डावे आणि जिहादी यांचा यापुढील घाला हा संस्‍कृतीवर ! – अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक

सनातन संस्‍था आयोजित विशेष कार्यक्रम ‘अंधश्रद्धा निर्मूलन कि छुपा अर्बन नक्षलवाद’ !

डावीकडून श्री. अभिजित जोग आणि श्री. चेतन राजहंस

पुणे – डावे आणि जिहादी यांना सध्‍याची मानवी व्‍यवस्‍था नष्‍ट करून नवनिर्मिती करायची आहे. आजपर्यंत ते कोणतीही नवनिर्मिती करू शकले नाहीत. त्‍यांनी निर्माण केलेल्‍या व्‍यवस्‍थेने केवळ अराजक आणि विध्‍वंसच केला आहे. साम्‍यवाद्यांचा यापुढील संघर्ष हा सांस्‍कृतिक आधारावर आहे. भारताची संस्‍कृती ही कुटुंबव्‍यवस्‍था, धर्मव्‍यवस्‍था, देशप्रेम, शिक्षणव्‍यवस्‍था आणि लोकशाही या ५ व्‍यवस्‍थांवर उभी आहे. त्‍यामुळे त्‍यांना या ५ ही व्‍यवस्‍था मोडीत काढायच्‍या आहेत. यांतील सर्वांत प्रथम त्‍यांना कुटुंबव्‍यवस्‍था नष्‍ट करायची आहे. या सर्वांशी लढणे अत्‍यंत अवघड आहे. असे असले, तरी हा धोका आता आपल्‍या धर्मापर्यंत, आपल्‍या घरापर्यंत आल्‍यामुळे या शक्‍तींशी आपल्‍याला लढा द्यावाच लागेल, असे प्रतिपादन  ‘असत्‍यमेव जयते’ या पुस्‍तकाचे लेखक श्री. अभिजित जोग यांनी केले. ते १० ऑगस्‍टला सनातन संस्‍था आयोजित ‘अंधश्रद्धा निर्मूलन कि छुपा अर्बन नक्षलवाद’ ! या विषयावर पुणे येथील ‘लोकमान्‍य सभागृह’, टिळकवाडा, पुणे येथे आयोजित विशेष कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होते. या वेळी सनातन संस्‍थेचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. चेतन राजहंस यांनीही उपस्‍थितांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी श्री. अभिजित जोग यांचा सत्‍कार ‘पुना गेस्‍ट होऊस’चे संचालक आणि ‘पुणे हॉटेल असोसिएशन’चे अध्‍यक्ष श्री. किशोर सरपोतदार यांनी केला, तर श्री. चेतन राजहंस यांचा सत्‍कार दत्त मंदिराचे विश्‍वस्‍त अधिवक्‍ता श्री. दत्तात्रय देवळे यांनी केला.

उपस्‍थितांना मार्गदर्शन करतांना श्री. अभिजित जोग

श्री. अभिजित जोग पुढे म्‍हणाले, ‘‘डीप स्‍टेट’, (‘डीप स्‍टेट’ म्‍हणजे सरकारी अधिकारी आणि खासगी संस्‍था यांच्‍या गुप्‍त जाळ्‍यांचा संदर्भ देते जी कुणासही उत्तरदायी न रहाता सरकारी धोरणावर प्रभाव टाकते.) साम्‍यवाद, जिहादी इस्‍लामी यांची युती कार्यरत असून त्‍यांचे प्रतिनिधी म्‍हणून अर्बन नक्षलवादी कार्यरत आहेत. या सर्वांचा उच्‍च वर्गीय श्रीमंत लोकांमध्‍ये प्रचंड मोठे ‘नेटवर्क’ आहे ! कुणी लेखक, पत्रकार, तसेच अन्‍य कुणी, कुणी तोंडावळा म्‍हणून वावरतात. सामाजिक न्‍यायासाठी लढाई, पर्यावरणाचे रक्षण, समानता असे मुखवटे धारण करून ते काम करतात. या मुखवट्यांचे खरा चेहरा आपल्‍याला समाजासमोर आणावाच लागेल.’’

‘लेफ्‍ट इकोसिस्‍टीम’ विविध मुखवटे धारण करून कार्य करते ! – चेतन राजहंस, प्रवक्‍ता, सनातन संस्‍था

उपस्‍थितांना मार्गदर्शन करतांना श्री. चेतन राजहंस

‘लेफ्‍ट इकोसिस्‍टीम’ अनेक मानवतावादी मुखवटे धारण करून कार्य करते. जसे अंधश्रद्धा निर्मूलन, महिलांच्‍या अधिकारांसाठी काम करणारे ‘फेमिनिस्‍ट’, नास्‍तिकतवादी, नक्षलवादी असे त्‍यांचे मुखवटे असून त्‍यात विद्यापिठांच्‍या प्राध्‍यापकांपासून अभिनेता-अभिनेत्री, संपादक-पत्रकार यांचा समावेश असतो. हे सर्व विविध माध्‍यमे, पुस्‍तके आणि तथाकथित चळवळी यांच्‍या मांध्‍यमातून हिंदु संस्‍थांच्‍या विरोधात काम करतात आणि ‘नॅरेटिव्‍ह’ ‘सेट’ करतात. यातील अर्बन नक्षलवादी सातत्‍याने समाजापुढे खोटे प्रस्‍तुत करतात. एका वृत्तवाहिनीवर मुलाखत देतांना दाभोलकर परिवाराने म्‍हटले की, फाशीच्‍या शिक्षेला आमचा विरोध होता. आम्‍ही मानवतावादी आहोत. यानंतर लगेचच १४ ऑगस्‍टला याच दाभोलकर परिवाराने उच्‍च न्‍यायालयात अपील केले की, शिक्षा झालेल्‍यांना फाशी व्‍हावी ! यावरून ते कसे खोटे बोलतात ते लक्षात येते.

कार्यक्रमासाठी उपस्‍थित मान्‍यवर

डॉ. दाभोलकरांच्‍या मृतदेहावरील कपड्यांमध्‍ये एक विदेशी ‘सीमकार्ड’ सापडले होते. त्‍यावरून संभाषण झाल्‍याचे अन्‍वेषणात उघड झाले. तुम्‍ही पारदर्शक आहात, तर विदेशातील लोकांशी संभाषण करण्‍यासाठी वेगळे ‘सीमकार्ड’ ठेवण्‍याची आवश्‍यकता काय होती ? यानंतर या संदर्भात एका वृत्तवाहिनीवर दाभोलकर परिवाराने हसत-हसत सांगितले की, ‘आज काल, तर सर्वच जण विदेशातील सीमकार्ड ठेवातात.’, असे सांगून ते डॉ. दाभोलकरांच्‍या केलेल्‍या चुकीच्‍या गोष्‍टीचे समर्थन करून त्‍याला एक मुलामा देण्‍याचा प्रयत्न करतात.