लंडन – जगातील अनेक देश भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान देण्यास पाठिंबा दर्शवत आहेत. आता या सूचीमध्ये ब्रिटनचेही नाव जोडले गेले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर यांनी नुकताच भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्यत्व देण्यास पाठिंबा दर्शवला. संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७९ व्या सत्राला संबोधित करतांना ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर म्हणाले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पालट होणे आवश्यक आहे. ब्रिटनने संयुक्त राष्ट्र महासभेच्या व्यासपिठावरून सुरक्षा परिषदेत भारतासाठी कायमस्वरूपी जागेची शिफारस केली.
फ्रान्सचेही भारताला समर्थन !
संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करतांना फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही भारताला सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान देण्याचे समर्थन केले. इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की, ‘फ्रान्स सुरक्षा परिषदेच्या विस्ताराच्या बाजूने आहे. जर्मनी, जपान, भारत आणि ब्राझील हे देशही सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य असावेत.
विकसनशील देशांच्या हिताचे अधिक चांगल्या प्रकारे प्रतिनिधित्व करण्यासाठी सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे, अशी भारताची दीर्घकाळापासून मागणी आहे. सध्या, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत १५ सदस्य राष्ट्रे आहेत, ज्यामध्ये ‘व्हेटो पॉवर’ (निर्णायक अधिकार) असलेले ५ स्थायी सदस्य आणि २ वर्षांच्या कालावधीसाठी निवडले जाणारे १० अस्थायी सदस्य आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ५ स्थायी सदस्यांमध्ये चीन, ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि अमेरिका यांचा समावेश आहे.