देहली वक्फ बोर्डाच्या १२३ संपत्तींचे केंद्रशासन नियंत्रण मिळवणार !

काँग्रेसच्या सत्ताकाळात संपत्ती बोर्डाकडे अवैधपणे सुपुर्द करण्यात आल्या होत्या !

नवी देहली – केंद्रशासन देहली वक्फ बोर्डाशी संबंधित १२३ संपत्तींना स्वत:च्या अधिकारात घेणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यांतर्गत मशीद, स्मशान आणि दर्गा यांचाही समावेश आहे. शासनाच्या या निर्णयाला बोर्डाचे अध्यक्ष आणि आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांनी विरोध दर्शवला असून शासनाला असे करू देणार नसल्याची चेतावणी दिली आहे.

१. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व संपत्ती केंद्रीय निवास आणि शहरी प्रकरणांच्या मंत्रालयाच्या नियंत्रणात असतील. यांतर्गत सरकारी अधिकार्‍यांनी ८ फेब्रुवारीलाच बोर्डाला पत्र पाठवून सर्व संपत्ती मुक्त करण्याविषयी म्हटले आहे.

२. केंद्रात काँग्रेसचे सरकार असतांना देहलीतील १२३ संपत्ती वक्फ बोर्डाकडे सुपुर्द करण्यात आल्या होत्या. याविरोधात विश्व हिंदु परिषदेने देहली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ऑगस्ट २०१४ मध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी माजी न्यायमूर्ती एस्.पी. गर्ग यांच्या अध्यक्षतेखाली दोन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीने देहली वक्फ बोर्डाच्या सर्व संबंधित पक्षांची बाजू समजून घेऊन अहवाल प्रसारित केला होता.

३. देहली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंत्रालयाच्या भूमी आणि विकास कार्यालयाने म्हटले की, गर्ग यांच्या अहवालामध्ये अयोग्य प्रकारे अधिसूचित वक्फ संपत्तींच्या सूत्रावर म्हटले आहे की, देहली वक्फ बोर्डाकडून यासंदर्भात कोणतेच प्रतिनिधित्व अथवा आक्षेप प्राप्त झालेला नाही. याचा आधार घेत केंद्रशासनाकडे नियंत्रण मिळवण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

४. अमानतुल्लाह खान यांनी या प्रकरणी आक्षेप घेत म्हटले आहे की, गर्ग यांच्या समितीच्या विरोधात जानेवारी २०२२ मध्ये न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली असून या सर्व संपत्तींचा मुसलमान उपयोग करत आहेत. बोर्डाकडून या सर्व संपत्तींची देखभाल-दुरुस्ती केली जाते.

संपादकीय भूमिका

७५ वर्षांपूर्वी काँग्रेसच्या घोडचुकीमुळेच भारताचे दोन भाग होऊन पाकची निर्मिती झाली. त्याच काँग्रेसने भारतावर ६ दशके राज्य करत मुसलमानांचे राष्ट्रघातकी लांगूलचालन केले. आता त्याने केलेली सर्व पापे नष्ट करण्यासह त्यालाही लोकशाही मार्गाने नष्ट करणे अत्यावश्यक !