सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी गायन, वादन, नृत्य क्षेत्रातील कलाकारांना केलेले अमूल्य मार्गदर्शन !

भारतीय कलांचा उगम ईश्वरापासून झालेला असल्याने त्यांत मुळातच सात्त्विकता आहे !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने चालू असलेल्या संशोधनकार्याच्या अंतर्गत अनेक कलाकारांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला भेटी दिल्या आहेत. त्या वेळी कलाकारांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगांचा लाभ झाला. ‘त्यातील मार्गदर्शनाचा लाभ संगीतातून साधना करू इच्छिणार्‍या व्यक्तींना व्हावा’, या दृष्टीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेली मार्गदर्शनपर सूत्रे येथे दिली आहेत. (भाग ३)

भाग २. येथे वाचा : – https://sanatanprabhat.org/marathi/802175.html

७. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कलाकारांना ‘त्यांची साधना होत आहे’, याची जाणीव करून देणे

७ अ. ‘तबलावादनातील गुरूंकडे शिकतांना भावाच्या स्तरावर प्रयत्न केल्याने तबलावादकांमध्ये शिष्याचे गुण आले आहेत’, असे तबलावादकांना सांगणे : ‘एका कलाकारांनी त्यांच्या तबलावादनातील गुरूंकडे शिष्यभावाने तबलावादन शिकल्याने त्यांच्यात शिष्यत्वाचे गुण निर्माण झाले आहेत’, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी लक्षात आणून दिले. त्यांनी सांगितले, ‘‘त्या शिकणार्‍या तबलावादकांची अंतर्मनातून साधना चालू आहे.’’

७ आ. एका कलाकारांनी ‘कलेकडे साधना म्हणून पाहिल्याने त्यांनी आसक्ती न्यून होण्याचा टप्पा गाठला’, असे सांगणे : एका तबलावादकांनी सांगितले, ‘‘माझ्या मनात अखंड तबलावादनाविषयी विचार असतात. (तबल्याचे बोल, बंदिशी इत्यादी) (टीप) त्यामुळे मला मायेतील गोष्टींचा विसर पडतो.’’ तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणाले, ‘‘तुम्ही कलेकडे साधना म्हणून पहात असल्याने ‘मायेतील आसक्ती न्यून होणे’, हा टप्पा गाठला.’’

टीप – १. तबल्याचे बोल : तबल्यावर वाजवण्यात येणारे बोल, उदा. धा, तिरकीट, धीं इत्यादी

२. बंदिश : निसर्गातील विविध घटनांच्या गतीची अनुभूती देणारी तबल्याच्या भाषेतील काव्यमय रचना.

(‘भारतीय कलांचा उगम ईश्वरापासून झालेला असल्याने त्यांत मुळातच सात्त्विकता आहे. कलेच्या माध्यमातून साधना करतांना आरंभी कलेला वाहून घेणे, कलेचाच ध्यास घेणे, हे नामजप करून एकाग्रता, अनुसंधान साध्य करतो, त्याप्रमाणेच कार्य करते. त्यामुळे त्या कलाकारांमध्ये हा पालट झाला.’ – संकलक)

७ इ. एका कलाकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ‘तुम्ही नामजप वेगवेगळ्या रागांत म्हणू शकता आणि त्यातून तुमची भावजागृती होईल’, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगणे : एका कलाकारांनी सांगितले, ‘‘मी केवळ नामजप केला, तर तेवढा भावपूर्ण होत नाही; मात्र मी नामजप वेगवेगळ्या रागांत म्हटल्यास तो भावपूर्ण होतो. मी असा नामजप करू शकतो का ?’’ तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितले, ‘‘तुमचे गायन क्षेत्र आहे. त्यामुळे तुम्हाला हे सहज जमू शकेल, तसेच त्यातून तुमची भावजागृतीही होऊ शकते. तुम्ही असा नामजप करू शकता.’’

७ ई. एका कलाकारांची क्षमता पाहून त्यांना ‘संगीतातून साधना’ याविषयी अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शन करणे : एका गायक कलाकारांची साधना चांगली असल्याने आणि त्यांना संशोधनामध्ये आवड असल्याने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांना गायनातील संशोधनात्मक प्रयोग करायला सांगून मार्गदर्शनही केले. (काही कलाकारांची सूक्ष्मातून अभ्यास करण्याची क्षमता असते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे त्यांना ‘संगीत-नृत्य यांना अध्यात्म कसे जोडायचे ?’, याविषयीही मार्गदर्शन करतात, उदा. नृत्यातील मुद्रांचा, गायन-वादन यांतील स्वरांचा परिणाम षट्चक्रे, पंचमहाभूते, व्यक्तीची नाडी इत्यादींवर कसा होतो इत्यादी.)

७ उ. एका कलाकारांना ‘व्यावहारिक जीवनातही अध्यात्म जगत आहात’, असे सांगणे : एका कलाकारांनी ‘त्यांच्या जीवनातील बर्‍याच कठीण प्रसंगांत त्या सकारात्मक दृष्टीकोन कसे ठेवतात ? आणि साधनेला अनुसरून योग्य दिशा कशी ठेवतात ?’, याविषयी सांगितले. त्या कलाकार असूनही साधनेविषयी चांगले दृष्टीकोन ठेवत असल्याने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितले, ‘‘गेल्या जन्मात तुम्ही देवाची पुष्कळ भक्ती केली आहे. त्यामुळे तुम्ही या जन्मात व्यावहारिक जीवनातही अध्यात्म जगत आहात.’’

८. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदर्भात कलाकारांना आलेल्या अनुभूती आणि कलाकारांचा त्यांच्याप्रतीचा भाव

८ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी एका कलाकारांच्या मनातील जाणून उत्तरे देणे : एक नृत्यांगना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या भेटीपूर्वी मला म्हणाल्या, ‘‘गुरुदेवांकडून मला माझ्या मागच्या जन्मातील काही समजल्यास बरे होईल.’’ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी भेटीत सहज बोलतांना त्या नृत्यांगनेला ‘त्यांची पूर्वजन्मीची साधना चांगली आहे’, असे सांगितले. त्या नृत्यांगनेला त्यांची इच्छा पूर्ण झाल्याने आनंद झाला.

८ आ. काही कलाकारांची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रथम भेटीतच भावजागृती होणे : काही कलाकारांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रथमच पाहिले असूनही त्यांच्याशी बोलतांना कलाकारांची भावजागृती होते. ज्या कलाकारांत भाव आहे, त्यांना साधनेसाठी प्रोत्साहन देऊन त्यांना साधनेत पुढे जाण्यास सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले मार्गदर्शन करतात.

भारतीय कलांचा उगम ईश्वरापासून झालेला असल्याने त्यांत मुळातच सात्त्विकता आहे.

९. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची निरपेक्ष प्रीती

९ अ. कलाकारांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात येण्याचे निमंत्रण देणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले कलाकारांना आपुलकीने सांगतात, ‘‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय तुमचे घरच आहे. ही वास्तू साधना करण्यासाठी येणार्‍यांसाठीच आपण बांधली आहे. तुम्हाला जेव्हा येथे यावेसे वाटेल, तेव्हा तुम्ही येथे येऊ शकता.’’

९ आ. एका कलाकारांच्या पत्नीने ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय हे आमचे हक्काचे घर आहे’, असे सांगणे : एक कलाकार आणि त्यांच्या पत्नी यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारले, ‘‘तुम्हाला महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात आल्यावर कसे वाटले ?’’ तेव्हा त्या कलाकारांनी सांगितले, ‘‘मला माझ्या घरासारखे वाटले.’’ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले त्यांना म्हणाले, ‘‘मला वाटले, ‘तुम्ही माहेरी आला आहात’, असे सांगाल.’’ तेव्हा त्या कलाकारांच्या पत्नीने सांगितले, ‘‘माहेर आणि सासर हे दोन्हीही शेवटी परकेच असते. आपले हक्काचे असे आपलेच घर असल्याने मी तसे म्हटले.’’ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्या कलाकारांच्या पत्नीने दिलेल्या उत्तराचे कौतुक केले.

९ इ. कलाकारांना प्रसाद पाठवणे : कलाकारांनी लिहिलेले भावपूर्ण लिखाण वाचून, तसेच त्यांनी संगीत साधनेसाठी प्रयत्न केल्याचे समजल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आवर्जून त्या कलाकारांना प्रसाद पाठवण्याचा निरोप देतात आणि त्यांना ‘लेख आवडला’, असे कळवायला सांगतात.

१०. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले करत असलेला समष्टीचा विचार

अ. कलाकार कलेच्या संदर्भातील किंवा जीवनप्रवासातील अनुभूती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सांगतात. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आवर्जून त्यांना लिहून द्यायला सांगतात. ‘कलाकारांनी सांगितलेली सूत्रे सगळ्यांना उपयोगी पडतील’, असाच  सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा व्यापक समष्टी दृष्टीकोन असतो.

आ. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात अनेक कलाकारांचे विविध संशोधनात्मक प्रयोग होतात. कलाकारांनी सादर केलेल्या कलेमुळे आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊन त्यांना हलकेपणा जाणवणे आणि त्यांची साधना चांगली होण्यास साहाय्य होणे, असे लाभ होतात. ज्या कलाकारांनी कला सादर केल्यानंतर साधकांना लाभ होतात, त्या कलाकारांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले त्यांचे गायन, वादन आणि नृत्य यांच्याशी संबंधित ‘ऑडिओ’ (ध्वनीमुद्रित फीत) आणि ‘व्हिडिओ’ (ध्वनीमुद्रित चित्रफीत) आवर्जून पाठवायला सांगतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अन्य कलाकारांना त्यांच्याकडे असलेला ‘ऑडिओ’ आणि ‘व्हिडिओ’ यांचा संग्रहित साठा महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात अभ्यास करणार्‍या साधकांना द्यायला सांगतात. हे ‘ऑडिओ’ आणि ‘व्हिडिओ’ सगळ्यांना उपयोगी पडतील’, या दृष्टीने संकेतस्थळावर ठेवता येतील’, असा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा दृष्टीकोन असतो.’

(समाप्त)

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, संगीत विशारद आणि संगीत समन्वयक), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२१.५.२०२४)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.