राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती हिंदु कार्यकर्त्यांना कायदेशीरदृष्ट्या प्रशिक्षित करणार !  – पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

  • अकोला येथे ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’ची करण्यात आली स्थापना !

  • हिंदु कार्यकर्त्यांना कायदेशीरदृष्ट्या प्रशिक्षित करण्याचा विदर्भातील अधिवक्त्यांचा एकमुखाने निर्धार !

बोधचिन्हाचे अनावरण करतांना डावीकडून अधिवक्ता उदय आपटे, पू. अशोक पात्रीकर,पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी, श्री. सुनील घनवट

अकोला, ३१ मार्च (वार्ता.) – ब्रिटिशांनी त्यांना हितावह असणारी प्रचलित व्यवस्था भारतियांवर लादली असून आपण आजही तिचे अनुकरण करत आहोत. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांवर नाहक अन्याय होत आहे. मुळात न्याय हा समतोल असावा. आपल्या संस्कृतीनुसार विकसित झालेली आणि आपल्या आदर्शांचा विचार करून न्याय देणारी न्यायव्यवस्था आपल्याला हवी आहे. हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय दूर करण्यासाठी ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’ हिंदु कार्यकर्त्यांना कायदेशीरदृष्ट्या प्रशिक्षित करणार आहे. त्यासाठी सर्व अधिवक्त्यांनी या कार्यात समर्पितभावाने सहभागी होणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन मुंबई उच्च न्यायालयाचे पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांनी केले. आदर्श राष्ट्ररचनेसाठी कार्यरत ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’ची स्थापना ३१ मार्च या दिवशी करण्यात आली. या समितीचे पहिले ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता अधिवेशन’ (विदर्भ प्रांत) अकोल्यात आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाला सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

अधिवेशनाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने करण्यात आला. वेदमूर्ती सचिन तक्रस यांनी वेदमंत्रपठण केले. प्रस्तावना अधिवक्त्या (श्रीमती) श्रुती भट यांनी सांगितली. सूत्रसंचालन सौ. आनंदी वानखडे यांनी केले. अधिवेशनाला अकोला, अमरावती, चंद्रपूर, खामगाव, तेल्हारा, आकोट, मलकापूर, वाडेगाव, नांदुरा, बाळापूर आणि पातुर येथील ८० हून अधिक अधिवक्ते सहभागी झाले होते.

काळानुसार अधिवक्त्यांनी राष्ट्र-धर्म कार्यात कृतीशील व्हावे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

मूठभर मावळ्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. महाभारतात कौरवांच्या बाजूने पुष्कळ सैन्य असतांना धर्माच्या बाजूने असणारे पांडव अंतिम विजयी झाले. त्याप्रमाणे ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’ हे धर्माच्या बाजूने असणार्‍या अधिवक्त्यांचे संघटन आहे. सर्वांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी कृतीशील होऊन साधक अधिवक्ता म्हणून सिद्ध होण्याची आवश्यकता आहे.

अधिवक्त्यांनी न्यायालयीन कौशल्याचा वापर राष्ट्र-धर्म कार्यासाठी करावा ! – अधिवक्ता मुकुंद जालनेकर

हिंदु राष्ट्र स्थापनेचे विचार आणि धर्मकार्य यांची आवड असणार्‍या अधिवक्त्यांना  धर्मकार्याशी जोडणे, धर्मसंस्थापनेच्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी करून घेणे अन् त्यांची   संघटनात्मक फळी सिद्ध करणे, यांसाठी राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती कार्यरत रहाणार आहे. राष्ट्र आणि मनुष्यजीवन यांचे ध्येय साध्य करण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन त्यांना ही समिती साधनेविषयी मार्गदर्शनही करणार आहे. त्यासाठी अधिवक्ता अधिवेशनाचे आयोजन करणे, सुराज्य अभियानाच्या माध्यमातून सामाजिक दुष्ट प्रवृत्तीच्या विरोधात कार्य करणे, तसेच हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना कायदेविषयी मार्गदर्शन करणे आदी कार्य ही समिती करणार आहे. त्यामुळे सर्वांनी या कार्यामध्ये सहभागी होऊन राष्ट्र आणि धर्म या कार्यासाठी स्वतःचे कौशल्य अर्पण करावे.

