तीव्र शारीरिक त्रासातही गुर्वाज्ञापालन करून सेवा करणारे शिष्य सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची देहबुद्धी न्यून करून त्यांची आध्यात्मिक प्रगती करून घेणारे गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘मागील भागात शारीरिक त्रासांची तीव्रता वाढलेली असतांना प.पू. डॉक्टरांनी या अज्ञानी जिवाकडून कशी सेवा करून घेतली ?’, हे आपण पाहिले. आठवड्यातील ४ दिवस शुद्धीकरण सत्संग (टीप १) घेण्याची सेवा केल्यावर उर्वरित ३ दिवस ‘चैतन्य वाहिनी’ची (टीप २) सेवा कशी करून घेतली ?’, ते येथे दिले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

१. तीव्र शारीरिक त्रासातही केवळ गुरुकृपेनेच केलेली ‘चैतन्य वाहिनी’ची सेवा  !

१ अ. प्रचारातील उपक्रमांची माहिती मागवणे : मला तीव्र शारीरिक त्रास होत असतांना शुद्धीकरण सत्संग नसतील, त्या ३ दिवशी माझ्याकडून गुरुकृपेने ‘चैतन्य वाहिनी’ची सेवा केली जात असे. जून २०११ पासून मी ही सेवा करत आहे. या सेवेची व्याप्ती मोठी आहे. प्रचारातील ४० जिल्ह्यांतून उपक्रमांची माहिती संगणकीय पत्राद्वारे मागवली जाते. (वर्ष २०१३ पासून ही माहिती ‘गूगल शीट’द्वारे मागवण्यात येते.) तीव्र शारीरिक त्रासातही गुरुकृपेनेच मला त्या सारण्यांचा (उपक्रमांची माहिती लिहिलेल्या तक्त्यांचा) पलंगावर पडून अभ्यास करता आला.

१ आ. ‘चैतन्य वाहिनी’ची सेवा करण्यासाठी ‘उभे रहाता यावे’, यासाठी वेदनाशामक गोळ्या आणि इंजेक्शन घेणे : मला ‘चैतन्य वाहिनी’च्या सेवेचे सादरीकरण करण्यास २ घंटे लागत असत. ‘ही माहिती सांगण्यासाठी मला उभे रहाता यावे’, यासाठी मी वेदनाशामक गोळ्या आणि इंजेक्शन घ्यायचो, तरीही तितका वेळ मला उभे रहाता येत नसे; म्हणून अर्धा ते पाऊण घंट्याचे सत्र कु. अनुराधा वाडेकर (२८.१०.२०११ या दिवशी त्या संत झाल्या.) घेत असत. तेवढा वेळ मी विश्रांती घेत असे.

१ इ. उपक्रमाच्या माहितीचे विश्लेषण करतांना इतर जिल्ह्यांना त्याचे थेट प्रक्षेपण केले जाणे : रायगड जिल्ह्यातील काही साधक रविवारी दुपारी आश्रमातील छोट्या सभागृहात एकत्र यायचे. त्यांच्यासमोर मी त्या माहितीचे विश्लेषण करत असे. तेव्हा त्याचे सर्व जिल्ह्यांत थेट प्रक्षेपण केले जात असे. अशा प्रकारे प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे मला अशक्यप्राय असलेली ही सेवा तेच माझ्याकडून करून घ्यायचे.

२. ‘चैतन्य वाहिनी’च्या कार्यक्रमाचे ध्वनीचित्रीकरण करणे

(सद़्‍गुरु) राजेंद्र शिंदे

२ अ. गुरुकृपेने ‘चैतन्य वाहिनी’च्या कार्यक्रमाचे ध्वनीचित्रीकरण करून ते प्रत्येक रविवारी सर्व जिल्ह्यांना प्रक्षेपित करायचे ठरणे : नोहेंबर २०१२ पासून प.पू. डॉक्टरांच्या कृपेने ‘चैतन्य वाहिनी’च्या कार्यक्रमाचे ध्वनीचित्रीकरण करून ते प्रक्षेपित करायचे ठरले. त्यानुसार पूर्वसिद्धता आणि अभ्यास पूर्ण झाल्यावर ‘चैतन्य वाहिनी’च्या कार्यक्रमाचे ध्वनीचित्रीकरण केले जाऊन प्रत्येक रविवारी ते सर्व जिल्ह्यांमध्ये प्रक्षेपित केले जात असे.

२ आ. ‘चैतन्य वाहिनी’च्या ध्वनीचित्रीकरणासाठी करावी लागणारी पूर्वसिद्धता !

१. सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व जिल्हे उपक्रमांची माहिती पाठवायचे. देवद आश्रमातील श्री. यज्ञेश सावंत ती माहिती एकत्रित आणि संकलित करून मला द्यायचे. त्यासाठी त्यांना पुष्कळ वेळ द्यावा लागत असे.

२. सर्व जिल्ह्यांतील साधकांकडून समष्टीला हानीकारक असलेल्या चुका मागवून घेतल्या जायच्या. त्याचा अभ्यास करून मी त्या पुढे योग्य दृष्टीकोन लिहून ठेवत असे. त्या चुका ‘चैतन्य वाहिनी’च्या माध्यमातून सांगितल्या गेल्यामुळे साधकांना शिकायला मिळून अशा प्रकारच्या चुका टाळता येणे शक्य होत असे.

३. त्याच समवेत प्रचारातील वैशिष्ट्यपूर्ण चांगले प्रयत्न आणि घटनाही मागवल्या जायच्या. तेही ‘चैतन्य वाहिनी’च्या माध्यमातून सांगितले गेल्यामुळे विविध जिल्ह्यातील साधक समष्टी प्रचारासाठी करत असलेले चांगले प्रयत्न सर्वांना कळायचे. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांना सेवा करण्यासाठी प्रोत्साहन मिळत असे.

४. अशा माहितीच्या ३० ते ३५ धारिका मला मंगळवार सकाळपर्यंत मिळायच्या. त्यातील महत्त्वपूर्ण चुका आणि वैशिष्ट्यपूर्ण चांगल्या घटना किंवा प्रयत्न यांची मी निवड करत असे.

५. या धारिकांमधून वैशिष्ट्यपूर्ण आकडेवारी संकलित करून ‘कुठल्या जिल्ह्यांचे प्रयत्न चांगले होत आहेत आणि कुठल्या जिल्ह्यांचे प्रयत्न अल्प होत आहेत’, यांच्या नोंदी केल्या जात असत.

६. ‘समष्टीसाठी हानीकारक चुका निवडणे आणि वैशिष्ट्यपूर्ण घटना निवडणे, आलेल्या माहितीचा अभ्यास करणे आणि त्यावर योग्य दृष्टिकोन लिहून ठेवणे’, यात माझा मंगळवारचा दिवस जायचा. बुधवारी सकाळपासून चित्रीकरण चालू होत असे. तत्पूर्वी निवडलेल्या भागाचा मला पुन्हा अभ्यास करावा लागत असे.

७. चित्रीकरण पूर्ण झाल्यावर शुक्रवार, शनिवार या दिवशी ध्वनीचित्रीकरण सेवेतील साधक श्री. रवि साळोखे त्याची पुढची प्रक्रिया करून रविवारी तो भाग प्रक्षेपित करायचे.

३. ‘चैतन्य वाहिनी’ची सेवा करतांना झालेले त्रास आणि त्यावर केलेले उपाय 

३ अ. ध्वनीचित्रीकरण करतांना प्रत्येक १० – १५ मिनिटांनी विश्रांती घेऊन नंतर पुन्हा ध्वनीचित्रीकरण करावे लागणे : प्रत्येक बुधवारी सकाळी १० वाजता मी कंबर आणि मान यांना पट्टा बांधून ध्वनीचित्रीकरणासाठी ध्वनीचित्रीकरण कक्षात जात असे. त्यानंतर ध्वनीचित्रीकरणाची वेशभूषा आणि इतर सिद्धता यात अर्धा-पाऊण घंटा जायचा. ध्वनीचित्रीकरण चालू केल्यानंतर १० – १५ मिनिटांनी मला त्रास होऊ लागयचा. मग मी तिथे ठेवलेल्या पलंगावर झोपायचो. थोडी विश्रांती घेतल्यावर पुन्हा ध्वनीचित्रीकरण केले जायचे. अशा प्रकारे सेवा केल्यामुळे ध्वनीचित्रीकरणाच्या या सेवेला ३ घंटे लागायचे. त्यातील अर्धा ते पाऊण घंटा पू. अनुराधा वाडेकर (३०.७.२०१५ या दिवशी त्या सद्गुरु झाल्या.) यांचे ध्वनीचित्रीकरण व्हायचे. त्या वेळी मी विश्रांती घेत पलंगावर पडून अन्य सेवा करत असे.

