United Nations : संयुक्‍त राष्‍ट्रांनी बांगलादेशातील हिंसाचाराचा निषेध करतांना ‘हिंदु’ शब्‍द टाळला !

(म्‍हणे) ‘आम्‍ही वांशिक हिंसाचाराच्‍या विरोधात आहोत !’

फरहान हक

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात हिंदूंना लक्ष्य करण्‍याच्‍या घटनांचा विविध लोकांकडून निषेध होत असतांना संयुक्‍त राष्‍ट्र संघानेही त्‍यावर टीका केली आहे. असे असतांना त्‍याने ‘हिंदु’ शब्‍दाचा नामोल्लेख मात्र टाळला आहे. संयुक्‍त राष्‍ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्‍ते फरहान हक यांनी म्‍हटले की, आम्‍ही वांशिक आधारावर होणारी आक्रमणे आणि हिंसा यांना प्रोत्‍साहन देण्‍याच्‍या विरोधात आहोत.

फरहान हक म्‍हणाले की, बांगलादेशामध्‍ये अलीकडच्‍या काही आठवड्यांपासून चालू असलेला हिंसाचार संपेल, याची आम्‍ही पुन्‍हा एकदा निश्‍चिती करू इच्‍छितो. आम्‍ही निश्‍चितपणे बांगलादेशाचे सरकार आणि लोक यांना आवश्‍यक वाटेल त्‍या मार्गाने पाठिंबा देण्‍यास सिद्ध आहोत.

संपादकीय भूमिका

भारतातील ख्रिस्‍ती अथवा मुसलमान यांच्‍या विरोधात खुट्ट जरी झाले, तरी संयुक्‍त राष्‍ट्रे ‘हे समुदाय संकटात सापडले आहेत’, असे सांगून भारतातील हिंदूंना वेठीस धरतात. आता मात्र बांगलादेशातील परिस्‍थितीवर भाष्‍य करतांना ‘हिंदु’ शब्‍दाचा उल्लेख करण्‍याची तसदीही त्‍याने घेतलेली नाही. अशा दुतोंडी संयुक्‍त राष्‍ट्रांचा भारत सरकार निषेधतरी करणार का ?