Abhijit Gangopadhyay : ‘गोडसे यांनी गांधीची हत्या करण्याचा निर्णय का घेतला ?’, हे जाणून घेणे आवश्यक !

  • बंगालमधील भाजपचे उमेदवार आणि माजी न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय यांचे विधान !

  • गंगोपाध्याय यांची उमेदवारी रहित करण्याची काँग्रेसची मागणी

बंगालमधील भाजपचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय व काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश

कोलकाता (बंगाल) – मी विधी क्षेत्रातून आलो आहे. प्रत्येक प्रकरणाची दुसरी बाजू असते, ती जाणून घेणे मला महत्त्वाचे वाटते. गोडसे यांनी गांधी हत्येविषयी पुस्तक लिहिले आहे. बंगालीत ते उपलब्ध होते; मात्र आता नाही. ‘गोडसे यांचे साहित्य वाचून त्यांनी महात्मा गांधी यांची हत्या करण्याचा निर्णय का घेतला?’, हे जाणून घेण्याची मला आवश्यकता वाटते. हे जोपर्यंत मी जाणून घेत नाही, तोपर्यंत मी गांधी आणि गोडसे यांच्यापैकी कुणा एकाची निवड करणार नाही, असे विधान कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि भाजपाने उमेदवारी घोषित केलेले अभिजीत गंगोपाध्याय यांनी नुकतेच एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना केले. या विधानावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला असून त्यांची लोकसभेची उमेदवारी परत घ्यावी, अशी मागणी भाजपकडे केली आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक्स’वर प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की, गंगोपाध्याय यांचे विधान पूर्णपणे अस्वीकार्य असून त्यांनी महात्मा गांधी यांचा वारसा जपण्यासाठी कोणताही प्रयत्न केलेला नाही. (म. गांधी यांचा वारसा जपण्याचे या देशातील कोणत्याही नागरिकावर बंधन नाही. प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे ! – संपादक) त्यामुळे त्यांची उमेदवारी तात्काळ मागे घ्यावी. राष्ट्रपित्यांच्या विचारांच्या संरक्षणासाठी आजचे राष्ट्रप्रमुख कोणता निर्णय घेतील? असाही प्रश्‍न जयराम रमेश यांनी उपस्थित केला.

(सौजन्य : India Today)

संपादकीय भूमिका

  • ओसामा बिन लादेनला ‘लादेनजी’ म्हणणारे काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह, देहलीतील बाटला हाऊस येथे जिहादी आतंकवादी ठार झाल्यावर रडणार्‍या सोनिया गांधी यांच्याविषयी काँग्रेस का बोलत नाही ?
  • भारताच्या फाळणीला अनुमती देणारे गांधी, फाळणीमुळे भारतात परतलेल्या हिंदूंना ओसाड मशिदीतून ऐन थंडीच्या काळात हाकलण्यास भाग पाडणारे गांधी, फाळणीच्या वेळी १० लाख हिंदूंच्या हत्येला एक प्रकारे उत्तरदायी असणारे गांधी, काश्मीरवर आक्रमण करणार्‍या पाकिस्तानला तेव्हाचे त्याच्या वाट्याचे ५५ कोटी (आताचे अनुमाने १ सहस्र २०० कोटी) देण्यासाठी उपोषण करणारे गांधी, हा इतिहास कुणी कसा विसरू शकतो ?