हिंदुद्वेषमूलक वक्तव्यांच्या विरोधात संघटितपणे प्रयत्न करूया ! – अधिवक्ता उदय आपटे, खामगाव

हिंदु धर्मविरोधी वक्तव्य करण्याची वारंवारता अल्प होण्याऐवजी वाढत आहे. त्याला प्रतिबंध लावण्यासाठी उपाययोजना काढण्याची आवश्यकता आहे. ‘संघेशक्ति कलौयुगे ।’ ही युक्ती लक्षात ठेवून सर्वांनी हिंदुविरोधी वक्तव्य करणार्‍यांच्या विरुद्ध संघटित होणे आवश्यक आहे. हिंदु धर्माविरुद्ध द्वेषमूलक वक्तव्य झाले, तर प्रचलित कायद्याद्वारे तो गुन्हा आहे. त्यामुळे आपण त्याची तक्रार देऊ शकतो. आपण द्वेषमूलक वक्तव्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केल्यास या गोष्टी निश्चित थांबतील.

हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांचा राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभाग महत्त्वाचा ! – श्रीकांत पिसोळकर, विदर्भ समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

कायद्याचे जाणकार म्हणून हिंदुत्वाचे कार्य करत असतांना आम्हाला अधिवक्त्यांच्या सहकार्याची पुष्कळ आवश्यकता आहे. सध्या राजकीय स्वार्थासाठी कायदे बनवले जात आहेत आणि ते रहितही केले जात आहेत. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांवर पोलीस यंत्रणा अन्याय करत आहे. त्यामुळे न्यायालयीन साहाय्यासाठी अधिवक्त्यांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभागी होणे आवश्यक आहे.

क्षणचित्रे

१. अधिवेशनामध्ये ‘हिंदुविरोधकांच्या राष्ट्र आणि धर्म यांविरोधी कारवाया आणि अधिवक्त्यांचे कर्तव्य’ याविषयी परिसंवाद घेण्यात आला. त्यात श्री. सुनील घनवट, अधिवक्ता पप्पू मोरवाल, अधिवक्ता धीरज जयस्वाल, अधिवक्ता योगेश पाटील आणि अधिवक्त्या (सौ.) ममता तिवारी यांनी सहभाग घेतला.

२. या वेळी अधिवक्त्या सौ. सुनीता कपिले, अधिवक्ता शरद इंगळे यांच्यासह इतर अधिवक्त्यांनी उत्स्फूर्तपणे न्यायालयात कार्य करतांना आलेले अनुभवकथन केले.

३. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात अधिवक्त्यांचा कार्य म्हणून सहभाग’ याविषयी निरंजन चौधरी यांनी संबोधित केले. ‘माहिती अधिकार कायद्याद्वारे राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे कार्य’ याविषयी अधिवक्ता (सौ.) प्राजक्ता जामोदे यांनी संबोधित केले.


राष्ट्रभक्त अधिवक्त्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचे लक्ष्य ठेवून कार्य करावे !

‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’च्या स्थापनेनिमित्त संदेश

‘स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळाकडे पाहिले, तर गणेश वासुदेव जोशी, लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे, स्वातंत्र्यवीर सावरकर, देशबंधू चित्तरंजन दास अशी अधिवक्त्यांची अनेक नावे समोर येतात. ही सूची मोठी होईल; परंतु महत्त्वाचे इतकेच आहे की, स्वातंत्र्यलढ्यात अधिवक्त्यांची सेना स्वातंत्र्यसैनिक म्हणून जशी उतरली, त्याचप्रमाणे आताच्या राष्ट्रभक्त अधिवक्त्यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात उतरणे, ही त्यांची समष्टी साधनाच आहे. राष्ट्रभक्त अधिवक्त्यांनी व्यष्टी साधना करण्यासह या राष्ट्रकार्यात योगदान देऊन समष्टी साधना करणे महत्त्वाचे आहे. या कार्यातून त्यांची आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होणार आहे.

संकटप्रसंगी देशात ठिकठिकाणी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत असणार्‍या हिंदुत्वनिष्ठांच्या साहाय्यासाठी उभे रहाणारे, त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करणारे, तसेच हिंदु राष्ट्राला विरोध करणार्‍यांना कायदेशीर उत्तर देणारे अनेक राष्ट्रभक्त अधिवक्ते देशभरात संघटित होणे आवश्यक आहे. अधिवक्त्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचे लक्ष्य ठेवून कार्य करावे. त्यामुळे हे कार्य गतीने होण्यास साहाय्य होईल !’