Bangladesh Flood : (म्‍हणे) ‘बांगलादेशात आलेल्‍या पुरामागे भारत !’ – बांगलादेश

बांगलादेशात भारताच्‍या विरोधात आंदोलन

बांगलादेशातील पूरस्थिती

ढाका (बांगलादेश) / नवी देहली – बांगलादेशात पूर्व आणि दक्षिण-पूर्व भागांतील अनेक जिल्‍ह्यांत पूर आला आहे. या स्‍थितीला भारत उत्तरदायी आहे, असे सांगत तेथे भारतविरोधी आंदोलन चालू झाले आहे. त्रिपुरातील गोमती नदीवरील धरणाचे दरवाजे भारताने उघडल्‍याने बांगलादेशात पूर आल्‍याचा दावा केला जात आहे. ‘भारताचा ‘पूर बाँब’ येथे पाणी साचण्‍यास कारणीभूत आहे’, असा आरोप केला जात आहे. येथील ढाका विद्यापिठात २१ ऑगस्‍टच्‍या रात्री सभा आयोजित करून भारताला चेतावणी देण्‍यात आली. ‘भारताने बांगलादेशात नैसर्गिक आणि राजकीय पूर आणला आहे. आम्‍ही वर्ष १९७१ मध्‍ये जसे युद्ध लढले तसेच वर्ष २०२४ मध्‍ये स्‍वातंत्र्यासाठी लढू’, अशी धमकी देण्‍यात आली. दुसरीकडे पुराच्‍या सूत्रावर पत्रकारांनी विचारलेल्‍या प्रश्‍नावर बांगलादेशाच्‍या विदेश मंत्रालयाकडून कोणतीही टिपणी केली नाही.

आरक्षणविरोधी आंदोलनाचा समन्‍वय विद्यार्थी हसनत अब्‍दुल्ला याचा फुकाचा आरोप – (म्‍हणे) ‘पुरामागे भारताचे षड्‍यंत्र !’

बांगलादेशात झालेल्‍या आरक्षणविरोधी आंदोलनाचे समन्‍वय करणारा विद्यार्थी हसनत अब्‍दुल्ला म्‍हणाला की, भारताने धरणातील पाणी सोडल्‍याने पूर आला आहे. आम्‍ही एका नव्‍या राज्‍याच्‍या स्‍थापनेचे काम करत आहोत. एक शेजारी देशाच्‍या रूपात साहाय्‍य करण्‍याऐवजी तो षड्‌यंत्र रचत आहेत.

सूचना न देता धरणाचे पाणी सोडल्‍याने पूर ! – अंतरिम सरकारचे माहिती सल्लागार नाहिद इस्‍लाम

अंतरिम सरकारचे माहिती सल्लागार नाहिद इस्‍लाम म्‍हणाले की, धरणातून सोडलेले पाणी बांगलादेशापर्यंत पोचल्‍याने पूरस्‍थिती निर्माण झाली आहे. कोणतीही  सूचना न देता धरणातील पाणी सोडले गेले.

पाणी सोडल्‍याने पूर आल्‍याचा दावा चुकीचा ! – भारत

बांगलादेशाच्‍या आरोपांविषयी भारतीय विदेश मंत्रालयाने सांगितले की, त्रिपुरातील डांबूर धरण उघडल्‍यामुळे पूर आल्‍याची अफवा बांगलादेशात पसरली आहे. भारत आणि बांगलादेश यांमधून वहाणार्‍या गोमती नदीच्‍या आजूबाजूच्‍या भागांत यावर्षी सर्वाधिक पाऊस झाला आहे. त्‍यामुळे दोन्‍ही बाजूंनी अडचणी निर्माण झाल्‍या आहेत. दोन्‍ही देशांमधील नद्यांना पूर येणे ही एक सामान्‍य समस्‍या आहे, ज्‍यासाठी दोन्‍ही देशांतील लोकांना संघर्ष करावा लागतो. याला सामोरे जाण्‍यासाठी दोन्‍ही देशांचे सहकार्य आवश्‍यक आहे. बांगलादेश सीमेपासून डांबूर धरण १२० किलोमीटरहून अधिक अंतरावर आहे. हे कमी उंचीचे (सुमारे ३० मीटर) धरण आहे, जे वीज निर्माण करते आणि ती वीज ग्रीडमध्‍ये जाते जिथून बांगलादेशाला त्रिपुरातून ४० मेगावॅट वीज मिळते.

संपादकीय भूमिका

ज्‍या प्रमाणे पाकिस्‍तान त्‍याच्‍या देशातील सर्व प्रकारच्‍या संकटांसाठी भारताला उत्तरदायी ठरवतो, तसेच आता बांगलादेशही करणार, हे यातून स्‍पष्‍ट होते ! तसेच भारतावरील राग काढण्‍यासाठी तेथील हिंदूंवरील अत्‍याचार आणखीन वाढतील, हे नाकारता येत नाही !