स्वातंत्र्य कधीही भीक म्हणून मिळत नाही, ते लढूनच प्राप्त होते. अन्यायी प्रवृत्ती वरचढ होते, तेव्हा त्यांचे निर्दालन शस्त्रानेच करावे लागते. रामायण, महाभारत इथपासून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यापर्यंतचा प्रत्यक्ष इतिहास याचा साक्षीदार आहे. अहिंसेने स्वराज्य मिळत असते, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांकडे त्यासाठी याचना केली नसती का ? महाराणा प्रताप यांना अकबराच्या विरोधात लढा पुकारण्याची काय आवश्यकता होती ? उपोषण करून स्वातंत्र्य मिळाल्याचे जगाच्या पाठीवर एकही उदाहरण नाही.
भारताच्या स्वातंत्र्यासाठीही असंख्य क्रांतीकारकांनी प्राण समर्पित केले. हे उघड सत्य असतांना ‘स्वातंत्र्य अहिंसेने मिळाले’, हा भ्रम आला कुठून ? भारतीय स्वातंत्र्यासाठी वर्ष १८५७ मधील लढ्याला ‘बंड’ म्हणून संबोधण्याचे मुख्य कारण भारतियांची विजीगुषी वृत्ती नष्ट करून त्यांचे खच्चीकरण करणे होते. जे इंग्रजांनी स्वातंत्र्यपूर्वकाळात केले, तेच काँग्रेसने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर केले. केवळ आणि केवळ भारतात काँग्रेसचे सत्तास्थान बळकट करण्यासाठी गांधीगोंधळाचा आधार घेऊन अहिंसेचे जाणीवपूर्वक उदात्तीकरण करण्यात आले.
स्वातंत्र्यानंतर स्वत:चे स्थान बळकट करण्यासाठी काँग्रेसचे भारतियांमध्ये जाणीवपूर्वक हा भ्रम निर्माण केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी वर्ष १८५७ च्या लढ्याचा ‘स्वातंत्र्यसमर’ असा उल्लेख करून भारतियांना स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी पुन्हा प्रेरित केले होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर इतक्या वर्षांत काँग्रेसने गांधीच्या अहिंसावादाचे उदात्तीकरण करून क्रांतीकारकांचे हौतात्म्य झाकोळण्याचा प्रयत्न केला. हेच सत्य ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटातून मांडण्यात आले आहे. पोकळ अहिंसावाद उघड करून ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले ?’ हे सत्य भारतियांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.
स्वातंत्र्यवीरांनी केलेल्या या क्रांतीयज्ञात समिधा टाकण्याचा खारीचा वाटा म्हणजे क्रांतीवीरांचे हे कार्य सर्वांपर्यंत पोचवण्याचा हा लेखप्रपंच होय !
१. स्वातंत्र्यवीरांचे व्यक्तिमत्त्व ‘सजीव’ करणारा अभिनय !
या चित्रपटाची सर्वांत तगडी बाजू म्हणजे रणदीप हुडा यांचा अभिनय होय. एखाद्या कलाकाराने साकारलेली व्यक्तीरेखा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणे, हे त्या कलाकाराचे यश म्हणता येईल. ‘रामायण’, ‘महाभारत’ या मालिकांमध्ये काम केलेल्या कलाकारांना आजही त्यांनी साकारलेल्या व्यक्तीरेखांच्या मभभूमिकेतून पाहिले जाते. मराठी चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी भूमिका साकारणारे सूर्यकांत यांनी इतका चांगल्या प्रकारे अभिनय केला की, पुढे अनेकांनी शिवरायांचे चित्र त्यांच्याप्रमाणे काढले. याला ‘अभिनय करतांना ती व्यक्तीरेखा स्वत:मध्ये आणणे’ असे म्हणता येईल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी घेतलेले कष्ट अनुभवणे, त्यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास करणे, याविना त्यांची भूमिका यशस्वीरित्या साकारणे शक्य नाही. रणदीप हुडा यांनी यासाठी घेतलेले कष्ट त्यांच्या भूमिकेतून दिसून येतात.
