निरर्थक नावे नकोत !

‘काळानुसार आपले विचार पालटायला हवेत’, असे काही जण म्हणतात आणि त्यासाठी आधुनिक जगरहाटीप्रमाणे कुठलाही मागचा-पुढचा विचार न करता तसे वागतात. स्वतःला ‘मॉडर्न’ म्हणजे आधुनिक, सुधारणावादी म्हणवतात. त्यांच्या वागण्याला काही धरबंधही नसतो. बहुतांश वेळा ते धर्माच्या अगदी विरुद्ध वर्तन करतात.

एकदा बाजारात गेलो असतांना एका मुलाला त्याचे नाव  विचारल्यावर त्याने त्याचे नाव ‘आरागॉन’ असे सांगितले !त्याचा अर्थ न कळल्याने मी विचारले, ‘‘याचा अर्थकाय ?’’ त्यावर त्याने ‘माहिती नाही’, असे सांगितले. त्याच्या आईने याविषयी सांगितले, ‘‘काहीतरी वेगळे नाव हवे; म्हणून हे नाव ठेवले.’’ नाविन्याच्या सोसापायी लोक अशी नावे ठेवतात की, त्याला काही अर्थही नसतो किंवा कधी कधी चुकीचाही असतो. काही जण ‘स्वीटी’, ‘बॉबी’, ‘बबलू’ वगैरे अशी नावे ठेवतात. पुढे त्याच नावाने त्यांना हाक मारली जाते आणि ती रूढ होतात.

पुढील काळात आपली संस्कृती जतन कोण करणार ?, ज्यांना मुलांचे नाव काय आणि का ठेवावे ? हेच ठाऊक नाही ते कि ज्या मुलांना आपल्या नावाचा अर्थ काय ? हे ठाऊक नाही ते ?

आपण अनेकदा ऐकतो ‘नावात काय आहे ?’, पण नावातच सर्वकाही आहे, हेच मुळात शिकण्याची आणि शिकवण्याची दुर्दैवी वेळ आपल्यावर येऊन ठेपली आहे. अध्यात्मशास्त्रानुसार शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असते, म्हणजे एखाद्याचे नाव घेतले की, त्या व्यक्तीविषयीची स्पंदने त्याच्याशी जोडलेली असतात; म्हणून आपले आजी-आजोबा, वडील, काका, मामा, मावशी यांची नावे अशी होती की, नाव घेतले की, त्वरित चांगली स्पंदने जाणवून त्याचा लाभ होत असे.

सध्या संस्कृतीशी निगडित नावे ठेवायचीही पद्धत रूढ झाली आहे; परंतु पूर्वी देवतांची नावे ठेवण्याची पद्धत होती. त्यामुळे मुलाला हाक मारतांना अनायसे देवाचे नाव उच्चारले जाई. श्रीकृष्णासह सर्वच देवतांची अनेक नावे आहेत. अशा नावांनी हाक मारतांना पुष्कळ चांगले वाटते; परंतु आता देवाचे नाव ठेवणे, हे बुरसटलेले समजले जाते. देवाच्या नावाचे महत्त्वच आजच्या पिढीला ठाऊक नाही.

आजच्या सुशिक्षित समाजाला आपल्या संस्कृतीविषयी सुसंस्कृत करण्याचे दायित्व आता कुणीतरी घ्यायला हवे.  अन्यथा काळाप्रमाणे आधुनिक जगासमवेत पुढे जाता जाता आपण आपली (हरवलेली) संस्कृती जपायला हवी, याचेसुद्धा आपल्याला विस्मरण होईल !

– श्री. वैभव आफळे, फोंडा,  गोवा.