
चिंचवड (जिल्हा पुणे), ३१ मार्च (वार्ता.) – हिंदु नववर्षानिमित्त सायंकाळी ५ वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही शोभायात्रा अतिशय उत्साही वातावरणात पार पडली. संस्कृती संवर्धन आणि विकास महासंघ, पतंजली योग समिती, जीवन विद्या मिशन, गायत्री परिवार, गीता परिवार, संत निरंकारी मिशन, श्री शंकर महाराज सेवा मंडळ, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, विवेकानंद केंद्र, प्रजापती ब्रह्मकुमारी, गणेश मंडळे, भजनी मंडळे, सामाजिक संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी झाले होते. शोभायात्रेचा प्रारंभ श्री दत्त मंदिर, श्रीधर नगर, चिंचवडगाव येथून संध्याकाळी ५.३० वाजता आरती आणि पूजन करून झाला आणि सांगता श्री धनेश्वर मंदिर, चिंचवड येथे महाआरतीने झाली. अनेक संस्थानी त्यांचे फलक घेत हिंदु धर्माची महानता यांचे संदेश मांडले. हिंदु नववर्ष आणि हिंदु संघटन या दृष्टीने ही शोभायात्रा महत्त्वाची ठरली. स्थानिक लोकप्रतिनिधीही यात्रेत सहभागी झाले होते. ही शोभायात्रा यशस्वी होण्यासाठी समविचारी संस्था आणि समाजातील सर्वच स्तरांतून सहकार्य मिळाले.