिक करा –

https://sanatanprabhat.org/marathi/839010.html

प्रकरण ११

३. भारतीय पाहुणचार 

भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे

भारतीय संस्‍कृतीने आपल्‍याला आदेश दिला आहे, ‘अतिथिदेवो भव ।’ (तैत्तिरीयोपनिषद़्, शीक्षा, अनुवाक ११, वाक्‍य २), म्‍हणजे ‘अतिथीला देवासमान मानावे.’ अतिथीला देव माना; पण त्‍याचसमवेत ‘सत्‍पात्री दान करावे’, असेही सुचवले आहे. पूर्वी शिजवलेले अन्‍न विकत नसत. भोजनालये नव्‍हती. धर्मशाळा होत्‍या. जे पांथस्‍थ यात्रा करत, ते माध्‍यान्‍हीला जेथे असत, तेथेच ‘अतिथी’ या नात्‍याने ‘ॐ भवति भिक्षां देहि ।’, म्‍हणजे ‘हे माते, मला भिक्षा वाढ’, अशी प्रार्थना करत.

मग आपल्‍याजवळ अल्‍प अन्‍न असेल, तरी त्‍यातील भाग अतिथीला द्यावा, हे औदार्य भारतियांतच दिसून येते; मात्र या आमच्‍या औदार्याचा वेळोवेळी अपलाभ घेतला गेला आणि कित्‍येक घरांमध्‍ये बदमाश (वाह्यात) अतिथींनी प्रवेश करून घरच्‍या गृहिणीला लुबाडल्‍याची उदाहरणे अल्‍प नाहीत. प्राचीन ग्रंथांतील २ उदाहरणे पुष्‍कळ चिंतनीय आहेत –

अ. श्रीरामाच्‍या वनवासात अतिथीरूपाने येऊन रावणाने सीतेचे हरण केले.

आ. अत्रीमुनींच्‍या पवित्र आश्रमात माध्‍यान्‍हकाळी भोजन मागून ब्रह्मा-विष्‍णु-महेश यांनी सती अनसुयेची परीक्षा घेतली.

कोणत्‍याही सत्‍प्रवृतीचा अपलाभ घेतला जाणे स्‍वाभाविक असते; म्‍हणून सदसद्विवेकबुद्धीचा उपयोग करणे, हे शास्‍त्रांनी पुष्‍कळ महत्त्वाचे मानले आहे.

४. कुंकू-गंध यांचे महत्त्व ! 

भारतात कुंकुमतिलक हे सौभाग्‍याचे प्रतीक मानले आहे. पुरुषही कपाळावर केशरी किंवा लाल रंगाचा तिलक लावतात. कपाळावरील हा लाल ठिपका स्‍त्रीचे सौभाग्‍य आणि पुरुषांच्‍या संदर्भात मांगल्‍य दर्शवतो. कुणी मृत्‍यू पावले असतांना ‘सुतकाच्‍या काळात पुरुषांनी गंध लावू नये, टोपी किंवा अन्‍य शिरस्‍त्राण धारण करू नये’, असा सामाजिक दंड असे. ज्‍या स्‍त्रीच्‍या कपाळावर कुंकू नाही, ती विधवा समजली जाते. ‘कुंकू जर नवर्‍यासमवेत आलेले नाही, तर मग ते नवर्‍यासमवेत जाण्‍याचेही काय कारण आहे ?’, असा युक्‍तीवाद काही मंडळी करतात. हे योग्‍य नाही; कारण नवरा मुलीपेक्षा मोठा असतो, म्‍हणजे ती कुमारिका असतांना तो नवरा नसतो; पण जगात जन्‍माला आलेला असतो, म्‍हणजे ती भाग्‍यवतीच असते. पतीच्‍या पश्‍चात स्‍त्री विधवा होते; कारण तिचे भाग्‍य संपलेले असते. तिची मुले चांगली असतील, तिच्‍याजवळ द्रव्‍य भरपूर असेल, कसलीच चिंता नसेल, तरी पती हा सर्वश्रेष्‍ठ दागिना आहे. तो गेल्‍यावर स्‍त्रीचे जीवन अर्थशून्‍य होते. पत्नीच्‍या पश्‍चात पतीचेही तसेच होते. सध्‍या याविषयी कोणताच धर्मदंड नसल्‍यामुळे सर्वत्र स्‍वेच्‍छेनुसार व्‍यवहार होत आहेत आणि त्‍यासंदर्भात कुणी विचारणारे राहिलेले नाही.

