गोव्यात प्रभु श्रीरामाविषयी मुसलमानाकडून सामाजिक माध्यमातून अश्लील माहिती प्रसारित !

‘हिंदवी स्वराज्य’ संघटनेच्या वतीने फोंडा पोलीस ठाण्यात तक्रार

फोंडा (गोवा), २ ऑक्टोबर (वार्ता.) : सामाजिक माध्यमातून प्रभु श्रीराममाविषयी अश्लील माहिती प्रसारित करण्यात आली आहे. या प्रकरणी ‘हिंदवी स्वराज्य’ संघटनेच्या वतीने २ ऑक्टोबर या दिवशी फोंडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून दोषीवर त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या वेळी ‘हिंदवी स्वराज्य’ संघटनेचे पदाधिकारी वासुदेव नाईक, ‘केसरिया हिंदु वाहिनी’चे पदाधिकारी राजीव झा, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, भाजपच्या फोंडा मंडळाचे अध्यक्ष तथा फोंडा पालिकेचे उपनगराध्यक्ष विश्वनाथ दळवी, नगरसेवक शौनक बोरकर, माजी नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर आदींची उपस्थिती होती.

‘हिंदवी स्वराज्य’ संघटनेचे पदाधिकारी वासुदेव नाईक याविषयी माहिती देतांना म्हणाले,

‘‘इस्लामवर वादग्रस्त विधान केल्याच्या प्रकरणाचे वृत्त एका वृत्तवाहिनीच्या ‘फेसबुक लाईव्ह’वर होत असतांना त्या वृत्ताच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्याच्या विभागामध्ये (कमेंट सेक्शनमध्ये) नाझीम अस्लम या व्यक्तीने प्रभु श्रीरामाविषयी अश्लील माहिती लिहिली. प्रभु श्रीराम हे समस्त हिंदूंचे आराध्य दैवत आहे. या माहितीमुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. फोंडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी यासंदर्भात अन्वेषण करून दोषीला लवकरात लवकर कह्यात घेण्याचे आश्वासन दिले आहे.’’ फोंडा पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेचे कलम १२२/२०२३ अन्वये २९५ (अ), कलम ५०५ (२) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. फोंडा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विश्वनाथ दळवी या वेळी पत्रकारांना म्हणाले, ‘‘अश्लील माहिती प्रसारित केल्याच्या प्रकरणाविषयी मी मुख्यमंत्र्यांकडे चर्चा केली आहे.’’

राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणारे कोणतेही कृत्य खपवून घेणार नाही ! –  मुख्यमंत्री डॉ. सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी : राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणारे कोणतेही कृत्य खपवून घेणार नाही. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणारे अन् अशी कृत्ये करणारे यांच्या विरोधात कठोरातील कठोर कारवाई करा, असा आदेश मी पोलिसांना दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. प्रभु श्रीरामासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ‘‘यापूर्वीही मी आक्षेपार्ह विधाने न करण्यासंबंधी चेतावणी दिली होती; मात्र काही जण यामधून काही शिकलेले नाहीत. धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर कारवाई होणार आहे. कायद्यासमोर सर्व समान आहेत. गोवा राज्य धार्मिक सलोखा आणि शांतता यांसाठी प्रसिद्ध आहे अन् गोव्याची ही ओळख पुसण्याचा कुणीही प्रयत्न करू नये.’’