Indian Navy Day 2023 : मालवण (सिंधुदुर्ग) येथे होणारा नौदल दिनाचा सोहळा महाराष्ट्रासाठी भूषणावह ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला नौदल दिनाच्या सिद्धतेचा आढावा

  • राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम पूर्ण !

भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून या वर्षीचा नौसेना दिवस सिंधुदुर्ग किल्ल्यावर !

मालवण : आतापर्यंत नौदल दिनाचा सोहळा देहली येथे होत असे. यावर्षी हा सोहळा महाराष्ट्रात आणि तोही आरमाराचे जनक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ घेण्याचा निर्णय घेण्यात आला. हा सोहळा होणे, हे महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे. हा कार्यक्रम येथे आयोजित करून शिवाजी महाराजांना एकप्रकारे विनम्र अभिवादन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात हा कार्यक्रम आयोजित केल्याविषयी पंतप्रधान आणि नौदल यांचे मी आभार मानतो. हा कार्यक्रम ‘न भूतो न भविष्यति’ होईल, असे आश्वासक बोल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे काढले.

३० नोव्हेंबर या दिवशी मुख्यमंत्री शिंदे यांनी मालवण येथे भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कामाची पहाणी केली, तसेच नौदल दिनाच्या कार्यक्रमाच्या सिद्धतेचा आढावा घेतला. या वेळी मंत्री दीपक केसरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, नौदलाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

अल्प कालावधीत कार्यक्रमाची सिद्धता केल्याविषयी मुख्यमंत्र्यांकडून कौतुकोद्गार !

या वेळी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘नौदलाच्या ध्वजावरही ‘शिवमुद्रा’ छापण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला. यातून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेला आदर व्यक्त होत आहे.

राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम पूर्ण झाले आहे. राजकोट येथे पुतळा उभारणी आणि नौदल दिनाचा कार्यक्रम यांची केवळ २ मासांत सर्व सिद्धता केली गेली. हे कार्य पूर्णत्वास जाण्यासाठी प्रयत्न करणारे मंत्री, आमदार, खासदार, प्रशासन आणि शासन यांचे मी अभिनंदन करतो.’’