CM Yogi Government Achievements : उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारला ८ वर्षे पूर्ण !

  • ८ वर्षांत मोठ्या गुन्ह्यांमध्ये ८५ टक्के घट !

  • ८० हजार गुंडांना कारागृहात डांबले !

  • २२२ गुंड चकमकीत ठार !

  • १४ सहस्र कोटी रुपयांची मालमत्ता जप्त !

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत सरकारने केलेल्या कठोर कारवाईमुळे वर्ष २०१६ च्या तुलनेत राज्यातील मोठ्या गुन्ह्यांमध्ये ८५ टक्के इतकी लक्षणीय घट झाली आहे.

१. वर्ष २०१६ च्या तुलनेत राज्यात दरोड्यांच्या घटनांमध्ये ८५ टक्के, तर हत्यांच्या  घटनांमध्ये ४१ टक्के घट झाली आहे. हुंडाबळीमुळे होणार्‍या मृत्यूंमध्येही अशीच घट झाल्याचे सरकारने म्हटले आहे.

२. गेल्या ८ वर्षांत २२२ गुन्हेगार वेगवेगळ्या चकमकीत मारले गेले आहेत, तर ८ सहस्र ११८ गुन्हेगार घायाळ झाले आहेत. अनेक वेळा चकमकीत ठार होण्याच्या भीतीमुळे गुन्हेगार स्वतः पोलीस ठाण्यांमध्ये उपस्थित झाल्याचे दिसून आले.

३. अनुमाने ८० सहस्र गुन्हेगारांना कारागृहात डांबण्यात आले. ९०० हून अधिक आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

४. राज्यातील माफियांकडे गुन्हेगारीतून कमावलेल्या पैशांतून सहस्रो कोटी रुपयांची मालमत्ता होती. सरकारने अशा माफियांवर कारवाई करत आतापर्यंत ४ सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची मालमत्ता जप्त केली आहे.

५. गुंड कायद्यांतर्गत राज्यात १४ सहस्र कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ६८ माफिया आणि त्यांच्या टोळ्यांमधील १ सहस्र ४०० हून अधिक गुंडांच्या विरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

६. सरकारने पोलीस दलात मोठ्या प्रमाणात नवीन भरतीही केली. वर्ष २०१७ मध्ये उत्तरप्रदेश पोलिसांमध्ये २ लाखांहून अधिक पोलिसांची कमतरता होती. सरकारने २ मोठ्या भरतीनंतरही अद्याप ५० सहस्र पोलिसांची आवश्यकता आहे. येत्या काही दिवसांत सरकार २८ सहस्र जणांची पोलीसदलात भरती करणार आहे.

७. राज्यात पोलीस भरतीबरोबरच १२६ नवीन पोलीस ठाणी निर्माण करण्यात आली आहेत.  ८६ नवीन पोलीस चौक्याही निर्माण करण्यात आल्या आहेत.

संपादकीय भूमिका

  • योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने जे केले, तर अन्य राज्यांतील सरकारे का करू शकत नाहीत ? योगी आदित्यनाथ यांच्यामागे साधनेचे बळ आहे, हे लक्षात घेतले पाहिजे !
  • निःस्वार्थी, त्यागी संतच खर्‍या अर्थाने जनतेचे चांगले शासक होऊ शकतात, याचे हे उदाहरण आहे. जनतेने आता सर्वच ठिकाणी अशा शासनकर्त्यांची मागणी केली पाहिजे ! त्यातूनच रामराज्य साकारेल !