केरळचे साम्यवादी मुख्यंमत्री पिनराई विजयन् यांचा दावा !
मल्लपूरम् (केरळ) – ‘भारतमाता की जय’ आणि ‘जय हिंद’ या २ घोषणा मुसलमानांनी सर्वप्रथम दिल्या, असा दावा केरळचे मुख्यंमत्री पिनराई विजयन् यांनी केला आहे. येथे नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या (सीएएच्या) विरोधात आंदोलनाच्या वेळी बोलतांना त्यांनी हा दावा केला. या कायद्यानुसार अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांतील अल्पसंख्य निर्वासितांना भारताचे नागरिकत्व देण्यात येणार आहे.
१. मुख्यमंत्री विजयन् म्हणाले की, आपण पाहिले की, संघ परिवाराचे नेते येऊन भाषण करतात. या वेळी उपस्थित लोकांना ते ‘भारतमाता की जय’, अशा घोषणा देण्यास सांगतात. ही घोषणा संघ परिवाराशी निगडित व्यक्तीने शोधली आहे का ? ही घोषणा सर्वप्रथम ज्याने दिली, त्या व्यक्तीचे नाव आहे अझिमुल्ला खान. १९ व्या शतकात मराठा पेशवे नानासाहेब यांचे ते प्रधान होते. एका मुसलमानाने ही घोेषणा शोधल्यामुळे ते (भाजपवाले) कदाचित् उद्या ही घोषणा देणेच बंद करतील का ? याबाबत मला तरी कल्पना नाही.
२. मुख्यमंत्री विजयन् यांनी ‘जय हिंद’ ही घोषणाही अबिद हसन साफ्रानी या मुसलमानाने दिल्याचाही दावा केला. ते म्हणाले की, संघ परिवाराचे जे लोक मुसलमानांना ‘देश सोडून जा’, असे सांगतात त्यांनी या ऐतिहासिक सत्याकडे डोळे उघडे ठेवून पाहावे.
३. ‘सारे जहां से अच्छा’ हे लोकप्रिय गीत महंमद इक्बाल यांनी रचले असल्याची आठवण मुख्यमंत्री विजयन् यांनी करून दिली. (याच इक्बाल यांनी फाळणीनंतर पाकिस्तानात गेल्यावर ‘सारे जहां से अच्छा हिंदोस्ता..’ या ठिकाणी ‘पाकिस्तान’ असा पालट केला होता, हे मुख्यमंत्री विजयन् का सांगत नाहीत ? – संपादक)
४. मुख्यमंत्री विजयन् म्हणाले की, मुसलमान शासकांनी आणि इतरांनी भारताचा इतिहास आणि संस्कृती यांत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच मुसलमानांमधील एका मोठ्या वर्गाने स्वातंत्र्य चळवळीच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली. (‘खोटे बोला; पण रेटून बोला’ या मनोवृत्तीचे विजयन् ! मुसलमानांनी स्वातंत्र्यासाठी नाही, तर भारताची फाळणी करून पाकिस्तानची निर्मिती करण्यासाठी हिंदूंवर अत्याचार केले, हा खरा इतिहास आहे, जो विजयन् लपवत आहेत ! – संपादक)
संपादकीय भूमिकामुख्यमंत्री विजयन् यांचा दावा खरा मानला, तर भारतातील मुसलमान या दोन्ही घोषणा म्हणण्यास नकार का देतात ? हे त्यांनी सांगायला हवे ! |