३ आ. पोटातील वायूचा आवाज ध्वनीचित्रीकरणातही येणे, त्यामुळे पुन्हा ध्वनीचित्रीकरण करावे लागणे : मला पोटाचे विकार असल्यामुळे ध्वनीचित्रीकरण करतांना पोटातील वायू फिरायला लागल्यावर ध्वनीचित्रीकरणामध्ये तो आवाज यायचा. त्यामुळे काही वेळा पुन्हा ध्वनीचित्रीकरण करावे लागायचे.

३ इ. ध्वनीचित्रीकरणात आलेले आध्यात्मिक अडथळे आणि त्याचे निराकरण : काही वेळा ध्वनीचित्रीकरणात आध्यात्मिक अडथळे यायचे, उदा. चित्रीकरण कक्षातील दिवे अकस्मात् बंद पडणे, चित्रीकरण न होणे, वातानुकूलित यंत्रणा नादुरुस्त किंवा बंद होणे इत्यादी. या अडथळ्यांचे निवारण करण्यातही वेळ जायचा. वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्यावर पुष्कळ त्रास व्हायचा. ध्वनीचित्रीकरणासाठी लावलेल्या ‘हॅलोजन’च्या दिव्यामुळे पुष्कळ गरम व्हायचे. मग प्रत्येक १० ते १५ मिनिटांनी चित्रीकरणकक्षाची दारे उघडायची. पंखे उलटे फिरवून आतील गरम हवा बाहेर काढायचो, त्यानंतर पुन्हा चित्रीकरण चालू करायचो.

३ ई. वैद्यकीय उपचारांसाठी पुणे येथे जावे लागणे : वर्ष २०१४ मध्ये मी वैद्यकीय उपचारांसाठी एक मास पुणे येथे राहिलो होतो. गुरुकृपेने भगवंताने पुणे येथील एका साधकाच्या घरी ‘चैतन्य वाहिनी’ची सेवा ध्वनीचित्रीकरणासह करून घेतली.

४. ‘चैतन्य वाहिनी’ची सेवा करतांना साधकांना साधनेविषयी करत असलेल्या  मार्गदर्शनाचा लेख लिहून तो दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित करायला पाठवणे

‘चैतन्य वाहिनी’च्या कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन केले जायचे. प.पू. डॉक्टरांनी त्या मार्गदर्शनाचा लेख लिहून तो रविवारी कार्यक्रमाचे प्रक्षेपण होण्यापूर्वी, म्हणजेच शनिवारी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित करण्याविषयीचा निरोप साधकाद्वारे दिला होता. त्यामुळे मला त्या विषयाची सिद्धता करावी लागायची. ध्वनीचित्रीकरणाच्या मधल्या वेळेत किंवा रात्री मला त्या विषयाची सिद्धता करून तो लेख अंतिम करावा लागत असे. मी झोपूनच विषय सांगत असे आणि श्री. यज्ञेश सावंत त्याचे टंकलेखन करत असे. तो लेख गुरुवारपर्यंत संकलन करणार्‍या साधकांना पाठवावा लागत असे. संकलक त्याचे संकलन करून शुक्रवारी तो लेख दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये देत आणि शनिवारी तो लेख छापून येत असे. या व्यतिरिक्त प्रचारात चालू असलेल्या मोहिमांविषयीचे लेखही दैनिक ‘सनातन प्रभात’साठी पाठवले जायचे, उदा. गुढीपाडवा, गुरुपौर्णिमा, गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन इत्यादी.

असे साधारण १०० हून अधिक भागांचे ध्वनीचित्रीकरण करून प्रक्षेपण केले गेले. त्यानंतर ध्वनीचित्रीकरणाच्या माध्यमातून ‘चैतन्य वाहिनी’ची सेवा बंद करून संगणकीय पत्राद्वारे माहिती कळवायला आरंभ केला.’

(क्रमशः)

– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.३.२०२४)

  • टीप १- साधकांचे स्वभावदोष आणि अहं न्यून करण्यासाठी त्यांच्याकडून झालेल्या चुका सत्संगात सांगून ‘योग्य काय असायला हवे ?’, ते सांगणे.
  • टीप २ – सनातन संस्थेकडून प्रचारासाठी काही उपक्रम घेतले जातात. त्यासाठी काही जिल्ह्यांनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न, जिल्ह्यातील साधकांकडून झालेल्या चुका, त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे इत्यादी मागवून त्याचे विश्लेषण करून ती माहिती सर्व जिल्ह्यांना पाठवली जाते. प्रतिसप्ताह केल्या जाणार्‍या या सेवेला ‘चैतन्य वाहिनी’ची सेवा’, असे म्हटले जाते.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/799765.html