Dabholkar Murder Case Verdict : डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी ३ जण निर्दोष, तर २ जण दोषी !

  • सनातन संस्थेचे विक्रम भावे, हिंदु जनजागृती समितीशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची निर्दोष मुक्तता !

  • सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेप !

  • तब्बल ८ वर्षांनंतर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे कारागृहाबाहेर येणार !

  • सर्व संशयितांवरील ‘यू.ए.पी.ए.’ (बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा) न्यायालयाने हटवला !

पुणे, १० मे (वार्ता.) – मागील ११ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाच्या महत्त्वपूर्ण खटल्याचा निकाल १० मे २०२४ या दिवशी पुणे येथील विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी घोषित केला. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआयने) दोषारोप ठेवलेले मुख्य संशयित हिंदु जनजागृती समितीशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सनातनचे साधक श्री. विक्रम भावे आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची या प्रकरणात सबळ पुराव्यांअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

अन्य संशयित सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना जन्मठेप आणि प्रत्येकी ५ लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. सीबीआयकडून विशेष सरकारी अधिवक्ता प्रकाश सूर्यवंशी यांनी सरकारची बाजू मांडली. या निकालामुळे सीबीआयने १० जून २०१६ या दिवशी अटक केलेले डॉ. वीरेंद्रसिंह तावडे तब्बल ८ वर्षांनंतर कारागृहातून बाहेर येतील.

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक –

शरद कळसकर आणि सचिन अंदुरे

या वेळी न्यायाधिशांनी सांगितले, ‘‘अन्वेषण यंत्रणेच्या वतीने डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यावर मुख्य सूत्रधार म्हणून जो आरोप करण्यात आला होता तो सरकारी पक्ष सिद्ध करू शकला नाही, तसेच श्री. विक्रम भावे आणि अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्यावरील कोणताही आरोप सिद्ध होऊ शकला नाही.’’ या प्रकरणी प्रारंभीपासून सनातन संस्थेच्या विरोधात कोणतेच पुरावे नसतांना ते ओढून-ताणून सिद्ध करण्यात आले आणि सनातन संस्थेच्या साधकांना यात अकारण गोवण्यात आले. न्यायालयाच्या या निकालामुळे ‘सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही’, (सत्य समोर येण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो; पण ते हरू शकत नाही.) हेच परत एकदा सिद्ध झाले.

सनातन संस्था सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्या खंबीरपणे पाठिशी – चेतन राजहंस

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातून सनातन संस्थेचे निर्दोषत्व सिद्ध झाले असले, तरी श्री. सचिन अंदुरे आणि श्री. शरद कळसकर या हिंदुत्वनिष्ठांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. श्री. अंदुरे आणि श्री. कळसकर या  हिंदुत्वनिष्ठांना अर्बन नक्षलवादांच्या हिंदुत्त्वाच्या विरोधातील षडयंत्राचा भाग म्हणून गोवण्यात येत आहे. त्यामुळे श्री. अंदुरे आणि श्री. कळसकर यांना न्याय मिळेपर्यंत सनातन संस्था त्यांच्या खंबीरपणे पाठिशी आहे. त्यांना न्याय मिळण्यासाठी उच्च न्यायालयात जाऊनही लढा देऊ.

संशयितांच्या वतीने खटला लढवणारे अधिवक्ता !

मुंबई उच्च न्यायालयाचे धडाडीचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर आणि अधिवक्त्या सुवर्णा वत्स-आव्हाड यांनी संशयितांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली. अन्वेषण यंत्रणांनी खोटे पुरावे आणि साक्षीदार उभे करून आरोपींचे जीवन उद्ध्वस्त करण्याचा जणू कट रचला होता; मात्र अभ्यासपूर्ण आणि परखडपणे प्रतिवाद करून या सर्वच रणझुंजार अधिवक्त्यांनी लढा दिला.

सबळ पुरावे सादर करण्यास अन्वेषण यंत्रण अपयशी !

