राहुल गांधी यांनी पूर्वी एका बैठकीत वक्तव्य केल्याचा काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णम् यांचा दावा !
संभल (उत्तरप्रदेश) – जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने श्रीराममंदिराचा निकाल दिला, तेव्हा राहुल गांधी यांनी त्यांचे निकटवर्तीय नेत्यांची बैठक घेतली होती. त्यांनी म्हटले होते की, ‘काँग्रेस पुन्हा निवडून आल्यावर आपण श्रीराममंदिरावरील निकाल उलथवून लावू. यासाठी आपण एक शक्तीशाली समिती (सुपरपावर कमिटी) स्थापन करू. ज्याप्रकारे शाहबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल रद्दबातल ठरवत राजीव गांधी यांनी कायदा केला होता, त्याप्रकारेच आपण श्रीराममंदिरावरील निकाल रहित करू’, असा दावा काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णम् यांनी केला आहे. श्री कल्कि धामचे पीठाधीश्वर आचार्य प्रमोद कृष्णम् हे ३२ वर्षे काँग्रेसचे नेते होते.
आचार्य कृष्णम् पुढे म्हणाले की,
१. राहुल गांधी आणि त्यांचा गट या देशाला तोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
२. आधीची काँग्रेस आणि वर्तमानातील काँग्रेस यांच्यात पुष्कळ भेद आहे. मी ३२ वर्षे काँग्रेससमवेत राहिलो आहे.
३. काँग्रेस मोठा पक्ष आहे. जेव्हा त्याची स्थापना झाली, तेव्हा तिच्यात देशभक्त नेते होते. त्या वेळी त्यांनी देशाला जोडण्याचे काम केले होते.
४. राहुल गांधी आणि त्यांचे निकटवर्तीय यांना देशाला जात, धर्म, भाषा अन् प्रांत यांच्या नावावर तोडायचे आहे. त्यामुळे ते चुकीची वक्तव्ये करत आहेत.
४ जूननंतर काँग्रेसचे २ तुकडे होतील !
४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यावर आचार्य कृष्णम् म्हणाले की, ४ जूननंतर काँग्रेसचे २ तुकडे होतील. एक भाग राहुल गांधी यांचा, तर दुसरा भाग प्रियंका वढेरा यांचा असेल. काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते यांच्या मनात एक ज्वालामुखी धगधगत असून ४ जूननंतर त्याचा स्फोट होईल. प्रियांका वढेरा यांच्यासमवेत एक षड्यंत्र रचले गेले आहे. त्यांना पक्षाचा अध्यक्ष बनवण्यापासून आणि राज्यसभेत जाण्यापासून रोखले जात आहे. त्यांना कोणतेच महत्त्वपूर्ण दायित्वही दिले गेलेले नाही. राहुल गांधी यांच्या गटाची इच्छा आहे की, प्रियांका यांनी राजकारणातून बाहेर जावे. यामुळे प्रियांका यांचे समर्थक दु:खी आहेत.
संपादकीय भूमिकाहिंदूंना नेहमीच सापत्नभावाची वागणूक देणार्या काँग्रेसच्या राहुल गांधी यांच्यावरील या दाव्यात तथ्य आढळल्यास आश्चर्य वाटू नये ! |