सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्रजागृती अभियान !
१० सहस्रांहून अधिक जणांचा सहभाग !
सोलापूर, २८ मे (वार्ता.) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’च्या अंतर्गत सोलापूर येथे २८ मे या दिवशी काढलेल्या हिंदु एकता दिंडीत हिंदु बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन ‘हिंदु राष्ट्रा’चा जयघोष केला. या दिंडीत सहस्रोंच्या संख्येने जनसमुदाय लोटला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे राष्ट्रगुरु आणि मोक्षगुरु आहेत. त्यांच्या स्मरणात, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’च्या जयघोषात, चैतन्याने भारलेल्या वातावरणात आणि साधकांच्या अपूर्व उत्साहात काढण्यात आलेली ही लक्षवेधी दिंडी चैतन्याची उधळण करणारी आणि समृद्ध भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन करणारी ठरली ! हिंदु म्हणून एकवटलेल्या विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय यांनी या वेळी हिंदु राष्ट्र स्थापनेचा उद़्घोष केला. या दिंडीमध्ये १० सहस्रांहून अधिक हिंदूंच्या सहभागाने सोलापुरात हिंदु तेजाचा आविष्कार पहायला मिळाला. या फेरीसाठी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक संत पू.(सुश्री) दीपाली मतकर यांची वंदनीय उपस्थिती होती. बाळीवेस येथून निघालेल्या दिंडीचा समारोप चार हुतात्मा चौक येथे करण्यात आला.
अशी झाली दिंडी !
१. धर्मप्रेमी श्री. राजेंद्र हुच्चे आणि त्यांच्या धर्मपत्नी यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. पुरोहित श्री. कृष्णहरि क्यातम यांनी वेदमंत्रपठण केले.
२. माजी नगरसेवक श्री जगदीश पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून धर्म ध्वजाचे पूजन झाले.
३. श्री. आणि सौ. मनीषा पवार यांच्या हस्ते पालखीतील श्री भवानी मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्री. गोपाल गजेली आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. रविना गजेली यांनी पालखीतील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्राचे पूजन केले.
४. श्री. आणि सौ. सिद्धराम चिनकेरी यांच्या हस्ते पालखीतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
५. दिंडीच्या अग्रभागी असलेल्या श्री तुळजाभवानीदेवी, श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या पालख्यांचे ५ सुवासिनींच्या हस्ते पूजन करण्यात आले. या वेळी सनातनचे साधक आणि श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरातील पुजारी श्री. अमित कदम यांनी शंखनाद केला. त्यानंतर श्री गणेशाचा श्लोक म्हणण्यात आला. श्रीकृष्ण आणि सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.
६. गोमातेचे पूजन करण्यात आले. दिंडीचा उद्देश समितीचे सोलापूर, बीड, धाराशिव आणि लातूर जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे यांनी विशद केला.
७. दिंडीच्या प्रारंभी शौर्यजागरण करणारी धर्मप्रेमींची लाठी-काठी, दंडसाखळी यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके, तर समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांची क्षात्रवृत्ती जागृती केली.
उपस्थित मान्यवर भाजपचे माजी नगरसेवक श्री. किरण देशमुख, माजी नगरसेवक श्री. जगदीश पाटील, माजी नगरसेवक, श्री. चंद्रकांत रमणशेट्टी, माजी नगरसेवक श्री. बापू ढगे, श्री. संजय साळुंखे, गोपालक श्री. गोपाल सोमाणी, योग वेदांत समितीचे श्री. आकाश शिरते, उद्योजक श्री. सुरेश हत्ती, हिंदु विधीज्ञ परिषदेचे महाराष्ट्र अधिवक्ता संघटक आणि सुराज्य अभियानाचे समन्वयक अधिवक्ता नीलेश सांगोलकर, श्री. अभय कुलकर्णी, डॉ. भारत मुळे आदी मान्यवर उपस्थित होते. |
वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे
- हिंदु एकता दिंडी म्हणजे आदर्श रामराज्याची प्रतिकृती असल्याने सर्वांनी शिस्त आणि नियम यांचे पालन करत दिंडी काढली.
- समाजातील लोक वाहने थांबवून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या पालखीतील प्रतिमेचे दर्शन घेत होते.
- दिंडीत लाठीपथक, ढोलपथक अशी २१ पथके होती. तुतारी वादकही होते. १४ प्रांतांचे धर्मप्रेमी विविध पोषाख परिधान करून दिंडीत सहभागी झाले होते.
- दिंडीत सजवलेल्या एका घोड्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसर्या घोड्यावर झाशीची राणी यांची वेशभूषा केलेल्या बालसाधकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
- दिंडीचे फेसबूकच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते.
* दिंडीची रचना ! : दिंडीच्या प्रारंभी धर्मध्वज, तुतारी-शंखनाद पथक, झेंडा पथक, नमस्कार पथक, प.पू. गुरुदेवांची पालखी, कलश पथक, रणरागिणी, श्री भवानीमातेची पालखी, मावळा पथक, मंगळागौर पथक, सनातन टोपी पथक, बालकक्ष, श्री विठ्ठल पालखी, तुळशी वृंदावन पथक, टाळ पथक, वारकरी पथक, टाळ्या पथक, लाठी पथक, गोपी पथक, गदा पथक, प्रथमोपचार पथक, लेझीम पथक, योगासन, क्षत्रिय समाजातील युवतींचे पथक, प्रांतीय वेशभूषेतील साधक, इस्कॉन पथक, गरबा पथक अशा पद्धतीने दिंडीची रचना करण्यात आली होती.
