ब्रिटीश खासदार ब्लॅकमन यांनी बीबीसीला संसेदत फटकारले ! (British MP Slams BBC)

श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पक्षपाती वार्तांकनावरून बीबीसीला घरचा अहेर !

लंडन (ब्रिटन) – प्रभु श्रीरामाच्या जन्मस्थानी त्याचे मंदिर उभारले गेल्यामुळे जगभरातील हिंदूंनी आनंद व्यक्त केला होता; मात्र खेदाने हे सांगावे लागेल की, बीबीसीने याविषयी वार्तांकन करतांना मशीद पाडल्याचा उल्लेख अधिक केला. नक्कीच त्याठिकाणी मशीद होती; पण सुमारे २ सहस्र वर्षांपासून त्याठिकाणी मंदिरही होते, हे विसरून कसे चालेल ? तसेच मुसलमान पक्षकारांना शहरातच ५ एकर भूमी देण्यात आली आहे, हेदेखील सत्य आहे, अशा शब्दांत ब्रिटनमधील हुजूर पक्षाचे (कन्झर्व्हेटिव्ह) खासदार बॉब ब्लॅकमन यांनी ब्रिटिश प्रसारमाध्यम ‘बीबीसी’वर ब्रिटनच्या संसदेत सूत्र उपस्थित करून टीका केली. ‘जगभरात चाललेल्या घडामोडींचा एक सभ्य आणि चांगला आढावा घेण्याचे काम बीबीसीने करायला हवे; मात्र बीबीसीच्या वार्तांकनात तसे दिसत नव्हते’, असेही खासदार ब्लॅकमन म्हणाले.

ब्रिटनच्या अन्य खासदारांकडूनही आक्षेप !

खासदार बॉब ब्लॅकमन यांनी अन्य खासदारांना आवाहन करतांना म्हटले, ‘बीबीसीचे निःपक्षपाती धोरण आणि जगभरात चाललेल्या घडामोडींचे अचूक वार्तांकन होण्यासाठी संसदेत चर्चा झाली पाहिजे. त्यासाठी सरकारने वेळ निश्‍चित करून द्यावी.’ यानंतर बॉब ब्लॅकमन यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत अन्य खासदारांनीही बीबीसीच्या वार्तांकनाविषयी आक्षेप नोंदवला असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, मी हिंदूंच्या हक्कांचा समर्थक असल्याच्या भूमिकेतून सांगू इच्छितो की, या चुकीच्या वार्तांकनामुळे असंतोष निर्माण झाला आहे. बीबीसीने निःपक्षपाती वार्तांकन करावे. (भारतातील किती हिंदु खासदारांनी बीबीसीवर या विषयावरून टीका केली किंवा जाब विचारला ? – संपादक)

संपादकीय भूमिका

बीबीसी भारतद्वेषी आणि हिंदुद्वेषी आहे, हे जगजाहीर आहे. तिला ब्रिटन सरकारकडून निधी मिळतो. सध्या ब्रिटनचे पंतप्रधान भारतीय वंशाचे हिंदु आहेत. त्याचा भारताला आणि हिंदूंना काहीच लाभ होत नाही, हेच यातून दिसून येते !