‘डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यावर हत्येचा प्रत्यक्ष कट रचल्याच्या आरोपाच्या अंतर्गत त्यांच्यावर संशय ठेवता येऊ शकतो; परंतु त्यांच्या विरोधात अन्वेषण अधिकारी सबळ पुरावे सादर करू शकले नाहीत, तसेच संशयाचे पुराव्यात रूपांतर करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला आहे. त्यामुळे त्यांना निर्दोष मुक्त करण्यात येत आहे’, असे या वेळी न्यायाधीशांनी नमूद केले. दाभोलकर हत्येप्रकरणी अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि श्री. विक्रम भावे यांच्यावर शस्त्र नष्ट करण्यास साहाय्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. तो चुकीचा असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले.

सर्व संशयितांवरील ‘यु.ए.पी.ए.’ न्यायालयाने हटवला !

डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणातील सर्व आरोपींवर देशद्रोही कारवायांच्या अंतर्गत केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने ‘यु.ए.पी.ए.’ (बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा) अंतर्गत कलम लावले होते. सर्व आरोपींवरील हे गंभीर कलम न्यायालयाने हटवले आहे. हे कलम हटवतांना न्यायाधीशांनी म्हटले, ‘‘अधिकार्‍यांनी दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे ‘यु.ए.पी.ए.’ सिद्ध होत नाही.’’

अंनिस, पुरोगामी, काँग्रेसी, तसेच साम्यवादी यांना सणसणीत चपराक !

डॉ. दाभोलकर हत्या खटल्याच्या आडून अंनिस, पुरो(अधो)गामी, काँग्रेसवाले, साम्यवादी कथित पुरोगामी आणि काही हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे सातत्याने सनातन संस्थेला ‘आतंकवादी संघटना’ ठरवून तिच्यावर बंदी घालण्याची मागणी करत होते. न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे सनातन संस्थेचे निर्दोषत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रारंभीपासून सनातन संस्थेवर वृथा दोषारोप करणार्‍या अंनिस, पुरोगामी, काँग्रेसी, तसेच साम्यवादी यांना सणसणीत चपराक बसली आहे.

हत्या प्रकरणाचा थोडक्यात घटनाक्रम !

डॉ. दाभोलकर

१. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ या दिवशी पुणे येथील महर्षी विठ्ठल शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ‘डॉ. दाभोलकर ‘मॉर्निंग वॉक’ला बाहेर गेले असता ही हत्या झाली’, असा सरकार पक्षाचा दावा होता. या प्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने ५ जणांच्या विरोधात दोषारोप ठेवण्यात आले होते. यात मुख्य सूत्रधार म्हणून डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हे, तर सचिन अंधुरे आणि शरद कळसकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचा, तसेच विक्रम भावे आणि अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्यावर शस्त्र नष्ट करण्यास साहाय्य केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

२. संशयितांवर भारतीय दंडसंहिता (आयपीसी) कलम ३०२ (हत्या), १२० बी (गुन्ह्याचा कट रचणे), ३४ नुसार आणि शस्त्र अधिनियम संबंधित कलमांतर्गत, तसेच यु.ए.पी.ए. अंतर्गत हे गुन्हे नोंद करण्यात आले होते.

३. १५ सप्टेंबर २०२१ ला या सर्वांवर दोषारोप निश्‍चिती करून खटल्याची सुनावणी चालू करण्यात आली. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने २० साक्षीदार तपासण्यात आले. यांत मुख्यत्वे सीबीआयचे अन्वेषण अधिकारी एस्.आर्. सिंग, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा मुलगा डॉ. हमीद दाभोलकर यांचा समावेश आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या १२ जून २०१६ या दिवशी डॉ. तावडे यांना अटक केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावर ‘जसे धर्मद्रोह्यांच्या आरोपांतून कांची पीठाधीश्‍वर स्वामी जयेंद्र सरस्वती निर्दोष सुटले, साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावरील आरोपही खोटे ठरले, त्याप्रमाणे आगामी काळात सनातनचेही निर्दोषत्व सिद्ध होईल !’, असे म्हटले होते. आज १० मे २०२४ या दिवशी ‘सनातनचे निर्दोषत्व’ सिद्ध झाले आहे.

मुंबई येथील पत्रकार परिषद