* धर्मध्वज पूजन, पालखी पूजन, स्वागत आणि पुष्पवृष्टी ! : सर्वश्री ‘लक्ष्मण टेलर्स’चे श्री. अशोक चौधरी, ‘सत्यम ऑप्टेशिएअन्स’चे श्री. सत्यम गुंटूक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी सर्वश्री संजय हिरेमठ, अतुल शिरसाट, संजय साळुंखे, सिद्धे मनोज, अरविंद नडगिरे, आरळीमार, प्रमोद बामणी, संदीप बेळमकर, अमर पुदाले/संतोष सिद्धे, रमेश गगनहळ्ळी, रवी जव्हेरी, अशोक चौधरी, रवी जव्हेरी, तेजस भिसे (बांगर रुग्णालय), राकेश नारवाणी, रमाकांत आकुडे, जयेश रामभिया, संजय निचाणी, वैभव गंदमल, जयराम होगेआरळी, महेश कुंभार, नरेश निचाणी (अभिनंदन बॅग सेंटर), अभय जोशी (भाग्यश्री चिवडा), राजेश मंगळवेढेकर, राजू वेणीगुलकर, सूर्योदय भांडार, गौशी शंकर होटगी, शुभांगी बुवा यांनी धर्मध्वजाचे पूजन, स्वागत आणि पुष्पवृष्टी केली.
* मान्यवरांचे मनोगत…
‘हिंदु एकता फेरी’ ही हिंदु धर्मद्वेष्ट्यांना उत्तर देण्यासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आहे ! – वर्षा जेवळे, हिंदु जनजागृती समिती
‘हिंदु एकता फेरी काढणार’, असे म्हटल्यानंतर तथाकथित निधर्मीवादी-पुरोगामी प्रश्न विचारतात की, बहुसंख्यांक झुंडशाही का दाखवत आहेत ? जे लोक सहस्रोंच्या संख्येने रस्त्यावर येऊन नमाज अदा करतात, जे लोक सहस्रोंच्या संख्येने येऊन शहरांमध्ये दंगे-धोपे करतात, त्यांना हा प्रश्न विचारण्याचे धाडस आमचे भित्रे पुरोगामी करत नाहीत. ही ‘हिंदु एकता फेरी’ म्हणजे बहुसंख्यांक हिंदूंची झुंडशाही असून हिंदूंचे महासंघटनाचे प्रदर्शन करण्यासाठी आहे. ही दिंडी हिंदु धर्मद्वेष्ट्यांना उत्तर देण्यासाठी, हिंदूंच्या स्वाभिमानासाठी, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आहे.
सच्चिदादंन परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सव निमित्त सोलापूर येथे हिंदू एकता दिंडी !
हिंदु राष्ट्राच्या जयघोषात दुमदुमली सोलापूर नगरी !
१० सहस्रांहून अधिक हिंदूंचा दिंडीत उत्स्फूर्तपणे सहभाग !#HHDrAthavale#HinduRashtraJagrutiAbhiyan pic.twitter.com/EaQABIRRXw
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) May 29, 2023
क्षणचित्रे
१. विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी हे ढोलपथकाद्वारे सहभागी झाले होते.
२. डॉ. भारत मुळे हे त्यांच्या पॅथालॉजीमधील सर्व कर्मचार्यांना घेऊन सहभागी झाले होते.
३. ठिकठिकाणी समाजातील लोकांनी घराच्या गच्चीवरून दिंडीवर पुष्पवृष्टी केली.
४. अनेक ठिकाणी दिंडीकर्यांना अनेक व्यापार्यांनी सरबत आणि पाणी याचे वाटप केले.
५. अनेक जण दिंडीत स्वतःहून सहभागी होत होते, तसेच हात जोडून दर्शन घेत होते.
६. धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आणि साधकांनी भगवे फेटे आणि भगवे झेंडे घेतल्याने सर्व वातावरण भगवेमय झाले होते.
७. दिंडीमुळे वातावरण एकदम चैतन्यमय झाले होते.
* दिंडीत सहभागी संघटना…
क्षत्रिय समाजाचे एस्.एस्.के. युवती प्रतिष्ठान, इस्कॉन, अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ, हिंदु राष्ट्र सेना, बाहुसार शिक्षण प्रसारक मंडळ, श्रीराम जन्मोत्सव समिती, अखिल भारतीय गोरक्षक समिती, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पद़्मशाली युवा संघटना, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट, हिंदु महासभा, जव्हेरी समाज युवक संघटना, भोई समाज संघटना आदी संघटना उपस्थित होत्या.
पालखी पूजन
जन्मोत्सवानिमित्त निघाली ‘हिंदु एकता दिंडी’ । भावविभोर होऊन हिंदुत्वनिष्ठांनी केली पुष्पवृष्टी ॥ चैतन्यदायी हिंदु एकता दिंडीत पांरपरिक वेशभूषा आणि कलश घेऊन सहभागी असलेल्या साधिका सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या !