‘तरुण स्‍त्री कुंकूविरहित दिसली, तर ती विधवा आहे’, हे सगळ्‍यांना कळते. ‘तिला कुणाचा आधार नाही’, हे समजून कुणीही तिच्‍याशी दांडगाई करण्‍याचा संभव असतो. ‘अशा वेळी कुंकू लावणे बरे’, असाही एक युक्‍तीवाद केला जातो; पण सुवासिनीवर असा प्रसंग येतच नाही का ? उत्तर भारतात कुंकवापेक्षाही महत्त्व भांग भरण्‍याला आहे. ‘भांगात शेंदूर भरणे’, हे सौभाग्‍यलक्षण आहे. देशकालानुसार हे भेद आहेत.

५. मांसाहार

ईश्‍वराने जे जे प्राणी मांसाहारी बनवले आहेत, त्‍यांना विशिष्‍ट प्रकारची दंतावली आणि जबडे दिले आहेत. वाघ, सिंह, कुत्रा, मांजर, लांडगा, अस्‍वल इत्‍यादी मांसाहारी प्राण्‍यांचे जबडे लांब असतात. त्‍यात मोठाले सुळे असतात. मांसाहारी प्राण्‍यांपेक्षा शाकाहारी प्राण्‍यांचे जबडे आणि दंतावली अगदी वेगळ्‍या असतात. घोडा, गाय, म्‍हैस, गेंडा, हत्ती इत्‍यादी प्राणी शाकाहारी असून त्‍यांचे जबडे वेगळे आहेत. मनुष्‍याचे दात, जबडे शाकाहारी प्राण्‍यांशी मिळते-जुळते असतात. आपल्‍या भुकेसाठी किंवा रुचीसाठी प्राण्‍याला मारून त्‍याचे मांस काढून, चिरून, शिजवून खाणे, ही क्रूरता आहे. देवाने माणसासाठी हे अन्‍न निर्माण केलेले नाही. ‘भारतात पूर्वी गोमांससुद्धा खात असत’, असे जावईशोध काही मंडळींनी लावले आहेत; पण ते सर्व अर्थाचे अनर्थ करून काढून सांगितले जाते.

६. सोमरस

सोमरस म्‍हणजे दारु. पूर्वीचे ऋषि सोमरस पीत. राजे लोक सोमयाग म्‍हणून एक यज्ञ करत. त्‍यात ‘सोम’ या वनस्‍पतीचा हा रस पीत असत. अशा प्रकारे सोमप्राशन करणे प्रतिष्‍ठेचे समजले जाई. ‘सोमाचा रस वेदकाळच्‍या ऋषिवर्यांनी उकळीला ! ही कवी केशवसुतांची काव्‍यपंक्‍ती हाच अर्थ दर्शवते; पण सोमरस म्‍हणजे दारु नव्‍हे. गीतेत म्‍हटले आहे, ‘त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्‍ट्वा स्‍वर्गतिं प्रार्थयन्‍ते ।’ (श्रीमद़्‍भगवद़्‍गीता, अध्‍याय ९, श्‍लोक २०), म्‍हणजे ‘तिन्‍ही वेदांत सांगितलेली सकाम कर्मे करणारे, सोमरस पिणारे, पापमुक्‍त लोक माझी यज्ञांनी पूजा करून स्‍वर्गप्राप्‍तीची इच्‍छा करतात.’

(क्रमशः)

– भारताचार्य अन् धर्मभूषण पू. प्रा. सु.ग. शेवडे, चेंबूर, मुंबई.

(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्‍कृती’)