हा तर लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे आम्ही स्वागत करतो. लोकशाहीचा आणि लोकमताचा पूर्णपणे विजय झाला आहे, असे मी नमूद करू इच्छितो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेतली, त्या वेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितले आहे की, उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. अपात्रतेच्या याचिकांच्या संदर्भातील अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा आहे. त्याविषयीचे निरीक्षण महत्त्वाचे आहे.’’

उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘‘मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला.’ नैतिकतेच्या गोष्टी तुम्ही कशा काय करता? नैतिकतेचा मुलामा चढवू नका. तुम्ही खुर्चीसाठी विचार सोडलात आणि एकनाथ शिंदेंनी विचारांसाठी खुर्ची सोडली. त्यामुळे लोक कमी झाल्यावर सत्ता गेली आणि तुम्ही राजीनामा दिला. त्याला नैतिकतेचा मुलामा देऊ नका.’’

सत्याचा विजय झाला ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘आपल्या लोकशाहीत अपेक्षित निकाल लागला आहे. अखेर सत्याचा विजय झाला. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. आपल्या देशात राज्यघटना, कायदे आणि नियम आहेत. कुणालाही त्याबाहेर जाता येत नाही. कायदेशीर बाबींची पूर्तता करून आम्ही बहुमताचे सरकार बनवले. सर्वाेच्च न्यायालयाने आमच्या सरकारवर आता शिक्कामोर्तब केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने अपेक्षित निकाल दिला.’’