न्यायालयाच्या आदेशाने आतंकवादी जयेश पुजारी याची पुन्हा बेळगाव कारागृहात पाठवणी !

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिल्‍याचे प्रकरण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भ्रमणभाषवरून १०० कोटी रुपयांची खंडणी मागणारा आतंकवादी जयेश पुजारी याची न्‍यायालयाच्‍या आदेशाने पुन्‍हा बेळगाव कारागृहात पाठवणी करण्‍यात आली आहे.

जयेश हा लष्‍कर-ए-तोएबा, हिजबुल मुजाहिद्दीन, ‘पी.एफ्.आय.’सह अनेक आतंकवादी संघटनांशी संबंधित आहे. १४ जानेवारी आणि २१ मार्च या दिवशी त्‍याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या खामला येथील जनसंपर्क कार्यालयात दूरभाष करून खंडणी मागितली होती. पैसे न दिल्‍यास गडकरी यांना बाँबस्‍फोटात उडवून देण्‍याची धमकी त्‍याने दिली होती. कर्नाटकमधील कारागृहातून त्‍याने हे दूरभाष केले होते.

नागपूर पोलिसांनी त्‍याला २८ मार्च या दिवशी बेंगळुरू कारागृहातून ‘प्रोडक्‍शन वॉरंट’वर अटक करून येथे आणले. चौकशीच्‍या वेळी त्‍याचा आतंकवादी संघटनांशी संबंध आणि त्‍यांच्‍या साहाय्‍याने अनेक मोठ्या आतंकवादी घटना घडवून आणल्‍याचा खुलासा झाला. त्‍याच्‍या विरोधात यूएपीएअंतर्गत २ गुन्‍हे नोंद होते. जयेश याला नागपूर मध्‍यवर्ती कारागृहात ठेवण्‍यात आले होते. जयेशवर कर्नाटकात अनेक गुन्‍हे नोंद असून त्‍या प्रकरणी कर्नाटक पोलिसांचेही अन्‍वेषण चालू आहे.

संपादकीय भूमिका :

कारागृहातून मंत्र्यांना खंडणीसाठी दूरभाष करणार्‍या आतंकवाद्यांना जलदगतीने खटला चालवून कठोर शिक्षा मिळणे आवश्‍यक !