संपादकीय : काँग्रेसची विनाशकाले विपरीतबुद्धिः !

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त कांकेर जिल्ह्यातील हिदूर आणि कालपर गावांच्या अरण्यात नुकतेच सुरक्षादलाचे सैनिक अन् नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत २९ नक्षलवादी ठार झाले होते. कांकेर जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी सीमा सुरक्षा दलाचे सैनिक मोठ्या संख्येने तैनात होते. त्यांच्याशी झालेल्या चकमकीत नक्षली कमांडर शंकर राव आणि ललिता ठार झाल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षायंत्रणांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले असून घायाळ सैनिकांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थनाही केली आहे. जानेवारी २०२४ पासून चालू असलेल्या कारवाईत अवघ्या ४ महिन्यांत बस्तर परिसरात पोलीसदल आणि सुरक्षायंत्रणा यांनी तब्बल ७९ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. कांकेर येथील घटनेनंतर काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी नक्षलवाद्यांना ‘हुतात्मा’ संबोधले आणि ‘या चकमकीचे सखोल अन्वेषण होणे आवश्यक आहे’, अशी मुक्ताफळे उधळली. देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे झाली, तरीही काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये काहीही फरक पडलेला नाही. देशासाठी हुतात्मा झालेल्या सैनिकांऐवजी आतंकवादी आणि नक्षलवादी यांना ‘हुतात्मा’ समजणे, आतंकवाद्यांच्या कुटुंबांना साहाय्य करणे, असे पाप काँग्रेसच्या नेत्यांनी वारंवार केले आहे. त्यामुळे जनता असे पाप करणार्‍यांना मुळीच क्षमा करणार नाही. नक्षलवाद्यांना ‘हुतात्मा’ म्हणणे, ही मानसिक आणि नैतिक दिवाळखोरी आहे. नक्षलवाद्यांमुळे देशाची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मोठी हानी होत आहे. नक्षलवादी भागांत सायंकाळी ६ नंतर काहीच करता येत नाही. नक्षलवादग्रस्त भागांत गेल्या २५ वर्षांपासून दळणवळण बंदी चालू आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडणे आवश्यक आहे. नक्षलवादी स्थानिक लोकांकडून प्रचंड खंडणी गोळा करतात. छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील गडचिरोली भागांत प्रचंड नैसर्गिक खनिज संपत्ती आहे; परंतु नक्षलवाद्यांमुळे तेथे खाणी चालू करता येत नाहीत. त्यामुळे त्याचा देशाला लाभ होत नाही. भारताला वीजनिर्मिती उद्योगासाठी प्रचंड कोळसा लागतो. तो ऑस्ट्रेलियाकडून आयात करावा लागतो. नक्षलवाद्यांना भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करायची आहे. त्यामुळे नक्षलवाद किंवा माओवाद नष्ट करणे आवश्यक आहे. असे असतांना नक्षलवाद्यांना ‘हुतात्मा’ म्हणतांना काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांना काहीच कसे वाटत नाही, असा प्रश्न पडतो. केवळ सत्ता मिळवण्यासाठी अशी विधाने करून मुसलमान, बहुजन समाज, आदिवासी यांची मते मिळवणे, हा एककलमी कार्यक्रम काँग्रेसने कायमस्वरूपी राबवला आहे. सुप्रिया श्रीनेत यांच्या वक्तव्यावरून भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. भाजपने ‘एक्स’वर श्रीनेत यांच्या विरोधात ‘हॅशटॅग’ (एकाच विषयावर चर्चा घडवून आणणे) चालू करून त्यांच्यावर टीका केली आहे.

काँग्रेसची स्थिती भरकटलेल्या नौकेसारखी !

