नशेची शोकांतिका !

एका युवतीला चारचाकीने १२ कि.मी. फरफटत नेल्याने तिचा दुर्दैवी अंत !

देहलीतील कांझावाला भागात एका युवतीला चारचाकीने १२ कि.मी. फरफटत नेल्याने तिचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना सामाजिक भान असणार्‍या नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. केवळ युवतीच्या वेदना आणि मृत्यू यांचेच दुःख नाही, तर या निमित्ताने येणारे प्रश्न अन् उघडे पडलेले प्रशासकीय, तसेच सामाजिक व्यवस्थांचे स्वरूप हेही संवेदनशील माणसाचे मन सुन्न करणारे आहे. चारचाकी चालवणार्‍या युवकांनी मद्यपान केल्याचे समोर येत आहे. सुसंस्कृत भारतात आता विदेशाप्रमाणे दारूच्या दुकानाबाहेर रांगाच्या रांगा पहायला मिळतात, ही शोकांतिका आहे.

काही तथ्ये

घटनेपूर्वी मृत युवतीसमवेत गाडीवर आणखी एक युवती असल्याचे ‘सीसीटीव्ही’ चित्रणात आढळले आहे. त्या दोन्ही युवती हॉटेलमधून निघतांना त्यांच्यात वादावादी झाल्याचे आणि त्यांना तसे न करण्याविषयी सांगितल्याचे हॉटेल व्यवस्थापकाने म्हटले आहे. ‘अपघातानंतर अन्य युवती पळून गेली’, असे म्हटले जात आहे. यात काही तथ्य असेल, तर पोलिसांना काही वेगळे धागेदोरे मिळू शकतात. आरोपींनी घटनेनंतर गाडीची स्वच्छता करून घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपींनी एवढी दारू प्यायली होती की, ‘गाडीतील दारूचा वासही गेलेला नव्हता’, असे ‘फॉरेन्सिक’ पथकाने सांगितले. गाडीची स्वच्छता केल्यानंतरही गाडीच्या खाली रक्ताचे डाग आणि केस मिळाले आहेत. नशेमुळे ‘गाडीखाली युवती फरफटत आहे’, हे नशेखोर युवकांना कळले नाही ? कि त्यांनी जाणूनबुजून केले ? हे अन्वेषणानंतर समजेल; पण ‘युवकांची एकंदरच नैतिकता आणि संवेदनशीलता किती रसातळाला गेली आहे’, हे या घटनेवरून अधोरेखित होते. गाडीत युवतीचे शरीर अडकल्यामुळे तिच्या शरिराचे तुकडे झाले; पण तेही मिळालेले नाहीत. यावरून ‘आरोपी गाडी सरळ मार्गावरून चालवत नव्हते’, असाही निष्कर्ष काढला जात आहे. ‘युवतीचे शव गाडीला अडकलेल्या स्थितीत असतांना गाडी गावातून इकडून तिकडे फिरवली जात होती’, हे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. ‘हे केवळ नशेमुळे होते ? कि अन्य काही कारणे होती ?’, हे पुढे येईल. ही घटना होण्यापूर्वीही नशेखोरांच्या गाडीने सुलतानपुरी भागात अन्य एका गाडीला धक्का दिला होता. ही मुलगी घरातील एकटी कमावणारी असल्याने आता तिच्या घरच्या सदस्याला सरकारी नोकरी देण्याचा प्रस्ताव आला आहे. कदाचित् ती प्रक्रिया होईलही; पण ज्या पद्धतीने विदारक मृत्यूची स्थिती ओढवली, त्यातून तिचे कुटुंबीय आणि मनुष्यहानी यांचे दुःख भरू शकणार नाही. युवतीचा देह १२ कि.मी. अतीवेगाने फरफटत गेल्याने प्रत्यक्षदर्शींना नंतर तो पहाणे कठीण गेले. अर्धे शरीर रस्त्याला घासून नष्ट झाले होते. डोक्यासह संपूर्ण शरीर फाटलेले होते. या गाडीत दारू पिऊन तर्र झालेले युवक तर होतेच, त्यासह मोठ्या आवाजात गाणीही चालू होती. पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे दारू प्यायलेल्या युवकांनी विदारक स्थिती केल्याने समाजाला त्याचे कसे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत, हेही या निमित्ताने पुढे आले आहे.

