Derogatory StageShow Against ModiGovt : केरळ उच्च न्यायालयाच्या दोघा अधिकार्‍यांना न्यायालयाने केले निलंबित !

नाटकातून पंतप्रधान मोदी यांचा अवमान !

नाटकाद्वारे पंतप्रधान मोदींचे विडंबन !

थिरुवनंतपूरम् (केरळ) : केरळ उच्च न्यायालयाने त्याच्या २ अधिकार्‍यांना निलंबित केले आहे. २६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताकदिनानिमित्त न्यायालयाच्या सभागृहात सादर झालेल्या नाटकात या दोघांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकार यांची खिल्ली उडवली होती. उच्च न्यायालयाने दोघांनाही तात्काळ निलंबित करून या प्रकरणाची चौकशी चालू केली आहे. साहाय्यक निबंधक सुधीश टी.ए. आणि ‘कोर्ट कीपर’ सुधीश पी.एम्. अशी या दोघांची नावे आहेत.

या नाटकाविषयी ‘लीगल सेल’ आणि ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’ यांनी सरन्यायाधीश, केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, केंद्रीय कायदामंत्री आणि पंतप्रधान यांच्याकडे तक्रार केली होती. या नाटकाचे संवाद साहाय्यक निबंधक सुधीश यांनी लिहिले असल्याचे म्हटले जाते.

असे होते अवमानकारक संवाद !

या मल्याळम् नाटकात पंतप्रधान मोदी यांच्यासारखे पात्र म्हणतो, ‘जर मी म्हणालो की, त्याचे औषधी मूल्य आहे, तर माझे अनुयायी शेणही खातील. ही माझी शक्ती आहे.’ दुसर्‍या वाक्यात, ‘मी माझे कुटुंब सोडून जग फिरायला गेलो, तरीही लोक माझ्याविषयी कृतज्ञ नाहीत’, असे आहे.