२. वास्तव चित्रीकरणावर भर !
अभिनय करतांना कलाकाराने ती व्यक्तीरेखा पूर्ण समजून घेऊन अभिनय करणे अपेक्षित असते; मात्र अनेकदा ‘आपण चांगला अभिनेता आहोत’ हे दाखवण्यासाठी अभिनयात अतिशयोक्ती (‘ओव्हर ॲक्टिंग’) केली जाते. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटामध्ये रणदीप हुडा यांचीच नव्हे, तर अन्य कलाकारांच्या संदर्भात असे कुठेही आढळून आले नाही, ही या चित्रपटाची आणखी एक भक्कम बाजू म्हणता येईल. भारतातील तत्कालीन परिस्थिती, इंग्लंडमधील आधुनिक जीवन साकारण्याचा यशस्वी प्रयत्न चित्रपटात करण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याप्रमाणे हुडा यांनी स्वत:ची काटक शरीरयष्टी निर्माण केली आहे. त्यासाठी त्यांनी पुष्कळ मेहनत घेतली. थोडक्यात सर्वच कलाकारांचा अभिनय उत्तम ठरला.
३. असे आहे ओघवते आणि उत्कृष्ट कथानक !
बालवयात श्री अष्टभुजादेवी पुढे मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी ‘मारिता मारिता मरेन झुंजेन ।’ ही घेतलेली शपथ, बालवयातच मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी स्थापन केलेल्या ‘मित्रमेळा’च्या येथून चित्रपटाच्या कथेचा प्रारंभ होतो.
लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेने पुणे येथे सावरकर यांनी केलेली विदेशी कपड्यांची होळी, शिक्षणाच्या निमित्ताने इंग्लंडमधील ‘इंडिया हाऊस’मधील क्रांतीकार्य, अटकेनंतर अंदमानातील मरणप्राय शिक्षा, तेथे बंदीवानांच्या मूलभूत हक्कांसाठी दिलेला लढा, अंदमानातील मुसलमान बंदीवानांकडून हिंदू बंदीवानांचे होणारे धर्मांतर रोखण्याचा प्रयत्न, अंदमानातून भारतात आणल्यानंतर रत्नागिरीमधील कारावास, त्यानंतर जातीयवादाचे उच्चाटन आणि हिंदूसंघटनाचे कार्य, राष्ट्रहिताचे राजकारण, क्रांतीकारकांचे मार्गदर्शक, भारताचे विभाजन ते गांधी हत्येसाठी झालेली अटक या घटनांना चित्रपटातून हात घालण्यात आला आहे. हा सर्व घटनाक्रम चित्रपटात प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राष्ट्रप्रेम, हिंदुत्व, राजकारण, समाजकारण, साहित्यलेखन आदी विविध पैलू ३ घंट्यांत चित्रपटात उत्कृष्टपणे साकारण्यात आले आहे.
४. अंदमानातील क्रांतीकारकांच्या यातनांचे भीषण वास्तव !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर यापूर्वीही चित्रपट आला आहे; मात्र या चित्रपटामध्ये अंदमानातील काळ्या पाण्याच्या शिक्षेची भयावहता अधिक सखोलपणे मांडण्यात आली आहे. या भीषण परिस्थितीत गेलेल्या बंदीवानांची हतबलता, जगण्याचा विश्वास गमावलेले असतांना आणि ज्या ठिकाणी जिवंत रहाणेही कठीण असतांना क्रांती निर्माण करणारे सावरकर चित्रपटातून चांगल्या प्रकारे मांडण्यात आले आहेत. ‘माझी जन्मठेप’ या स्वातंत्र्यवीर सावरकरलिखित आत्मचरित्रामधील भीषण वास्तवता चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. हे चित्रण क्रांतीकारकांनी राष्ट्रासाठी भोगलेल्या अपरिमित हालअपेष्टांची जाणीव करून देणारे आहे. काळ्या पाण्याची शिक्षा भोगतांना अत्याचारांच्या परिसीमेमुळे मनोरुग्ण होण्यापर्यंतची स्थिती, कोलू ओढून तेल काढणे, नारळाचा काथ्या सोलणे, लोखंडाला बांधून उघड्या पाठीवर कोडे मारून बंदीवानांना रक्तबंबाळ करणे, व्हरांड्यातील भिंतीला हात बांधून दिवसभर उभे करणे यांचे चित्रण पाहून ‘अहिंसेने स्वातंत्र्य मिळाले’, असे म्हणणार्यांची कीव करावीशी वाटते.
