सांप्रतकाळी सर्वत्र बोकाळलेला स्वैराचार आणि त्याची निष्पाप लोकांना, विशेषतः महिलांना मोजावी लागणारी किंमत, हे आपल्या व्यवस्थेचे दारूण अपयश म्हणावे लागेल. आपल्याकडे बालिकांपासून अगदी ९० वर्षांच्या अतीवृद्ध आजींपर्यंत कुणीही सुरक्षित नसणे किंबहुना त्यांच्यावर अत्याचार होणे, हे समस्त भारतियांना लज्जेने मान खाली घालायला लावणारे आहे. ज्येष्ठांचे अनुभव हे पुढच्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक आणि दिशादर्शक असतात. ते कुटुंबतारक असतात; परंतु जेव्हापासून एकत्रित कुटुंबपद्धतीची जागा विघटित कुटुंबपद्धतीने घेतली आहे, तेव्हापासून स्वैराचार निश्चितच बोकाळला आहे. अर्थात् स्वैराचार वाढण्यामागील हेच एकमेव कारण आहे, असे अजिबात नाही. त्याला रहाणीमानापासून संस्कारांपर्यंत आणि उथळ विचारसरणीपासून आहार-विहारापर्यंत, अशा अनेकांगी बाजू आहेत.
बलात्कार रोखण्यात अपयश !
समाजात कुठे ना कुठे बालिका, युवती आणि महिला यांच्यावर बलात्कार झाला नाही, असा दिवस जात नाही. प्रतिदिन वर्तमानपत्रांमध्ये अशा बातम्या झळकतात. प्रत्येक घटनेतील आरोपी वेगवेगळे असतात; परंतु अशा आरोपींना म्हणावी तशी कठोर शिक्षा तात्काळ होतांना दिसत नाही. हेच अत्याचार वाढण्यामागचे प्रमुख कारण आहे. हे जग जेथे शिक्षेच्या भयावरच चालले आहे, तेथे आरोपींना हे भयच उरले नसेल, तर ते वारंवार गुन्हा करणारच आहेत. आपल्या व्यवस्थेने ज्यांच्यावर समाजाच्या रक्षणाचे दायित्व सोपवले आहे, असे पोलीसही अकार्यक्षम असल्याचे वारंवार दिसून येते. याउलट पोलीसदलातील अनेक पोलीसच बलात्कारी असल्याचे यापूर्वी घडलेल्या अनेक घटनांत उघड झाले आहे. लोकप्रतिनिधींविषयी तर काहीही न बोललेलेच बरे; कारण ‘सत्ताधारी कुठल्या पक्षाचे आहेत ?’, हे पाहून विरोधकांच्या विरोधाची दिशा जेथे ठरत असेल, तेथे ‘महिलांवरील अन्याय रोखले जातील’, ही आशा भाबडी ठरते. बलात्काराच्या घटनेविरोधात एकीकडे सर्व पक्ष संबंधित आरोपीला जन्माची अद्दल घडवण्याची मागणी करतात, तर दुसरीकडे आरोपी चकमकीत मारला गेला, तर सरकार आणि पोलीस यांनाच आरोपीच्या पिंजर्यात उभे करतात. येथे योग्य-अयोग्य न्यायालय ठरवेल; परंतु या निमित्ताने लोकप्रतिनिधींची मानसिकता दिसून येते. त्यामुळे एकूणच आपली व्यवस्था आणि यंत्रणा महिलांवरील अत्याचार रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचा मतप्रवाह वेगाने सिद्ध होत आहे.
हे प्रकार रोखण्यासाठी लहान वयातच लैंगिक शिक्षण देण्याचा पर्याय काही जण देतांना दिसतात. ‘लैंगिक शिक्षण देण्याला होणार्या विरोधामुळे तरुणांना लैंगिकतेविषयी अचूक माहिती मिळत नाही आणि मग ते चुकीच्या संकेतस्थळांकडे वळतात, जेथे दिशाभूल करणारी माहिती असते’, असा तर्कही मांडला जातो. वरकरणी तो योग्य वाटेलही; पण वस्तूस्थिती तशी नाही; कारण जेथे अज्ञान असते, तेथे शिक्षण आवश्यक असते. बलात्कार्यांमध्ये अज्ञान नव्हे, तर विकृती असते, मग तो वयाने लहान का असेना ! त्याने बलात्काराची कृती कुठेतरी पाहिली असू शकते किंवा त्याविषयी वाचले असू शकते, जी त्याच्या वासनेच्या भावना अनियंत्रित करून त्याला चुकीच्या दिशेने घेऊन जाते. अशांचे ‘पहाणे’ आणि ‘वाचणे’, हेही तर एक प्रकारे शिक्षणच आहे ना ! परंतु ते सर्वस्वी चुकीचे असून शिक्षणाच्या अशा विकृत साधनांवर प्रथम बंदी आणली पाहिजे. मग रहाता राहिला प्रश्न तो ‘हे प्रकार रोखणार कसे ?’, हा. त्याचे उत्तर असे की, बलात्कार ही विकृती असल्याने ती रोखण्याचे सामर्थ्य संस्कृतीत आहे ! जेथे संस्कृती आहे, तेथे विकृती टिकू शकत नाही. संस्कृती म्हणजे चांगले संस्कार करणे, म्हणजचे बालवयात साधनेचे बीज रोवणे होय. मुलांना लहानपणापासून साधना शिकवली, तर त्यांना योग्य काय आणि अयोग्य काय ?, हे कळण्यास साहाय्य होईल आणि ते चुकीच्या गोष्टी करण्यापासून परावृत्त होतील. थोडक्यात ‘चुकीची गोष्ट करण्यापासून रोखायला मनुष्याला शिक्षणापेक्षा सद्सद्विवेकबुद्धी अधिक कामी येते’, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. केवळ शिक्षण त्याला चुकीच्या गोष्टी करण्यापासून रोखू शकत नाही; कारण तसे असते, तर आज अनेक डॉक्टर, अभियंते वगैरेंसारखे उच्च शिक्षित जिहादी आतंकवादी कृत्यांत सहभागी झाले नसते. अशांकडे उच्च शिक्षण असते; परंतु सद्सद्विवेकबुद्धी नसते; म्हणूनच तर त्यांचे केवळ उच्च शिक्षणाचे ज्ञान त्यांना आतंकवादी कृत्ये करण्यापासून रोखू शकत नाही. अमेरिकेतील मुलांच्या संदर्भातही असेच दिसून येते. तेथे तर आपल्यापेक्षा आधुनिक शिक्षण दिले जाते; पण अमेरिकेत शालेय विद्यार्थी भरवर्गात अंदाधुंद गोळीबार करण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे केवळ शिक्षण पुरेसे नसते, हे यावरून सिद्ध होते.
शाश्वत उपाय हवा !
याउलट शिक्षणरूपी ज्ञानाला जर साधनारूपी संस्काराची जोड दिली, तर कुणाचेही कल्याण झाल्याविना रहाणार नाही. आपल्याकडे याची असंख्य उदाहरणे आहेत. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी साधनेच्या बळावर आत्मज्ञान प्राप्त करून जगाला ‘ज्ञानेश्वरी’च्या रूपात शाश्वत कल्याणाचा उपदेश केला ! हीच ज्ञानेश्वरी वाचून आजही कोट्यवधी लोक स्वतःच्या जीवनाचे कल्याण करून घेत आहेत. म्हणून शिक्षण द्यायचेच असेल, तर ज्ञानेश्वरीचे द्या, असे सांगावेसे वाटते. हाच कुठलीही कुकृत्ये रोखण्यावरचा शाश्वत उपाय आहे.
(चित्रावर क्लिक करा ↑)
साधनेचे महत्त्व आता न्याययंत्रणेवरही बिंबू लागले आहे, असे नुकतेच कर्नाटक उच्च न्यायालयाच्या एका निर्णयावरून दिसून येते. घटस्फोट घेण्यासाठी आलेल्या एका दांपत्याला उच्च न्यायालयाने सल्ला घेण्यासाठी संतांकडे पाठवले आणि त्या संतांच्या मध्यस्थीने समस्या सोडवून एकत्र जीवन जगण्याचा सल्ला दिला. बलात्काराची घटना असो किंवा दांपत्याची आपापसांतील भांडणे असोत, असे विषय अत्यंत संवेदनशील आणि गुंतागुंतीचे असतात. त्यामुळे यांत अनेकदा न्यायालयांसमोरही अनेक पेचप्रसंग निर्माण होतात. त्यातूनच तर न्याययंत्रणेलाही संतांचा, म्हणजेच एकाअर्थी साधनेचा उपाय शाश्वत वाटतो. हे निश्चितच स्वागतार्ह आहे. अर्थात् गुन्हेगार मग तो कुठल्याही गुन्ह्यांतील असो, त्याला कठोर शिक्षाही केलीच पाहिजे.
सरते शेवटी आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आहार, निद्रा, भय आणि मैथुन, या ४ गोष्टी मनुष्य अन् पशू यांच्यात समान असतात. तथापि साधना केवळ मनुष्यच करू शकतो. साधनेविना मनुष्याचे जीवन पशूतुल्य बनते. हे लक्षात घेऊन मुलांना लहान वयापासून साधनेचे शिक्षण दिले, तर बलात्कारच काय; पण कुठलेही गुन्हे करण्याचा विचारही त्याच्या मनात येणार नाही आणि मग सर्व जण भयमुक्त जीवनाचा आनंद अनुभवू शकतील !
चारित्र्यसंपन्न पिढी निर्माण होण्यासाठी मुलांना लहानपणापासूनच साधना शिकवणे आवश्यक ! |