Imran Khan : इम्रान खान यांची तात्काळ सुटका करा ! – संयुक्त राष्ट्रे

खान यांची अटक, हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचा ठपका

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान

न्यूयॉर्क (अमेरिका) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अटक, हे  आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. त्यामळेे त्यांची तातडीने सुटका केली पाहिजे. तसेच त्यांना आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार लागू असणारी हानी भरपाईही दिली पाहिजे, असे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार गटाकडून प्रसारित करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.‘तेहरीक-ए-इन्साफ’ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान खान यांना गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात भ्रष्टाचारावरून अटक करण्यात आली होती. या वर्षी जानेवारी महिन्यात त्यांना १० वर्षांची शिक्षाही ठोठावण्यात आली.

संयुक्त राष्ट्रांच्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, इम्रान खान यांना सहन करावा लागलेला कायदेशीर कारवाईचा मनस्ताप, म्हणजे त्यांच्या विरोधात आणि त्यांच्या पक्षाविरोधात चालवण्यात आलेल्या व्यापक षड्यंत्राचाच भाग आहे. पाकिस्तानात वर्ष २०२४ च्या निवडणुका होऊ घातलेल्या असतांना त्यांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांना अटक करण्यात आली, त्यांचा छळ करण्यात आला आणि त्यांच्या प्रचारसभांमध्ये गोंधळ घालण्यात आला. निवडणुकीच्या दिवशीही मोठ्या प्रमाणावर अपप्रकार झाले असून अनेक मतदारसंघांमधील निकालांवर त्याचा परिणाम झाला आहे.

संपादकीय भूमिका

संयुक्त राष्ट्रांना पाकमधील घडामोडीविषयी चिंता आहे; मात्र काश्मीरमध्ये हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांविषयी कधी त्यांनी तोंड उघडले नाही, हे लक्षात घ्या !