पोलीस प्रशासनाविषयीची प्रश्नचिन्हे

‘प्रत्यक्षदर्शी दूधवाल्याने उत्तररात्री ३.१५ वाजता पोलिसांना संपर्क करूनही पहाटे ५ वाजेपर्यंत पोलिसांनी काहीही हालचाल केली नाही’, ही सर्वांत मोठी गंभीर आणि अक्षम्य चूक पुढे आली आहे. यातून पोलीस प्रशासनातील असंख्य प्रकारच्या त्रुटी आता पुढे येऊ शकतात. त्यामध्ये ‘नववर्षाच्या रात्री अधिक पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता असतांना १२ कि.मी.पर्यंत पोलीस कुठेच उपलब्ध नव्हते का ?’, येथपासून ते ‘पोलीस प्रशासनातील पोलीससंख्येची कमतरता’, इथपर्यंत अनेक गोष्टी आहेत. देहली पोलिसांच्या दायित्वाच्या संदर्भातही काही मतभेद असल्याच्या शंका व्यक्त होत आहेत. ‘पोलिसांना संपर्क केल्यानंतर लगेच कारवाई चालू करण्यात काय अडचणी आल्या ?’, याचे स्पष्टीकरण त्यांना जनतेला द्यावेच लागेल. या प्रकरणाची चौकशी एक आठवड्यात पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याच वेळी पोलिसांकडून जनतेच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणेही अपेक्षित आहे. प्रत्यक्षदर्शीने प्रथम दुचाकी आणि नंतर चारचाकीतून आरोपींचा पाठलाग केला अन् पोलिसांना कळवले. देहलीच्या उपराज्यपालांनी पोलीस आयुक्तांना ‘कोणत्याही राजकीय आणि आर्थिक हस्तक्षेपाविना ही चौकशी पूर्ण करा’, असे आदेश दिले आहेत. याचाच दुसरा अर्थ ‘हस्तक्षेप होऊ शकतो’, याची कुठेतरी शक्यता त्यांना वाटली आहे. ‘पोलीस प्रशासनाने स्वतःची विश्वासार्हता सर्वसामान्यांच्या मनातून घालवली आहे’, याचे हेच निदर्शक आहे. या प्रकरणानंतर देहली महिला आयोगाने गृहमंत्रालयाला पत्र पाठवून काही सूचना केल्या आहेत. त्यात ६६ सहस्र पोलिसांची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. तसेच मध्यंतरीच्या काळात ३ सहस्र पोलिसांची भरती करण्याचे ठरले; परंतु अद्यापपर्यंत त्याविषयीचे आदेश निघालेले नाहीत.

लव्ह जिहाद किंवा गोरक्षण यांसारखी कितीही गंभीर प्रकरणे असू देत भ्रष्ट पोलीस यंत्रणा जनतेचे ‘रक्षक’ असल्याचे विसरून सदोदित ‘भक्षक’ झाल्याचेच समोर येते. काही प्रकरणे माध्यमांतून बरीच गाजतात, तेव्हा राजकीय दबाव वाढतो आणि चक्रे फिरतात; पण अशा लाखो प्रकरणांत पोलिसांनी पैसे खाऊन किंवा कर्तव्यचुकारपणा करून नागरिकांवर आणि विशेषतः हिंदूंवर अन्याय केला आहे. याही प्रकरणात पोलिसांकडून काही चुका झाल्या का ? हे पडताळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कदाचित् सर्व सत्य बाहेर येईलही; परंतु ‘अशी प्रकरणे न होण्यासाठी, तसेच मद्य पिऊन वाहन चालवणे बंद होण्यासाठी अपेक्षित अतीकठोर ठोस कारवाई आपल्याकडे कधी होणार ?’, हा प्रश्न मात्र सर्वसामान्यांना निराश करणारा आहे. देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे. अनेकांच्या फाशीच्या शिक्षाच जिथे रहित केल्या जात आहेत, तिथे यांना फाशी होईल, यावर कोण विश्वास ठेवणार ?, असो. वरीलप्रमाणे होणार्‍या घटना टाळण्यासाठी निर्व्यसनी युवक आणि सक्षम पोलीस प्रशासन यांची आवश्यकता पुन्हा प्रकर्षाने समोर येते !

मद्यपी युवक आणि पोलीस प्रशासनातील त्रुटी या समस्या समाजाची अपरिमित हानी करणार्‍या !