‘१९७० च्या दशकात सोव्हिएत संघाचा व्यावसायिक प्रचार (प्रोपेगेंडा) करणार्या युरी बेझमेनोव्ह अमेरिकेला शरण आला. सोव्हिएत युनियनची गुप्तचर संस्था ‘केजीबी’ने संपूर्ण जगात साम्यवादी विचारसरणी पसरवण्यासाठी अत्यंत भयावह पद्धती वापरल्या होत्या. बेझमेनोव्ह याने ती सर्व गुपिते जगासमोर उघड केली. त्या प्रक्रियेचे नाव होते, ‘आयडियॉलॉजिकल सबव्हर्जन !’ (एखादी सरकारी अथवा सामाजिक व्यवस्था अप्रत्यक्षपणे अथवा छुप्या पद्धतीने नष्ट करण्यासाठी आखलेले वैचारिक स्तरावरील षड्यंत्र) ‘सबव्हर्जन’ची गोष्ट जगासमोर भलेही वर्ष १९७० मध्ये आली असली; तरी त्या तंत्राचा वापर जगातील अनेक साम्राज्ये सहस्रो वर्षांपासून करत आली आहेत. ब्रिटीश साम्राज्यही त्यातील एक होते.
इस्लामी लुटारूंहून कितीतरी अधिक चतुर ब्रिटीश होते. त्यांनी २०० वर्षे भारतियांनाच आपले दलाल (एजंट) बनवून भारतावर राज्य केले. लुटारूंचे उद्देश तर लक्षात येतात; पण हे भारतीय कोण होते, ज्यांनी इंग्रजांना सहकार्य केले ? तसेच त्यांनी असे का केले ? ‘सोने की चिडिया’ म्हटल्या जाणार्या भारतात एवढे ज्ञान आणि वैभव असतांना आम्ही असे अचानक दुबळे कसे काय पडलो ? आम्ही दुसर्यांकडून नाही, तर स्वकियांकडूनच पराभूत झालो. जो इतिहास आम्हा सर्वांना सांगण्यात आला आहे, ही ती गोष्ट नाही. ही गोष्ट आहे, भारताच्या खर्या इतिहासाची, भारताच्या वैचारिक विध्वंसाची (‘आयडियॉलॉजिकल सबव्हर्जन’ची) ! या विषयावर प्रकाश टाकणारा व्हिडिओ ‘प्राच्यम्’ या राष्ट्रनिष्ठ यू ट्यूब वाहिनीवर प्रसारित करण्यात आला आहे. आतापर्यंत १५ लाख लोकांनी पाहिलेल्या या व्हिडिओतील अभ्यासपूर्ण आणि जागृतीपर माहिती आमच्या वाचकांसाठी साभार प्रकाशित करत आहोत. (पूर्वार्ध) |
१. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रजांनी भारत सोडून न जाता येथेच ‘तपकिरी साहेबां’च्या रूपात रहाणे
वर्ष १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. खरेच २०० वर्षांची ती काळी रात्र संपली होती ? इंग्रज मोठमोठी जहाजे घेऊन इंग्लंडकडे रवाना होत होते. आमचे चेहरे तर पहाण्यासारखे होते. भारतियांना वाटत होते, ‘उद्या ती सकाळ होईल, जिच्यासाठी लक्षावधी लढले. आता सर्व क्रांतीकारक आणि राष्ट्रवादी भारतियांना देहलीचे निमंत्रण येईल. सर्व मिळून भारताची एक मोठी कथा लिहितील. आपला देश आता स्वतंत्र आहे. आता कशाची काळजी ?’; पण ते निमंत्रण कधीच आले नाही. बंद दारांच्या आत ठाऊक नाही, कोणकोणत्या करारांवर स्वाक्षर्या झाल्या. मग एक दिवस अचानक गोंधळ झाला. ‘१० आठवड्यांमध्ये हा देश हिंदू आणि मुसलमान यांच्यात विभाजित करण्यात येईल’, अशी घोषणा झाली. आम्हाला वाटले होते की, वर्ष १९४७ मध्ये गोरेसाहेब निघून जातील; पण ही आमची चूक होती. काही ‘साहेब’ असेही होते, जे कधी गेलेच नाहीत.
२. इस्लामी आक्रमकांच्या गुलामीत भारतियांनी शेकडो वर्षे अत्याचार सहन करणे
गोष्ट आहे १ सहस्र वर्षांपूर्वीची ! तेव्हा भारत इस्लामी लुटारूंशी लढत होता. जनतेकडून पैसे लुटले जात होते; पण त्यासाठी मोठी बळजोरी करावी लागत होती. लुटारू तर मूठभरच आले होते; पण कोट्यवधी अज्ञानी लोकांना कोण सांभाळणार ? शेवटी किती शिर कापले जाऊ शकत होते ? शेरशहासारख्या अफगाणांनी येथील लोकांनाच घेऊन सरदारांचे सैन्य उभे केले. प्रत्येक सरदाराच्या हाताखाली शेकडो सैनिक होते. अकबराच्या वेळी असे सैनिक अनुमाने ४४ लाख होते. ‘गरिबांच्या मनात सरकारविषयी भीती कायम ठेवणे’, हे त्यांचे काम होते. याच सैन्यात ‘दरोगासाहेब’ (फौजदार) असायचे. त्यांच्या पायांचा आभास झाला, तरीही उघडी नागडी जनता थरथरा कापत होती. यासंदर्भात प्रसिद्ध इतिहासतज्ञ श्री. नीरज अत्री सांगतात, ‘‘आता हा ‘साहेब’ शब्द कुठून आला ? तर महंमद पैगंबर यांच्यासमवेत जे लोक होते, म्हणजेच ज्यांनी पैगंबर यांना जिवंतपणी पाहिले होते, त्यांना ‘साहेब’ म्हटले जात असे. त्यामुळे त्यांना अतिशय महान समजले जात होते. ही शब्दावली आजही प्रचलित आहे !’’
जनतेसमोर आता ३ मार्ग होते. एकतर ‘धर्मांतर करून तडजोड करा !’, ‘जिम्मी (टीप) बना !’ अथवा ‘शिर कापून घ्या !’ बहुतांश लोक जिम्मी बनून राहू लागले.
(टीप : ‘जिम्मी’ म्हणजे ‘संरक्षित व्यक्ती जिला इस्लामी राजवटीत स्वत:चा धर्म न सोडता रहाता येण्यासाठी जिझिया कर भरण्यासह राज्याशी एकनिष्ठ रहाणे होय.’)
‘जिम्मी’ बनून राहिलो, तर अपमान सहन करूनही जिवंत तर रहाता येईल. थोडे दबून राहू, ‘जिझिया’ कर देऊ; पण जीव तर वाचेल. शेकडो वर्षे भार सोसून साहेबांची भीती आमच्या मनात कायम घर करून राहिली. जेव्हा अन्य जग जलदपणे पुढे गेले, तेव्हा आपल्या सभ्यतेचा आत्मविश्वास तुटत गेला. रामराज्याचे विशाल साम्राज्य आता जनमानसांत केवळ एक आठवण बनून राहिले होते. आता कोणता लुटारू जात आहे ? आणि कोणता येत आहे ? हे पहाणे एवढेच शिल्लक राहिले होते.
३. मुसलमान शासकांच्या राजवटीमुळे पीडित जनतेचा इंग्रजांनी लाभ उठवणे
वर्ष १७५७ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने बंगाल सहजपणे जिंकला. भारतात अब्जावधींची संपत्ती असलेली असंख्य राज्ये होती. आपल्याहून शेकडो पट अधिक मोठ्या लोकसंख्येला नियंत्रित ठेवणे, हे इंग्रजांसमोरील खरे आव्हान होते. त्या वेळी भारतीय जनता घाबरलेली होती आणि ती इस्लामी काळातील गुलामगिरीत नोकरी शोधत होती.
बेझमेनोव्ह ‘आयडियॉलॉजिकल सबव्हर्जन’संदर्भात सांगतो, ‘युद्ध अजिबात न लढणे’, हे सर्वश्रेष्ठ प्रकारचे युद्ध असते ! यामध्ये शत्रू राष्ट्रातील मौल्यवान अशा गोष्टींचा विसर पाडणे अंतर्भूत असते. |
भारताची सामाजिक व्यवस्था, शिक्षण, धर्म हे आपल्या सभ्यतेचे वैशिष्ट्य होते; पण प्रत्येक समाजाप्रमाणेच शेकडो वर्षांची गरिबी आणि उपासमारी यांमुळे काही समस्याही निर्माण झाल्या होत्या. या समस्या ओळखून ब्रिटिशांचे घारे डोळे चमकले.
बेझमेनोव्ह सांगतो, ‘सोव्हिएत लोक ‘आयडियॉलॉजिकल सबव्हर्जन’ ही संज्ञा वापरत. याचा अर्थ आहे की, वास्तविकतेकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटणे. एवढा की, पुष्कळ ज्ञान असूनही कुणीही तार्किक निष्कर्षांपर्यंत पोचणार नाही. ही मोठी ‘ब्रेन वॉशिंग’ प्रक्रिया आहे, जी मूलत: ४ टप्प्यांमध्ये विभागली आहे :
पहिला टप्पा – नैतिकतेच्या विरोधी कार्य म्हणजेच ‘डिमॉरलायझेशन’ !या अंतर्गत (सनातन हिंदु) धर्माच्या संदर्भात त्याचा नाश करणे, उपहास करणे, याऐवजी वेगवेगळे पंथ, (बहुधा अयोग्य म्हणजेच मूळ धर्मविरोधी) प्रथा यांना रूढ करणे जेणेकरून धर्माच्या सर्वाेच्च उद्देशापासून (म्हणजेच ईश्वरप्राप्तीपासून) समाजाला दूर नेता येईल, यांचा अंतर्भाव केलेला असतो.’ |
४. इंग्रजांनी आधुनिक छपाई तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गूढ हिंदु ग्रंथ चुकीचे भाषांतरित करून प्रकाशित करणे
भारताच्या सर्वांत खोलवर रुजलेला संस्कार होता – हिंदु धर्माचा ! कंपनीच्या अधिकार्यांनी हे ओळखून भारतातील कानाकोपर्यांतून ‘गुन्हे’ आणि ‘स्थानिक कुप्रथा’ शोधून ‘संपूर्ण भारतात स्वीकृत हिंदु कुप्रथा’ अशा प्रकारे त्यांचे एकत्रित प्रदर्शन केले. नीरज अत्री यासंदर्भात अभ्यासपूर्ण दाखला देत म्हणतात, ‘सर्वांत जुना ऐतिहासिक दस्तावेज आपल्याला मिळतो, तो २ सहस्र ३०० वर्षांपूर्वी मॅगॅस्थिनिजने लिहिलेला ‘इंडिका’ नावाच्या ग्रंथाचा ! त्यात म्हटले आहे, ‘‘येथे समाजघटकाला श्रेणीच्या रूपात विभागले आहे. यात सर्वाधिक आदर्श येथील ब्राह्मण आहेत. त्यांना ते ‘सोफिस्ट’ लिहितात; परंतु यात ते सुस्पष्टपणे नमूद करतात – या समाजात कुणीही ब्राह्मण बनू शकतो; कारण ब्राह्मणाचे जीवन सर्वांत कठीण आहे !’
इस्लामी सत्तेचे शत्रू असलेले हिंदू हे ख्रिस्ती इंग्रजांचे बळी ठरले. शेकडो पुस्तके लिहिली गेली. त्यांना ‘इंडॉलॉजी एक्स्पर्ट’ (पाश्चिमात्य जगात भारताच्या कथित अभ्यासकांसाठी वापरण्यात येणारी संज्ञा) ‘हिंदूंनी केलेल्या अत्याचारांचे साहित्य’ असे संबोधतात. ‘सती’, ‘देवदासी’, ‘भोंदू गुरु’ आणि ‘ब्राह्मण्य पितृसत्ता’ यांसारखी सूत्रे याच प्रकल्पाची निर्मिती होती.
पाकिस्तानी हिंदूंसाठी लढणारे आणि लेखक श्री. ओमेंद्र रत्नू याविषयी म्हणतात, ‘‘इस्लाम आणि ख्रिस्ती या पंथांतील महिलांची अवस्था मला सांगण्याची आवश्यकता नाही. आपला तर स्त्रीप्रधान समाज होता. ब्राह्मणांचे योगदान या देशाची अस्मिता आहे. या देशातील प्रज्ञा आणि वैदिक संस्कृतीचे स्पंदन यांच्याविना हा हिंदु समाज पूर्ण होऊ शकत नाही. ब्राह्मण समाज हा हिंदुत्वाच्या मेंदूसारखा होता. त्या मेंदूलाच डाव्यांनी दूषित केले आणि आपण ते होऊ दिले. उपनिषदे आणि गीता यांच्यातील ज्ञान बघा. ब्राह्मणांनी श्रुतींच्या माध्यमातून आपली पुराणे, रामायण, महाभारत हे ज्ञानभांडार वाचवले. औरंगजेब प्रतिदिन एकेक जानवे उतरवत होता. या देशात ब्राह्मणांनी धर्मांतर केले असते, तर हिंदु धर्म शिल्लक राहिला असता का ? राजपूतही कुणासाठी लढू शकले असते ? कुणासाठी लढले असते ते ?’’
लॅटिन आणि इंग्रजी बोलणार्यांनी गूढ हिंदु ग्रंथांचे चुकीचे भाषांतर केले. कंपनीच्या साहेबांनी भारतीय सभ्यतेशी एखाद्या खेळण्याप्रमाणे अक्षरश: छेडछाड केली, त्यास छिन्नविच्छिन्न केले. भारतीय संस्कृती आणि सभ्यता समजण्याचे नाटक केले. त्यानंतर आधुनिक छपाई यंत्रांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ग्रंथ छापले आणि त्या माध्यमातून हिंदु धर्माविषयी भ्रम पसरवणारा मोठा अपप्रचार चालू केला.
बेझमेनोव्ह पुढे सांगतो, ‘समाजाचे लक्ष खर्या धार्मिक संघटनांपासून दूर करून खोट्या संघटनांकडे न्या ! |
५. इंग्रजांनी राममोहन रॉय यांचा वापर करून घेणे
अमेरिकेतील हिंदु अभ्यासक आणि प्रसिद्ध लेखक राजीव मल्होत्रा सांगतात, ‘‘याचा आरंभ राममोहन रॉय यांच्यापासून झाला, ज्यांना नव्या हिंदुत्वाचे जनक समजले जाते. राजा राममोहन रॉय हे कोलकातामध्ये ईस्ट इंडिया कंपनीत कामाला होते. भारताचा विध्वंस करण्याच्या प्रकल्पासाठी ईस्ट इंडिया कंपनीला राजा राममोहन रॉय यांच्यासारखे अनेक उत्साही ‘तपकिरी साहेब’ मिळाले. इंग्रजांनी त्यांना सन्मान आणि प्रतिष्ठा यांचे प्रलोभन देऊन त्यांचा वापर करून घेतला. वर्ष १८३३ मध्ये राजा राममोहन रॉय यांच्या निधनानंतर त्यांना इंग्लंडमध्ये ख्रिस्ती पद्धतीने पुरण्यात आले. त्यांनी भारताच्या मूळ संस्कृतीला पूर्णत: अनुचित प्रकारे प्रसारित केले. ब्रिटिशांना रॉय यांच्या रूपात एक ‘प्रामाणिक तपकिरी साहेब’ भेटला होता.
बेझमेनोव्ह पुढे सांगतो, ‘‘प्रत्येक समाजात काही लोक असे असतात की, जे समाजाच्या विरोधात असतात. जेव्हा अशा सर्व शक्तींचे एकत्रीकरण होते, तेव्हा त्या क्षणाचा वापर करून ती चळवळ चालू रहाण्यासाठी प्रयत्न करावे लागतात जोपर्यंत संपूर्ण समाजाचा विनाश होत नाही तोपर्यंत !’’ |
६. इंग्रजांनी आदर्श वर्णव्यवस्था संपवून भारतावर जातीव्यवस्था लादणे
पुढचे लक्ष्य बनली भारतातील सहस्रो वर्षांपासून चालत आलेली जाती आणि वर्णव्यवस्था ! जेव्हा इंग्रज भारतात आले, तेव्हा येथे ५०० पैकी ४०० संस्थाने शुद्र राजांची होती. ‘सबव्हर्जन’ करण्यासाठी या भेदांना अधिक विस्तीर्ण करणे आवश्यक होते. गोर्यांनी वर्ण आणि जातीव्यवस्था यांना विविध जातींमध्ये परावर्तित केले; परंतु ‘जात’ ही मूलत: एक पोर्तुगीज अथवा स्पॅनिश संकल्पना होती. तिचे या देशाशी काहीच देणेघेणे नव्हते.
अत्री यासंदर्भात सांगतात, ‘‘वर्ष १८७१ च्या जनगणनेचा अभ्यास केला, तर हे लक्षात येते की, जनगणना आयुक्तांना आदेश होता की, त्यांनी सर्व लोकांना ‘जाती’ या एकाच श्रेणीमध्ये लिहायचे ! प्रत्यक्ष जनगणना करणारा त्याच्या वरिष्ठांना उलट अहवाल पाठवत असे की, ‘येथील लोक या जाती स्वीकारण्यास सिद्ध नाहीत’; परंतु वरच्या आदेशानुसार वर्ण, जाती, कुलपरंपरा या सर्वांना ‘जात’ या एकाच शब्दामध्ये मढण्यात आले.
आज आम्ही त्याचेच गुलाम बनलो आहोत. आम्हाला असे सांगण्यात येते की, भारत हा मुळातच जातीव्यवस्था असलेला समाज आहे आणि आपल्यात तो ‘न्यूनगंड’ निर्माण झाला !’’
रोमन लोकांच्या ‘डिविडे एट इम्पेरा’ (फोडा अन् राज्य करा !) या नीतीचा ब्रिटिशांनी भारतात चांगला वापर केला. इंग्रजांनी ब्राह्मण आणि क्षत्रिय यांना अत्याचारी ‘आर्य आक्रमणकारी’ ठरवून त्या वेळच्या समस्यांचा दोष यांच्या माथी मारला. खरेतर या समस्यांचे मूळ कारण हे ‘ईस्ट इंडिया कंपनीची लूट’ आणि ‘इस्लामी काळातील कुप्रथा’ हे होते. इंग्रजांनी समाजातील भेद अधिक विस्तीर्ण करतांनाच मुसलमानांना पुन्हा अधिक जोमाने गोहत्या करायला लावली. वर्ष १८७१ च्या ‘गुन्हेगारी टोळी कायद्या’ने अनेक जातींना ‘जन्मजात गुन्हेगार’ म्हणून घोषित केले. अशा प्रकारचे धोरण आणि जलदपणे घटणारे संसाधन यांच्यामुळे भारताचा प्राचीन सामाजिक डोलारा ढासळत गेला.
बेझमेनोव्ह म्हणतो, ‘‘शिक्षण : समाजाला रचनात्मक, प्रायोगिक आणि कार्यक्षम गोष्टी शिकण्यापासून परावृत्त करा ! व्यक्ती, समूह आणि समाज यांच्यातील नैसर्गिक संबंध तोडून कृत्रिम अन् सरकारी स्तरावरील संस्थांना त्यांची जागा घेऊ द्या !’’ |
७. विलीयम बेंटींक याने ‘शिक्षण कायदा’ लागू करून भारतीय गुरु-शिष्य परंपरेवर आघात करणे
वर्ष १८३५ मध्ये विलीयम बेंटींक याने ‘इंग्रजी शिक्षण कायदा’ आणून भारतीय गुरु-शिष्य परंपरेचा शेवटही चालू केला. मेकॉलेमुळे आता भारतियांना यॉर्कशायरमधील झोपडपट्टीतील शिक्षण घ्यायचे होते. मैदानात युद्धकला शिकवण्याऐवजी ‘क्लासरूम’मध्ये हताश करून सोडणे पुष्कळ हितावह होते. अशातच लूटपाटीतून गेलेला समाज पारंपरिक शाळांना धन कुठून देणार ? एकेक करत शाळा आणि गुरुकुल बंद होऊ लागले. त्यामुळे शिक्षणाविना लोकसंख्या आता ‘अशिक्षित कामगार’ आणि ‘शेतकरी’ यांचा समूह बनून राहिली. आपल्याला ‘व्हाईट मेन्स बर्डन’ (गोर्या लोकांवरील भार) संबोधण्यात येत होते. इंग्रज मिशनरी हे भारतीय गरीब मुलांना घरून घेऊन जात आणि त्यांना कॉन्व्हेंटमध्ये ठेवून इंग्रजी पद्धतीचे शिक्षण देत. असे शिक्षण घेऊन कॉन्व्हेंटमधून बाहेर पडलेल्या मुलांना आपलेच आई-वडील आणि समाज परके वाटू लागले. ज्या देशाला संपूर्ण युरोपने लुटले, त्यांच्या मुला-मुलींवर बिंबवण्यात आले की, त्यांची संस्कृती मागासलेली असून आक्रमण करणार्या लुटारूंच्या ‘पद्धती’ या आधुनिक आहेत. अशा पद्धतीने धर्म, जात, समाज आणि शिक्षण अशा प्रत्येक पातळीवर भारताच्या भोळ्याभाबड्या जनतेला आचारभ्रष्ट करण्यात आले. यातूनच भारतीय समाजाचे ‘ॲक्टिव्ह डिमॉरलायझेशन’ झाले.
दुसरा टप्पा होता : ‘डिस्टेबिलायझेशन’ अर्थात् अस्थिरता निर्माण करणे !बेझमेनोव्ह सांगतो, ‘‘मध्येच शिक्षण सोडून देणार्या अथवा वरवर बौद्धिक क्षमता असलेल्यांना सरकार, प्रशासन, व्यापार, पत्रकारिता, शैक्षणिक संस्था या शक्तीकेंद्रांवर स्थापित करण्यात आले. तुम्ही त्यांच्यापासून पळू शकत नाही. त्यांना कोणत्याही घटनेला विशिष्ट पद्धतीने प्रतिक्रिया देण्यासाठी सिद्ध (‘प्रोग्रॅम्ड’) करण्यात आलेले असते.’’ |
८. विलायतेत शिकून भारतात परतणार्या भारतियांनी मान सन्मानासाठी इंग्रजांची गुलामगिरी पत्करणे
साधनसंपन्न कुटुंबातील मुले शिक्षणासाठी आता विलायतेत जाऊ लागली. तेथून ती ‘बॅरिस्टर’ आणि सनदी अधिकारी होऊन परतू लागली. विलायतेतून आलेल्या ‘तपकिरी’ साहेबांच्या दृष्टीने गोरगरीब जनतेसाठी किंचित्ही सहानुभूती शिल्लक राहिली नव्हती. आपले मालक आपल्यावर कसे प्रसन्न रहातील आणि आपला प्रभाव कसा टिकून राहील, या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू होते. ‘तुम्ही अशा लोकांना सूर्यप्रकाशाइतकी वास्तविक सत्य माहिती सांगूनही त्यांचे मन वळवू शकत नव्हता, कारण त्यांच्या मूळ दृष्टीकोनाचा ढाचाच तशा प्रकारे (हिंदुविरोधी) सिद्ध करण्यात आला होता.’ ब्रिटीश राजवट आनंदी होती. त्यांच्या संरक्षणात बहुतांश राजे-रजवाडेही चैन करत होते, परंतु सर्वांत आनंदी होते ‘तपकिरी साहेब’, कारण ‘काळ्या कुत्र्यां’वर (‘ब्लॅक डॉग्ज’वर म्हणजेच भारतियांवर) राज्य करण्याचे दायित्व त्यांना देण्यात आले होते. ज्यांनी स्वत:ला सिद्ध केले, त्यांना जहागिरी, तसेच मान सन्मान मिळाले. कुणाला ‘रायबहाद्दूर’, कुणाला ‘खानबहाद्दूर’, तर कुणाला ‘नाइटहूड’ ! गावांमध्ये खितपत पडलेल्या जनतेचा आवाज कोण ऐकणार होते ? ‘इंडिया’ आणि ‘भारत’ अशा दोन विचारसरणी कायमच्या बनून गेल्या.
(साभार : ‘प्राच्यम्’ यू ट्युब वाहिनी)
(उत्तरार्ध वाचा पुढील रविवारी)
भारताविषयीचा खोटा इतिहास शिकवणार्या इंग्रजांनी आखलेल्या षड्यंत्राला उधळून लावण्यासाठी शैक्षणिक क्रांती होणे अत्यावश्यक ! |