५. गांधींच्या नेतृत्वाविषयी विचार करायला लावणारा संवाद !
स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमान कारागृहात असतांना त्यांना भेटण्यासाठी त्यांची पत्नी यमुनाबाई आणि छोटा भाऊ नारायणराव सावरकर जातात. या वेळी नारायणराव सावरकर भारतातील घडामोडी सांगत असतांना लोकमान्य टिळक कालवश झाल्याचे सांगून काँग्रेसचे नेतृत्व गांधीजींकडे आल्याची माहिती देतात. त्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर ‘देशाचे नेतृत्व करण्याइतके गांधी मोठे कधी झाले ?’ असा प्रश्न करतात. लोकमान्य टिळक यांच्यानंतर प्रखर राष्ट्रवाद लोप पावून काँग्रेस मुसलमान धार्जिणी झाली. दिशाहीन अहिंसावादाने देशाची अपरिमित हानी झाली. सावरकर यांनी गांधीच्या नेतृत्वाविषयी विचारलेला प्रश्न यावर विचार करायला भाग पाडतो.
६. सावरकर आणि गांधी संवाद !
गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आल्यावर, इंग्लंडमधील ‘इंडिया हाऊस’ येथे, रत्नागिरी येथे आणि सर्व नेत्यांची एकत्रित भेट अशा गांधी अन् सावरकर यांच्या ४ भेटी चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. यामध्ये ‘भारताला स्वातंत्र्य करण्याचा मार्ग क्रांती कि अहिंसा ?’, मुसलमानांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी व्हावे, यासाठी गांधी यांचा खिलाफत चळवळीला पाठिंबा, मुसलमानांकडून होणारे हिंदूंचे धर्मांतर आदी विषयांवर चर्चा दाखवण्यात आली आहे. अर्थात्च चित्रपट स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर असल्यामुळे त्यांचे विचार प्रभावीपणे मांडण्यात आले आहेत. असे असले, तरी यामध्ये तात्त्विक चर्चेवर भर देण्यात आला आहे. ही चर्चा गांधी यांच्या गुळमुळीत भूमिकांविषयी विचार करायला लावणारी आहे.
७. देशाचा इतिहास समजून घ्या !
मुळात गांधी असोत वा सावरकर कशाही पद्धतीने देशासाठी लढणारा प्रत्येक जण श्रेष्ठच आहे. देशात गांधीवाद आणि सावरकरवाद मानणार्यांचा स्वतंत्र वर्ग आहे. प्रत्येकाला स्वत:ची भूमिका योग्य वाटणे, हेही स्वाभाविक आहे; मात्र काही झाले, तरी त्याची परिणती देशासाठी सर्वस्वी बलीदान देणार्या क्रांतीकारकांना देशद्रोही ठरवण्याइतकी खालची पातळी गाठणे कदापी समर्थनीय नाही. सत्ता राखण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘देशद्रोही’ ठरवण्यापर्यंत काँग्रेसची मजल गेली; परंतु सत्य अधिक काळ लपवता येत नाही. ‘गांधी कि सावरकर ?’ यापुरते विचारांना सीमित न करता तरुणांनी देशाचा इतिहास तटस्थपणे आणि अभ्यासपूर्ण समजून घ्यावा अन् राष्ट्रहित कशात आहे, याचा शोध अवश्य घ्यावा. यासाठी हा चित्रपट निश्चितच दिशा देईल !
– श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई