कुंकळ्ळी (गोवा) येथे पोर्तुगिजांविरुद्ध लढा दिलेल्या १६ महानायकांना मानवंदना !

१६ महानायकांच्या स्मारकाला मानवंदना दिल्यानंतर मान्यवर – मंत्री सुभाष फळदेसाई, युरी आलेमांव, तसेच स्वातंत्र्यसैनिक आणि अन्य मान्यवर

कुंकळ्ळी (गोवा), १५ जुलै (वार्ता.) – पोर्तुगीज राजवटीच्या विरोधात गोव्यातील पहिल्या संग्रामाचा दिवस म्हणजेच १५ जुलै या दिवशी स्वधर्म रक्षणासाठी प्राणार्पण केलेल्या १६ महानायकांना शासकीय स्तरावर आणि जनतेच्या वतीने मानवंदना देण्यात आली. शासकीय स्तरावरील कार्यक्रमात पुरातत्व मंत्री सुभाष फळदेसाई आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.

श्री शांतादुर्गा सेवा समिती यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्मारकावर जलाभिषेक करून महानायकांना मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमाला भाजपचे नेते तथा माजी खासदार अधिवक्ता नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे औचित्य साधून डॉ. केदार फाळके यांनी ‘हिंदु अस्मितेचा आविष्कार’ या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित व्याख्यान दिले. ते म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते, तर आज एकही मंदिर शिल्लक राहिले नसते. हिंदूंचे धर्मराज्य कसे असावे ? हे शिवराज्याभिषेकातून संपूर्ण हिंदु समाजाला शिकायला मिळाले.’’

१६ महानायकांच्या बलीदानावर माहितीपट (डॉक्युमेंटरी) बनवण्यासाठी सरकार प्रयत्न  करेल ! – सुभाष फळदेसाई, पुरातत्व मंत्री

मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, ‘‘कुंकळ्ळीच्या लढ्याचा इतिहास भावी पिढीसाठी जपायचा आहे, म्हणूनच त्यावर आधारित माहितीपट तयार करण्याचे गंभीर प्रयत्न केले जात आहेत. मी स्वतः चित्रपट निर्मात्यांसमवेत कुंकळ्ळीच्या लढ्यावर चित्रपट बनवण्याविषयी बरीच चर्चा केली होती; परंतु चित्रपट निर्मात्यांना ते अवघड वाटले; कारण चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी वर्ष १५८३ मधील वातावरण सिद्ध करावे लागेल आणि यासाठी पुष्कळ खर्च येईल. १६ महानायकांचे बलीदान पुढील पिढ्यांसाठी अनमोल ठरेल, असा माहितीपट बनवण्यासाठी सरकार नक्कीच प्रयत्न करेल.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी इयत्ता ९ वी आणि इयत्ता ११ वी च्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात कुंकळ्ळीच्या लढ्याचा इतिहास समाविष्ट केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात हा इतिहास समाविष्ट करण्यासाठी त्यांनी स्वतः आणि कुंकळ्ळी चिफ्टेन ट्रस्टच्या विश्वस्तांनी घेतलेल्या विविध उपक्रमांचे स्मरण करून दिले.

कार्यक्रमाच्या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘गोवा फाईल्स’ प्रदर्शनाचे आयोजन

‘गोवा फाईल्स’ प्रदर्शन पहातांना जिज्ञासू

कार्यक्रमाच्या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोर्तुगिजांनी ‘इन्क्विझिशन’च्या (धर्मच्छळाच्या) माध्यमातून गोमंतकीय हिंदूंवर केलेल्या अनन्वित अत्याचारांचे सचित्र दर्शन घडवणारे ‘गोवा फाईल्स’ हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. प्रदर्शनाला भेट देणार्‍यांनी पोर्तुगिजांनी केलेल्या अत्याचाराविषयी माहिती मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

‘गोवा फाईल्स’ प्रदर्शन पहातांना भाजपचे माजी खासदार अधिवक्ता नरेंद्र सावईकर

भाजपचे नेते तथा माजी खासदार अधिवक्ता नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनीही प्रदर्शनाला भेट दिली.