वर्ष २००९ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने सांगितले होते की, आम्ही पुढील काही वर्षांत नक्षलवादाचे कंबरडे मोडू; पण तसे काही झाले नाही. आता वर्ष २०२१ मध्ये गृहमंत्री अमित शहा यांनीही म्हटले होते की, आम्ही नक्षलवादाचे कंबरडे मोडू. यात त्यांना यश मिळत आहे. खरेतर अशा काँग्रेसचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी राष्ट्रप्रेमींना लोकसभेच्या निवडणुकीत संधी आहे. ती त्यांनी गमावू नये. जिहादी आतंकवादी, नक्षलवादी आणि धर्मांध यांचे उदात्तीकरण करणार्‍या काँग्रेसने भारतावर सर्वाधिक राज्य केले, हे त्याहून अधिक लज्जास्पद आहे. समुद्रात एखादी नौका भरकटल्यावर तिचे जे काही होते, तसेच सध्या काँग्रेसचे झाले आहे. लोकशाहीच्या समुद्रात काँग्रेसची नौका आता बुडण्याच्या सिद्धतेत आहे. देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वहात असतांना काँग्रेसवाल्यांना काय, केव्हा, कुठे आणि कसे बोलायचे याचे भान राहिलेले नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी एक बोलतात, मल्लिकार्जुन खर्गे वेगळाच सूर लावतात. काँग्रेस सैरभैर झाली आहे. त्यामुळेच तो पक्ष पूर्णपणे नैराश्याच्या गर्तेत गेला आहे. काँग्रेसच्या काळातल्या घोटाळ्यांची मालिका पाहिली, तर काँग्रेसने कोळसा घोटाळा, मनरेगा घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा, लवासा घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळा अशा अनंत घोटाळ्यांची प्रचंड रांग इतिहासाच्या पानांवर उपस्थित केली आहे. अशा घोटाळेबाज काँग्रेसकडून नक्षलवाद्यांचा बीमोड करण्याची अपेक्षा काय करणार ? याही पुढे जाऊन श्रीनेत यांनी असे वक्तव्य करून भारतातील नक्षलप्रेमी, पुरो(अधो)गामी, हिंदुद्वेष्टे आणि निधर्मी यांची मते मिळवण्याचा प्रयत्न केला आहे का ?, असा प्रश्नही जनतेच्या मनात उपस्थित होतो. या सर्वांची मते मिळवण्याचा काँग्रेसवाल्यांनी कितीही प्रयत्न केला, तर बहुतांश भारतीय समाज हा राष्ट्रप्रेमी आहे. त्यामुळे आतंकवादी असोत किंवा नक्षलवादी त्यांचे उदात्तीकरण तो कधीही खपवून घेणार नाही.

काँग्रेस इतिहासजमा होईल !

श्रीमती सोनिया गांधी

‘काँग्रेसच्या नेतृत्वातील संपुआ सरकार चालवण्यासाठी श्रीमती सोनिया गांधी यांनी स्थापन केलेल्या घटनाबाह्य राष्ट्रीय सल्लागार परिषदेत नक्षलवादाचे समर्थन करणारे बुद्धिजीवी होते’, असा आरोप केला जायचा. दंडकारण्यात फोफावलेला नक्षलवाद रोखण्यात काँग्रेस सरकारला अपयश आले होते. नक्षलवादी चळवळ म्हणा अथवा माओवादी, देशासाठी घातक ठरणारे, देशाचे तुकडे करणारा आतंकवाद हा काँग्रेसच्या काळातच फोफावला आहे. ईशान्येतील बंडखोर, काश्मीर आणि पंजाब या राज्यांतील आतंकवाद, नेपाळच्या सीमेपासून ते आंध्रप्रदेशपर्यंत माओवाद्यांचा ‘रेड कॉरिडोर’ काँग्रेसच्या काळातच वाढला, ही वस्तूस्थिती आहे. वर्ष २०१४ पर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांनी नक्षलवादाच्या विरोधात विशेष काम केले नाही. तत्कालीन गृहमंत्री आणि काँग्रेसचे नेते चिदंबरम् यांनी त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा प्रयत्न केला; पण त्याला त्यांच्याच पक्षातून विरोध झाला. ‘नक्षलवादी हे आपलेच लोक असून ते गरिबांसाठी लढतात’, असा त्यांचा दावा होता. चिदंबरम् यांनी २ लाखांहून अधिक अर्धसैनिक दलाचे सैनिक नक्षलग्रस्त असलेल्या मध्य भारतात पाठवले. त्या राज्यांत ‘अर्धसैनिक दलाच्या माध्यमातून आपण नक्षलवाद्यांच्या विरोधात आक्रमक कारवाई करूया’, असे त्यांना वाटत होते. त्यासाठी त्यांनी ‘ऑपरेशन ग्रीन हंट’ नावाचे अभियान चालू केले आणि ते केवळ कागदावरच राहिले. असा काँग्रेसचा भोंगळ कारभार आहे. काँग्रेसचा देशविघातक कारभार पहाता पुढील काळात जनतेने तिला झिडकारले आणि हा पक्ष इतिहासजमा झाला तर, आश्चर्य वाटणार नाही.

राष्ट्रविघातक मानसिकता असलेली काँग्रेस भविष्यात इतिहासजमा झाल्यास आश्चर्य ते काय ?