Chhattisgarh Return To Hinduism : छत्तीसगडमध्ये १२० जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

रायपूर – छत्तीसगडमध्ये प्रबल प्रताप सिंह जुदेव यांच्या नेतृत्वाखाली अन्य धर्मातील ५० कुटुंबांतील १२० लोकांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश (घरवापसी) केला. कंडारी येथील श्रीराम मंदिरात आचार्य श्री सतानंद महाराजजी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘श्री वनवासी रामकथा’ आयोजित करण्यात आली होती. बलरामपूर जिल्ह्यातील कांद्री येथे प्राचीन श्रीराममंदिरात भव्य कलश यात्रेने या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. या कलश यात्रेत अनुमाने ५ सहस्र महिला सहभागी झाल्या होत्या. काशी आणि प्रयागराज येथून आलेल्या ब्राह्मणांच्या उपस्थितीत अनुमाने ५० लाख भाविकांनी मंदिर परिसरात श्रीरामनामाचा जप केला.

रामकथा ऐकण्यासाठी प्रतिदिन प्रचंड गर्दी होती. कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी दिवंगत केंद्रीय मंत्री दिलीप सिंह जुदेव यांचे पुत्र प्रबल प्रताप सिंह जुदेव यांच्या पुढाकाराने ‘घरवापसी’च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीरामकथेमुळे प्रभावित होऊन हिंदु धर्मात प्रवेश करणार्‍या लोकांचे प्रबल प्रताप सिंह जुदेव यांनी पाय धुतले. कार्यक्रमाचे आयोजक श्री हनुमानजी महाराज होते. त्यांनी १२० लोकांना हिंदु धर्मात विधिवत प्रवेश दिला. प्रबल प्रताप सिंह जुदेव हे जशपूर राजघराण्यातील असून त्यांनी भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूकही लढवली होती.