खंडणीप्रकरणी गुन्हा नोंद !
मुंबई – अश्लील ध्वनीचित्रफीतीद्वारे ४१ वर्षीय महिलेकडून १० लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली. आरोपीने महिलेचे छायाचित्र आणि ध्वनीचित्रफीत फेसबुकवरून गटात प्रसारित केली. या प्रकरणी आरोपीविरोधात खंडणी, बलात्कार आणि अपकीर्ती प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
विमानतळावर ३ कोटी रुपयांचा गांजा जप्त !

मुंबई – सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत ३ किलो गांजासह महंमद शरीफ या आरोपीला अटक करण्यात आली. जप्त केलेल्या हायड्रोपोनिक गांजाची किंमत तीन कोटी रुपये आहे. बँकॉकहून मोठ्या प्रमाणात हायड्रोपोनिक गांजाची तस्करी केली जात आहे.
आंबेगाव (जिल्हा पुणे) येथील ९ गावांना १० टँकरने पाणीपुरवठा
मंचर (पुणे) – आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त ९ गावांसह वाड्या-वस्त्यांवर जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने आंबेगाव पंचायत समिती कार्यालय, घोडेगावच्या वतीने १० टँकरने पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांनी दिली. तालुक्यातील १६ सहस्र ७३१ लोकसंख्येला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
खड्ड्यातील पाण्यात पडून मुलाचा मृत्यू !
पुणे – घोरपडीतील नियोजित रेल्वे उड्डाणपुलाजवळील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून ९ वर्षीय क्रिश अंगरकर याचा मृत्यू झाला. २८ मार्च या दिवशी मुलगा शाळेतून परत आला नाही. मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबियांनी वानवडी पोलीस ठाण्यात केली होती. २९ मार्चला मुलाचा मृतदेह खड्ड्यामध्ये दिसला. अग्नीशमनदल आणि मुंढवा पोलिसांनी खड्ड्यातील पाणी बाहेर काढून मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या दुर्घटनेसाठी संबंधित काम करणार्या ठेकेदाराच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गुढीपाडव्याला अधिक मूल्यांच्या घरखरेदीकडे पुणेकरांचा कल !
पुणे – गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अधिक मूल्याच्या घरखरेदीला पुणेकरांनी प्राधान्य दिले. चांगली आर्थिक स्थिती, स्थिर व्याजदर, १ एप्रिलपासून ‘रेडीरेकनर’ (मालमत्ता व्यवहाराचा किमान दर) दरात होणार्या वाढीच्या पार्श्वभूमीवर १ ते २७ मार्चपर्यंत २२ सहस्र १३० दस्त नोंदणी झाली आहे. त्यातून राज्य सरकारला १ सहस्र १६७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दस्तसंख्या अल्प असली, तरी अधिक महसूल जमा झाल्याचे पुणे शहर जिल्हा सहनिबंधक संतोष हिंगाणे यांनी सांगितले. मार्चचा एकूण महसूल १ सहस्र ४५० कोटी रुपये मिळेल, अशी अपेक्षा आहे.