परशुराम सेना २७ मार्चला शारदा मंदिर विद्यालयाला देणार निवेदन
पणजी – आय.सी.एस्.ई. (इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन) या केंद्रीय शैक्षणिक मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणार्या इतिहासाच्या पुस्तकाच्या माध्यमातून मोगलांचा उदोउदो करणारे शिक्षण दिले जात आहे, असा आरोप परशुराम सेनेचे अध्यक्ष श्री. शैलेंद्र वेलिंगकर यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. पत्रकार परिषदेला श्री. सुनील सांतीनेजकर उपस्थित होते.
या पुस्तकात ‘इस्लामचा उदय आणि विस्तार’, ‘तुर्कींचे भारतावरील आक्रमण’, ‘देहलीची सलतनत’, ‘महान अकबर’, ‘अकबरानंतरचे मोगलांचे साम्राज्य’, ‘भक्ती आणि सुफी चळवळ’ या मथळ्यांचे मोगलांची माहिती असलेले धडे, तसेच ‘ख्रिस्ती धर्माचा उदय’, ‘ख्रिस्ती धर्माचा विस्तार’ आदी मथळ्यांचे धडे देण्यात आले आहेत मिरामार येथील शारदा मंदिर या विद्यालयामध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी हा प्रकार श्री. वेलिंगकर यांच्या निदर्शनास आणून दिला आणि याविषयी संताप व्यक्त केला होता. या प्रकाराचा श्री. वेलिंगकर यांनी निषेध केला.
(वाचण्यासाठी चित्रांवर क्लिक करा)
गोव्यात आय.सी.एस्.ई. बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवणारी ११ माध्यमिक विद्यालये आहेत. या संदर्भात २७ मार्च या दिवशी श्री. शैलेद्र वेलिंगकर एका शिष्टमंडळासह शारदा मंदिर विद्यालयामध्ये ‘येणार्या शैक्षणिक वर्षासाठी हे पुस्तक मागे घ्यावे आणि भारतीय राष्ट्रपुरुषांचा उज्ज्वल इतिहास शिकवावा’, अशा मागण्यांचे निवेदन देणार आहेत. त्याचप्रमाणे संपूर्ण भारतात आय.सी.एस्.ई. बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवणारी माध्यमिक विद्यालये, बोर्डाच्या शाळा आहेत, त्या ठिकाणी हे इतिहासाचे पुस्तक मागे घेण्यात यावे, यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान, शिक्षणमंत्री, तसेच गोव्याचे मुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री आणि शिक्षणाधिकारी यांनाही भेटून निवेदन देण्यात येणार आहे, तसेच आवश्यकता पडल्यास याविषयी आंदोलन करणार असल्याचे श्री. वेलिंगकर यांनी सांगितले.