S Jaishankar Remarks : भारत शेजारी देशांवर दादागिरी करत नाही, तर त्यांना साहाय्य करतो ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

नवी देहली – ‘भारत उपखंड आणि हिंदी महासागर क्षेत्रातील देशांवर दादागिरी करत आहे का ?’ या प्रश्‍नावर उत्तर द्रतांना भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी म्हटले, आम्ही जर दादागिरी करत असतो, तर आम्ही शेजारी देशांना ३७ सहस्र ३०० कोटी रुपयांचे साहाय्य केले नसते, तसेच कोरोना लस देऊन साहाय्यही केले नसते.’ जयशंकर यांना मालदीववरून वरील प्रश्‍न विचारण्यात आला होता. येथे आयोजित जयशंकर त्यांच्या ‘व्हाय इंडिया मॅटर्स’ या पुस्तकाच्या कार्यक्रमात बोलत होते.

१. जयशंकर पुढे म्हणाले की, आम्ही नेहमी इतर देशांना त्यांच्या गरजेच्या वेळी साहाय्य करतो. संकटकाळात भारत इतर देशांच्या साहाय्यासाठी नेहमीच उभा असतो. आम्ही युद्धग्रस्त देशांमध्ये साहाय्य साहित्य, औषधे, खते आदी पोचवतो. यासाठी जग आमचे कौतुकही करते.

२. जयशंकर म्हणाले की, नेपाळ, श्रीलंका, भूतान, बांगलादेश आणि मालदीव या देशांमध्ये भारताची गुंतवणूक गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढली आहे. आज शेजारील देशांशी ज्या प्रकारचा व्यापार चालू आहे, तो महत्त्वाचा आहे. शेजारी देशांसमवेतचे आमचे संबंध सुधारत आहेत. आम्ही व्यापारासाठी बांगलादेशातील बंदरांचा वापर करत आहोत. श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळ येथे बघा. चांगल्या संपर्कासाठी येथे रस्ते आणि रेल्वे यांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. १० वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती.